गुरव समाजासाठी ‘संत काशीबा युवा विकास योजना’ चालू करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा !

गुरव समाज राज्यस्तरीय महाअधिवेशनात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सोलापूर, १२ डिसेंबर (वार्ता.) – येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गुरव समाजाचे राज्यस्तरीय महाअधिवेशन मोठ्या उत्साहात पार पडले. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘गुरव समाजाच्या मुलांचे शिक्षण चांगले व्हायला हवे. त्यांना रोजगार मिळायला हवा. यासाठी ‘संत काशीबा युवा विकास योजना’ चालू करण्यात येईल. या योजनेसाठी प्रारंभी ५० कोटी रुपये निधी दिला जाईल. त्यापुढेही योजनेचा विस्तार करण्यात येईल.’’ या वेळी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

पंढरपूर येथील परंपरा आणि मठ-मंदिरे यांना सुरक्षित ठेऊन ‘कॉरिडॉर’ बनवण्यात येणार ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

पंढरपूर येथील ‘कॉरिडॉर’ घोषित केल्यानंतर त्याविषयी अनेकांनी वाद निर्माण केला आहे. ‘कॉरिडॉर’ हा सर्वांना समवेत घेऊन केला जाणार आहे. कोणतेही मठ आणि मंदिर तोडून तो केला जाणार नाही. पंढरपूर येथील सर्व परंपरा आणि मठ, मंदिरे यांना सुरक्षित ठेऊन येथे येणार्‍या वारकर्‍यांसाठी अधिकाधिक सोयी कशा करता येतील हे विचारात घेऊन ‘कॉरिडॉर’ करण्यात येणार आहे. त्यामुळे कुणीही कॉरिडॉरविषयी अफवा पसरवण्याचा प्रयत्न करू नये.