पुणे येथे अवैध ‘बाइक टॅक्सी’ वाहतुकीविरोधात आर्.टी.ओ. कार्यालयाबाहेर रिक्शाचालकांचे ठिय्या आंदोलन !
पुणे – पुण्यात चालू असणार्या दुचाकी टॅक्सीच्या विरोधात रिक्शाचालक आक्रमक झाले आहेत. ‘बाईक टॅक्सी’ सेवा बंद करण्याच्या मागणीसाठी रिक्शाचालकांकडून पुणे आर्.टी.ओ. कार्यालयाबाहेर १२ डिसेंबर या दिवशी रिक्शावाला संघटनेचे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येत आहे. या वेळी रिक्शाचालकांनी गाणी आणि भजन म्हणत राज्य सरकार आणि अधिकारी यांचा निषेध नोंदवला. परिणामी शहरात रिक्शा वाहतूक बंद केल्याने नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागला.
या वेळी केशव क्षीरसागर म्हणाले की, ‘रॅपिडो बाइक टॅक्सी’ वाहतुकीच्या विरोधात आम्ही २८ नोव्हेंबर या दिवशीही आंदोलन केले होते; मात्र त्यानंतरही ‘रॅपिडो’ आस्थापनाकडून ‘बाइक टॅक्सी’ वाहतूक चालू आहे. त्यामुळे आम्ही आज आर्.टी.ओ. कार्यालयाबाहेर बेमुदत ठिय्या आंदोलन करत आहोत. जोपर्यंत ‘रॅपिडो’ आस्थापन बाइक टॅक्सी बंद करत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन चालूच रहाणार आहे. रिक्शाचालकांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी रिक्शाचालकांनी केली आहे.