शांत स्वभावाचे, मुलांना साधनेची गोडी लावणारे आणि भावपूर्ण अन् परिपूर्ण सेवा करणारे कोल्हापूर येथील श्री. रमेश साताप्पा कुळवमोडे (वय ६३ वर्षे) !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणारे श्री. अमोल रमेश कुळवमोडे यांना त्यांचे वडील कोल्हापूर येथील साधक श्री. रमेश साताप्पा कुळवमोडे यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. शांत स्वभाव
‘साधनेत येण्याच्या आधीपासूनच माझ्या बाबांचा स्वभाव शांत आहे. ते कधीही कुणाशी मोठ्या आवाजात किंवा रागाने बोलत नाहीत. समोरची व्यक्ती अयोग्य वागली, तरीही बाबा शांत राहूनच प्रत्येक कृती करतात.
२. काटकसरी स्वभाव
घरातील आर्थिक अडचणींमुळे अनेक वेळा बाबांना चांगले कपडे किंवा वस्तू मिळायच्या नाहीत; पण जे मिळायचे, त्यात बाबा समाधानी असायचे. मागील काही वर्षांत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने घरातील परिस्थितीत पालट झाला आहे. आता महागड्या वस्तू, कपडे आणि अन्य गोष्टी मिळाल्या, तरी बाबांना या वस्तूंची आसक्ती नाही. ते पूर्वीप्रमाणे काटकसरीपणानेच वागतात.
३. मुलांवर केलेले संस्कार
३ अ. मुलांना साधना करण्याची गोडी लावणे : लहानपणापासून बाबांनी आमच्यात (श्री. नरेंद्र (मोठा भाऊ) आणि मी) साधनेची आवड निर्माण केली. आम्ही ३ – ४ वर्षांचे असल्यापासून ते आम्हाला मंत्रपठण आणि नामजप करायला शिकवत असत. त्यांनी कधीही ‘आमचे शिक्षण कसे चालले आहे ?’, याविषयी विचारले नाही; परंतु आम्हाला साधना करण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले. बाबांना स्वत:चा रिक्शा व्यवसाय थांबवून सनातनचे साधक किंवा संत यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी जाणे शक्य होत नसे; पण ते आम्हा सर्वांना मार्गदर्शन ऐकायला जाण्यासाठी सांगत.
३ आ. मुलांना स्वावलंबी बनवणे : आम्ही १५ – १६ वर्षांचे झाल्यानंतर बाबांनी आम्हाला सरकारी कार्यालये आणि महाविद्यालय यांतील कामे अन् अधिकोषातील व्यवहार करायला सांगितले. त्यामुळे आम्हाला लहान वयातच ही कामे करण्याची सवय लागली. आम्हाला एखाद्या कार्यालयात जायचे असल्यास ते आदल्या दिवशी रात्री ‘त्या कार्यालयातील कामकाजाची पद्धत कशी असते ?’, हे समजावून सांगत.
३ इ. व्यावहारिक आणि आध्यात्मिक जीवनातील मार्गदर्शक बनणे : माझ्यातील ‘पूर्वग्रह’ या स्वभावदोषामुळे मला काही साधकांशी मनमोकळेपणाने बोलता येत नव्हते. बाबांनी मला याची अनेक वेळा जाणीव करून दिली. कालांतराने माझा बाबांकडे बघण्याचा दृष्टीकोन पालटत गेला. आता आमचे नाते केवळ ‘पिता-पुत्र’ असे न रहाता ते माझ्या व्यावहारिक आणि आध्यात्मिक जीवनातील मार्गदर्शकही बनले आहेत.
४. अपेक्षा नसणे
बाबांनी ‘कुटुंबियांनी नोकरी करून पैसे मिळवावे’, अशी अपेक्षा केली नाही. त्यांनी मला माझी आवड जोपासू दिली. त्यामुळे मी शिक्षणानंतर १० वर्षे संशोधनासाठी (जंगलतोडीचा वन्य प्राणी आणि वनस्पती यांवर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी) संपूर्ण भारतातील वनांत फिरू शकलो.
