संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या स्थायी सदस्यत्वाला रशियाचा पुन्हा पाठिंबा !
मॉस्को – संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व मिळण्यासाठी रशियाने पुन्हा एकदा पाठिंबा दिला आहे. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह म्हणाले, ‘‘भारत, ब्राझिल, जपान आणि जर्मनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्य म्हणून सहभागी होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. प्रादेशिक विविधतेसाठी हे एक चांगले लक्षण आहे.’’ मॉस्को येथे एका आंतरराष्ट्रीय मंचावर प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे देतांना लावरोव्ह यांनी ही प्रतिक्रिया दिली.
रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई पुढे म्हणाले की, भारत आर्थिक विकासात आघाडीवर असलेल्या देशांपैकी एक आहे. भारताला विविध समस्या सोडवण्याचा मोठा राजनैतिक अनुभव आहे. भारत ‘शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन’चा प्रमुख सदस्य आहे आणि संयुक्त राष्ट्रांमध्ये सक्रीय भूमिका बजावतो. जागतिक स्तरावर भारत आणि ब्राझिल यांची भूमिका महत्त्वाची असून, त्यांचा स्थायी सदस्य म्हणून परिषदेत समावेश करण्याविषयी विचार व्हायला हवा.