अनिल देशमुख यांना जामीन संमत; मात्र न्यायालयाकडून १० दिवसांची स्थगिती !
मुंबई – माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना १२ डिसेंबर या दिवशी १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर मुंबई उच्च न्यायालयाने जामीन संमत केला; परंतु केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने या निर्णयाला १० दिवसांची स्थगिती देण्याची विनंती केली. केंद्रीय अन्वेषण यंत्रणेची मागणी न्यायालयाने मान्य केली आहे. त्यामुळे जामीन मिळाला असला, तरी पुढील १० दिवस अनिल देशमुख यांना कारागृहातच रहावे लागणार आहे.
न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपिठापुढे ही सुनावणी झाली. न्यायालयाने जामीन संमत करतांना देशमुख यांना पारपत्र अन्वेषण यंत्रणेकडे जमा करण्याचे, तसेच आठवड्यातून २ दिवस अंमलबजावणी संचालनालयात उपस्थित रहाण्याच्या अटी घातल्या आहेत. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुंबईतील बारच्या मालकांकडून १०० कोटी रुपये वसूल करण्याचा आदेश अनिल देशमुख यांनी दिल्याचा आरोप केला होता. यावरून अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली होती.