५. बाबा करत असलेली साधना आणि सेवा
५ अ. गुरुपौर्णिमेला अर्पण करणे : बाबांना रिक्शा चालवण्याच्या व्यवसायातून घरातील व्यय होण्यापुरते जेमतेम पैसे मिळायचे, तरीही ते प्रतिदिन पहिल्या मिळकतीतील पैसे बाजूला काढून ठेवत आणि हे साठलेले पैसे गुरुपौर्णिमेला अर्पण करत.
५ आ. भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा करणे : कोल्हापूर येथे सनातनच्या ग्रंथांची छपाई केली जाते. छपाई झाल्यानंतर ‘ती व्यवस्थित झाली आहे का ? ग्रंथांची बांधणी करतांना पाने योग्य क्रमांकाने लावली आहेत ना ?’, हे सर्व पडताळण्याची सेवा बाबा करतात. ‘सेवा व्यवस्थित केली नाही, तर अन्य साधकांना पुन्हा पडताळणी करावी लागेल’, असा विचार करून ते ‘सेवा परिपूर्ण कशी होईल ?’, याकडे लक्ष देतात.
ग्रंथ हाताळतांना ते ‘या ग्रंथांतून समाजात गुरुसंदेश पोचणार आहे’, असा भाव ठेवून सेवा करतात. सेवा झाल्यावर ते प्रत्येक ग्रंथ खोक्यात अतिशय व्यवस्थित ठेवतात. त्या खोक्यांकडे पाहिल्यावर सात्त्विक स्पंदने जाणवतात.
५ इ. परात्पर गुरु डॉक्टरांप्रती दृढ श्रद्धा : ४ – ५ वर्षांपूर्वी माझ्या आईची (सौ. शारदा कुळवमोड यांची) २ मोठी शस्त्रकर्मे झाली. त्या वेळी बाबा स्थिर होते. ‘गुरुच आपल्याला सर्व परिस्थितीतून तारून नेणार आहेत’, अशी त्यांची दृढ श्रद्धा होती.
६. सद्गुरु आणि साधक यांनी वडिलांचे केलेले कौतुक !
अ. काही वर्षांपूर्वी बाबांची सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्याशी भेट झाली होती. सद्गुरु पिंगळेकाकांनी बाबांमध्ये सात्त्विकता असल्याचे अन्य साधकांना सांगितले.
आ. कोल्हापूरमधील एक साधक नेहमी म्हणायचे, ‘‘बाबांची साधना एकलव्याप्रमाणे आहे.’’
७. रुग्णाईत वडिलांची छायाचित्रे पहातांना ‘ते भगवंताच्या अनुसंधानात आहेत’, असे जाणवून त्यांच्या शरिरावर शुभचिन्हे दिसणे
१५ ते २०.६.२०२१ या कालावधीत बाबांना ‘डेंग्यू’ हा आजार झाला होता. त्यामुळे त्यांना अन्नग्रहण करता येत नव्हते. त्या वेळी बाबांच्या छायाचित्रांकडे पाहिल्यावर ‘ते रुग्णाईत आहेत’, असे वाटतच नव्हते. ते सतत भगवंताच्या अनुसंधानात आहेत’, असे मला जाणवले. त्या वेळी त्यांच्या रक्तातील ‘हिमोग्लोबिन’चे प्रमाण ६ g\dl इतके अल्प होते. (सर्वसाधारणतः पुरुषांमध्ये ‘हिमोग्लोबिन’चे प्रमाण १३.५ ते १८.० g\dl असायला हवे.) बाबांच्या छायाचित्राकडे पाहिल्यावर ते आनंदी दिसत होते. त्यांच्या कपाळावरील तेज वाढल्याने कपाळावर गोलाकार पांढरा रंग दिसत होता. बाबांच्या छातीवर लहान लहान आकाराचे ५ – ६ ‘ॐ’ दिसत होते.
‘हे गुरुदेवा, आपल्या कृपेने मला हे सर्व लिहिता आले’, याबद्दल कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. अमोल रमेश कुळवमोडे (मुलगा), उंचगाव, कोल्हापूर (२९.७.२०२१)