समाजातील लोकांना आपल्या प्रेमाने जोडून ठेवणारे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार श्रद्धा असणारे ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. सुबोध नवलकर !
श्रीमती स्मिता नवलकर यांचे यजमान कै. सुबोध नवलकर हे समाजातील अत्यंत प्रतिष्ठित व्यक्ती होते. त्यांच्या व्यवसायामुळे त्यांचे देश-विदेशांतही पुष्कळ नाव होते. त्यांची लहानपणापासूनच देवावर पुष्कळ श्रद्धा होती. सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यावर त्यांची देवाप्रमाणेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर श्रद्धा बसली. त्यांना सनातन संस्थेविषयी पुष्कळ आदर होता. त्यामुळे ते स्वतः आरंभी व्यवसाय करत असले, तरी त्यांचे पत्नीला साधनेसाठी पूर्ण सहकार्य होते. कालांतराने वयपरत्वे व्यवसाय थांबवल्यानंतर ते मायाविश्वाचा त्याग करून देवद येथील सनातनच्या आश्रमात निवासाला आले आणि आश्रमजीवनाशी एकरूपही झाले. खरेतर अत्यंत संपन्न आणि उच्चभ्रू समाजात आयुष्याचा मोठा कालावधी व्यतीत केल्यावर असा त्याग करणे पुष्कळ कठीण असते; पण परात्पर गुरु डॉक्टरांवरील श्रद्धेने त्यांनी सर्व सहजतेने स्वीकारले. नुसतेच स्वीकारले नाही, तर ते त्यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञताभावात राहिले. त्यांच्याविषयी त्यांची पत्नी श्रीमती स्मिता नवलकर यांना जाणवलेली काही सूत्रे येथे दिली आहेत.
१. लोकसंग्रह
१ अ. श्री. नवलकर कामानिमित्त नैनितालला गेले असतांना रुग्णाईत झाल्यावर तेथील उपाहारगृहाच्या (हॉटेलच्या) मालकीणबाईंनी त्यांची काळजी घेणे आणि तेव्हापासून नवलकर यांनी आई-मुलाच्या नात्याने त्यांना आदराने ‘माताजी’ असे संबोधणे : ‘नवलकर यांच्यामध्ये ‘माणसे जोडणे आणि संबंध टिकवणे’ हे वैशिष्ट्यपूर्ण गुण फार होते. आरंभी वयाच्या २० व्या वर्षी ते त्यांच्या मेहुण्यांच्या समवेत त्यांच्या ‘यात्रा आस्थापना’त काम करत होते. तेव्हा एकदा पूर्वनियोजनाच्या अंतर्गत ते उपाहारगृह, बस आरक्षण आणि अन्य तत्सम सेवा-सुविधा पहाण्यासाठी नैनितालला गेले होते. तिकडे गेल्यावर ते रुग्णाईत झाले. त्या वेळी तेथील ‘अशोक’ उपाहारगृहाच्या मालकीणबाई श्रीमती सावित्री साह यांनी त्यांची काळजी घेतली. तेव्हापासून त्यांचे आई-मुलाचे नाते जडले. नवलकर त्यांना ‘माताजी’ म्हणायचे.
१ आ. श्री. नवलकर यांचे माताजींशी आई-मुलाच्या नात्यामुळे निर्माण झालेले संबंध माताजींच्या ४ पिढ्या आणि श्री. नवलकरांच्या निधनानंतरही टिकून असणे : माताजींना ४ सुपुत्र होते. त्या नवलकर यांना म्हणाल्या, ‘‘तू माझा मोठा मुलगा !’’ तेव्हापासून जोडलेले त्यांचे आई-मुलाचे नाते माताजी, त्यांची मुले-सुना, नातवंडे आणि पतवंडे असे ४ पिढ्या टिकून आहे. माताजी घरातील महत्त्वाचे निर्णय, उदा. नवीन उपाहारगृह बांधणे, लग्नकार्य अथवा अन्य निर्णय नवलकरांना विचारून घ्यायच्या. त्यांच्या नवीन ‘हॉटेल्स’ची नावेसुद्धा नवलकरांनीच ठेवली आहेत. नवलकरांच्या निधनानंतर ते सर्वजण मला भेटायला आले होते आणि अधून-मधून ते संपर्क करून माझी विचारपूस करतात.
१ इ. श्री. नवलकरांनी केवळ उच्चभ्रू समाजच जोडला नाही, तर मुंबईतील ओझेवाले (हमाल) आणि डबेवाले यांच्यासाठीही त्यांनी काही मास सत्संग घेण्याचे नियोजन केले होते.
