परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘आपल्याला कुठलाही विचार सोडून देता आले पाहिजे’, या वाक्यावर ६८ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. रामानंद परब यांना सुचलेले विचार !
‘एकदा परात्पर गुरुदेव मला म्हणाले, ‘‘कुठलाही विचार मनात ठेवण्यापेक्षा आपल्याला तो सोडून देता आला पाहिजे.’’ त्यांच्या या वाक्यावर त्यांनी मला सुचवलेले विचार पुढे दिले आहेत.
१. प्रसंगांत अडकल्याने उच्च रक्तदाबासारखे आजार होणे
अनेक वेळा आपण भूतकाळात घडून गेलेल्या प्रसंगांचा विचार करतो आणि त्या विचारांत अडकतो. मनात वारंवार ते विचार येऊन आपला वेळ वाया जाऊन आपली साधना खर्च होते. आपण त्या प्रसंगांचा एवढा विचार करतो की, आपले शरीर आणि मन यांवर त्याचा दुष्परिणाम होतो. त्यामुळे काही जणांना उच्च रक्तदाबासारखी कधीही बरी न होणारी व्याधी होते.
२. तीव्र अहं आणि भावनाशीलता यांमुळे प्रसंगातून बाहेर पडता न येणे
काही वेळा मनात वारंवार विचार आले नाहीत, तरी ते आपल्या अंतर्मनात घर करतात, तर काही प्रसंगांचे आघात आपल्या मनावर खोलवर होतात. त्यामुळे तिथे व्रण निर्माण होऊन काही जणांना ‘ते प्रसंग मनातून काढणे पुष्कळ अवघड आहे’, असे वाटते; पण हा सर्व भावनांचा खेळ आहे. ‘तीव्र अहं आणि भावनाशीलता यांमुळे आपल्यालाच त्या विचारांतून बाहेर पडावे’, असे वाटत नाही. या प्रसंगांत अडकल्यामुळे आपले साधनेचे दिवस वाया जातात. मनाचा निश्चय करून जेव्हा आपण त्या प्रसंगांतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा गुरुकृपेने आपण त्या विचारांवर मात करू शकतो.
३. प्रसंगांतून बाहेर पडण्यासाठी करायचे उपाय
३ अ. आध्यात्मिक मित्र किंवा मैत्रीण यांच्याशी मोकळेपणे बोलल्यावर प्रसंगातून बाहेर पडण्यास साहाय्य होणे : ‘आपल्या जीवनात घडलेले सर्व प्रसंग मोकळेपणाने सांगता येण्यासाठी आपल्याला आध्यात्मिक मित्र किंवा मैत्रीण असणे आवश्यक असते. आपला आध्यात्मिक मित्र किंवा मैत्रीण आपल्याला त्या त्या प्रसंगात योग्य दृष्टीकोन देतात. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे कठीण प्रसंगांतून सहजपणे बाहेर पडण्यास साहाय्य होते आणि साधनेत पुढे जाता येते.
३ आ. प्रसंग एका कोर्या कागदावर लिहून त्याच्या भोवती नामजपाचे मंडल काढणे : आपल्याला आध्यात्मिक मित्र किंवा मैत्रीण नसेल, तर आपण कागद आणि पेन यांना मित्र मानावे. आपल्या मनाला त्रास देणारे आणि साधनेत प्रगती होण्यास अडथळे निर्माण करणारे विचार किंवा प्रसंग एका कोर्या कागदावर लिहावे. त्या लिखाणाच्या भोवती आपल्या उपास्यदेवतेच्या नामजपाचे मंडल काढावे. आपल्या विचारांच्या तीव्रतेनुसार दिवसातून २ – ३ वेळाही ते प्रसंग लिहू शकतो. नंतर तो कागद सूक्ष्मातून गुरुचरणी समर्पित करावा आणि मनातील त्रासदायक विचार नष्ट होण्यासाठी श्री गुरूंना प्रार्थना करावी. त्यानंतर तो कागद जाळून टाकावा. त्यामुळे मनात खोलवर असलेले प्रसंग नष्ट होण्यास साहाय्य होईल.
३ आ १. मनातील विचार किंवा प्रसंग कोर्या कागदावर लिहिल्यामुळे होणारे लाभ
अ. विचार किंवा प्रसंग यांचा आपल्या मनावर झालेला परिणाम पूर्णपणे नष्ट होऊन आपले मन आनंदी होण्यास साहाय्य होते. ‘कागद आणि पेन हे देवाने आपल्याला दिलेले मित्र आहेत’, असा भाव ठेवून त्याप्रमाणे कृती करावी.
आ. ‘आपण हे सर्व विचार श्री गुरूंच्या चरणी अर्पण करत आहोत’, असा भाव ठेवून कृती केल्यास आपले मन निर्मळ व्हायला साहाय्य होते.
इ. आपल्या मनातील विचार, विकल्प किंवा ताण नष्ट झाल्यामुळे आपले मन श्री गुरूंच्या चरणी लवकर समर्पित होण्यास साहाय्य होते. आपण परात्पर गुरु डॉक्टरांना अपेक्षित असा नामजप आणि साधना शीघ्र गतीने करू शकतो.’
– श्री. रामानंद परब (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ३८ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.३.२०२२)