सिंधुदुर्ग येथे राष्ट्रीय वनौषधी संस्था उभारण्याच्या कार्यवाहीतील विलंबाविषयी लोकसभेत तारांकित प्रश्न उपस्थित !
मुंबई – सिंधुदुर्गामध्ये दोडामार्ग तालुक्यातील अडाळी येथे राष्ट्रीय वनौषधी संस्था स्थापन करण्याच्या केंद्रशासनाच्या प्रस्तावाला महाराष्ट्र शासनाने मे २०२१ मध्ये मान्यता देऊन दीड वर्षे झाले, तरी यावर कार्यवाही चालू झालेली नाही. खासदार विनायक राऊत यांनी ९ डिसेंबर या दिवशी लोकसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करून कामाला होणार्या विलंबाविषयी विचारणा केली. केंद्रीय आयुषमंत्री सर्बानंद सोणोवाल यांनी याविषयीचा प्रस्ताव मान्यतेसाठी वित्त विभागाकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती दिली.
खासदार राऊत यांनी ‘संस्थेच्या प्रस्तावाला केंद्र सरकारकडून कधीपर्यंत मान्यता मिळेल ?’ असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर ‘संस्थेचा विस्तृत प्रकल्प अहवाल सिद्ध करण्याचे काम चालू आहे. यासाठी स्थापना व्यय समितीचे अनुमोदन घ्यावयाचे आहे. ‘वित्त विभागाच्या मान्यतेनंतर हा प्रस्ताव केंद्रीय मंत्रीमंडळात चर्चेला येईल’, असे उत्तर केंद्रीय पियुषमंत्री सर्बानंद सोणोवाल यांनी दिले.
वित्त विभागाकडे पाठपुरावा करणार ! – खासदार विनायक राऊत
याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना खासदार विनायक राऊत म्हणाले, ‘‘ही प्रक्रिया गतीने व्हावी, यासाठी मी ३ वेळा आयुष मंत्रालयात पाठपुरावा केला. सध्या हा प्रस्ताव वित्त विभागाकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे. येत्या ३-४ दिवसांत याविषयी वित्त विभागातील प्रशासकीय अधिकार्यांची भेट घेऊन त्याविषयीची माहिती मी घेणार आहे.