२. समाजातील ओळखीचा उपयोग अध्यात्म प्रसारासाठी करणे
२ अ. मुंबईतील रेल्वेस्थानकांवर प्रदर्शन लावण्यासाठी रेल्वेच्या पदाधिकार्यांची भेट घेणे : आरंभी प्रसारसेवा करतांना सनातनचे साधक रेल्वेस्थानकाच्या बाहेर सनातनच्या नियतकालिकांचे वितरण करायचे. तेव्हा श्री. नवलकरांनी रेल्वेच्या जनसंपर्क अधिकार्याची (‘Public Relation Officer’ची) भेट घेण्याचे ठरवले. तेव्हा सद्गुरु राजेंद्रदादा (सद्गुरु राजेंद्र शिंदे) रेल्वेतच नोकरीला होते. ते म्हणाले, ‘‘त्या अधिकार्याचा स्वभाव फार कडक आहे. आम्ही त्यांच्याकडे जायलाही घाबरतो.’’ तेव्हा नवलकर म्हणाले, ‘‘तुम्ही केवळ मला त्यांच्या भेटीची वेळ सांगा. पुढचे मी बघतो.’’
२ आ. रेल्वेच्या त्या पदाधिकार्याने मुंबईतील अनेक ठिकाणच्या रेल्वेस्थानकांवर सनातनचे ग्रंथप्रदर्शन लावण्याची अनुमती देणे, तेव्हा सद्गुरु राजेंद्र शिंदे आणि अन्य साधक यांना पुष्कळ आश्चर्य वाटणे : त्या अधिकार्यांच्या भेटीची वेळ मिळाल्यावर श्री. नवलकर त्यांना भेटायला गेले. त्या पदाधिकार्याने उभे राहून त्यांचे स्वागत केले आणि आदराने त्यांना बसायला सांगितले. नवलकरांनी त्यांना सनातन संस्थेचे कार्य सांगितले आणि समवेत नेलेले विनंतीपत्र (अर्ज) दिले. त्या पदाधिकार्यांनी त्यांच्या एका अधिकार्याला बोलावून त्याविषयी चर्चा केली आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’, दादर, बोरिवली यांसह अन्य स्थानकांवरही सनातन संस्थेच्या ग्रंथविक्रीचे प्रदर्शन लावण्याची अनुमती दिली. त्या अधिकार्यांनी अनुमती दिल्यावर सद्गुरु राजेंद्रदादा आणि श्री. प्रशांत कुलकर्णी यांना आश्चर्याचा धक्का बसला.
३. श्री. नवलकरांना सर्व संतांविषयी पुष्कळ आदर होता. ते सर्वांशी पुष्कळ नम्रतेने बोलायचे आणि वागायचे.
४. आज्ञापालन
अ. श्री. नवलकर नेहमी केसांना कलप लावायचे. एकदा सद्गुरु राजेंद्रदादा यांनी त्यांना ‘केसांना कलप लावू नका. त्याने वाईट शक्ती आकृष्ट होतात’, असे सांगितले. तेव्हापासून त्यांनी कलप लावायचे बंद केले.
आ. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये आलेल्या सूचना आणि सनातनच्या आश्रमातील सर्व कार्यपद्धती यांचे ते आस्थेने पालन करायचे.
५. श्रद्धा
५ अ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले कधी काही न्यून पडू देणार नाहीत’, अशी श्रद्धा असणे : त्यांच्या दानशूर वृत्तीमुळे माझी चिडचिड व्हायची. कुणीही त्यांच्याकडे असलेले काही मागितल्यावर ते लगेच देऊन टाकायचे. त्यांच्या या वृत्तीमुळे काही जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी यांनी त्यांचा अपलाभ घेतला. त्यावर मी चिडले की, ते म्हणायचे, ‘तू कशाला काळजी करतेस ? आपले प.पू. गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) आहेत ना ! ते आपल्याला काहीही उणे पडू देणार नाहीत.’ त्यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर अपार श्रद्धा होती.
५ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी नवलकरांची इच्छा जाणून त्यांना भेटीला बोलवणे आणि पुष्कळ वेळ त्यांचे हात स्वतःच्या हातात धरून त्यांच्याकडे पहाणे : बर्याच वर्षांत नवलकरांची प.पू. गुरुदेवांशी भेट झाली नव्हती. त्यांना प.पू. गुरुदेवांच्या भेटीची फार इच्छा होती. मी एकदा रामनाथीला गेले होते. तेव्हा प.पू. गुरुदेवांनी त्यांची विचारपूस केली आणि ‘नवलकरांना इकडे घेऊन या’, असे मला सांगितले. त्याप्रमाणे मी त्यांना रामनाथीला घेऊन गेले होते. नवलकरांची प.पू. गुरुदेवांशी भेट झाली. तेव्हा प.पू. गुरुदेवांनी नवलकरांना जवळ घेतले. प.पू. गुरुदेवांनी बराच वेळ त्यांचे हात हातांत धरून ठेवले आणि ते त्यांच्याकडे पहात राहिले. त्या वेळी मला श्रीकृष्ण-सुदामा यांच्या भेटीची आठवण होऊन माझा भाव जागृत झाला.’
– श्रीमती स्मिता नवलकर (आताची आध्यात्मिक पातळी ६० टक्के), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१०.१२.२०२०)