समाज आणि सभ्यता यांच्या विकासात मंदिरांची मोठी भूमिका ! – मद्रास उच्च न्यायालय

चेन्नई –  समाज आणि सभ्यता यांच्या विकासात मंदिरांनी मोठी भूमिका बजावली आहे. संस्कृती संवर्धनासाठी मंदिरांचे नियमित आणि पारंपरिक कार्य अतिशय महत्त्वाचे आहे, असे मत मद्रास उच्च न्यायालयाने व्यक्त केले. मंदिरांचे अस्तित्व त्यांच्या आत केल्या जाणार्‍या वेदपठण, भजन, नृत्य, नाटक, कीर्तन इत्यादी उपक्रमांच्या सहअस्तित्वाशी जोडलेले आहे. एक उपक्रम अल्प झाल्यामुळे इतर उपक्रमही अल्प होतात आणि शेवटी मंदिरेच नष्ट होतात, अशी टिप्पणी उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेवरील निकालाच्या वेळी केली.

१. काळाच्या कसोटीवर टिकणारी मंदिरे ही पुरातत्वीयदृष्ट्या महत्त्वाची ठिकाणे आहेत, असे निरीक्षण न्यायमूर्ती आर्. महादेवन् आणि न्यायमूर्ती जे. सत्यनारायण प्रसाद यांच्या खंडपिठाने नोंदवले.

२. तमिळनाडूच्या तुतीकोरीन जिल्ह्यातील तिरुचेंदूर येथील अरुलमिघू सुब्रमणिया स्वामी मंदिराच्या कार्यकारी अधिकार्‍याने कांडा षष्ठी उत्सवाच्या वेळी भाविकांना मंदिराच्या बाहेरील आवारामध्ये राहू न देण्याचा निर्णय दिला होता. तो न्यायालयाने भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कायम ठेवला.

३. कांडा षष्ठी उत्सवात भक्तांना मंदिरात रहाण्याची अनुमती देण्याची मागणी करणारी एक जनहित याचिका मदुराई येथील मद्रास उच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली होती.

४. या मंदिरात तमिळ मासाच्या ‘आयप्पासी’ मासामध्ये ६ दिवस चालणार्‍या वार्षिक कांडा षष्टी उत्सवाच्या वेळी भक्त उपवास करतात. या वेळी भक्त घरी न जाता मंदिरात थांबून कांडा षष्टी कवचम् गातात अणि धार्मिक कार्ये करतात. अशा वेळी भाविकांना मंदिराच्या आवारात रहाण्याची अनुमती असते; परंतु मंदिरात मोठी विकासकामे चालू असल्याने भाविकांची असुविधा होऊ नये म्हणून यंदाच्या उत्सवात कुणालाही मंदिरात रहाण्याची अनुमती देण्यात आलेली नाही आणि त्याऐवजी मंदिराच्या बाहेर मूलभूत सुविधांसह तात्पुरती सोय प्रदान करण्यात आहे, असे कार्यकारी अधिकार्‍यांनी न्यायालयाला सांगितले होते.

५. ‘मंदिराचे पावित्र्य राखतानांच भाविकांची सुरक्षाही तेवढीच महत्त्वाची आहे’, असे मद्रास उच्च न्यायालयाने जनहित याचिका निकालात काढतांना म्हटले आहे.