मद्यालये आणि बार यांना देवतांची नावे न देण्याच्या शासन निर्णयावर ७ मासांत एकही कारवाई नाही !

देवतांची नावे कोणती ? याविषयी स्पष्टता नसल्यामुळे कारवाईविषयी संभ्रम !

मुंबई, १० डिसेंबर (वार्ता.) – मद्यालये आणि बार यांना देवता, राष्ट्रपुरुष, महनीय व्यक्ती आणि गड-दुर्ग यांची नावे देण्यात येऊ नयेत, असा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. ७ एप्रिल २०२२ या दिवशी याविषयीचा शासन आदेश काढण्यात आला. नावे पालटण्यासाठी ३० जूनपर्यंत समयमर्यादाही देण्यात आली; परंतु मागील ७ मासांत राज्यात याविषयी एकही कारवाई झालेली नाही. यासह याविषयीचा मागील अहवालही सरकारकडे आलेला नाही.

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी याविषयीचा तारांकित प्रश्‍न विधान परिषदेत उपस्थित केला होता. यावर कार्यवाही करत सरकारने याविषयी काढलेल्या शासन आदेशात मद्यालये आणि बार यांना असू नयेत अशी ५६ राष्ट्रीय आणि महनीय व्यक्तींची नावे, तर १०५ गड-दुर्गांची नावे देण्यात आली आहेत; मात्र यामध्ये देवतांची नावे देण्यात आलेली नाहीत. राज्यात मद्यालये आणि बार यांना ‘लक्ष्मी’, ‘साई’, ‘गोपाळ’, ‘हृषीकेश’ आदी देवतांची नावे आहेत; मात्र आदेशात स्पष्ट उल्लेख नसल्यामुळे त्यांवर कारवाही होऊ शकलेली नाही. त्यामुळे याविषयी हिंदु धर्मातील देवता, तसेच अन्य धर्मातील श्रद्धास्थाने यांविषयी सरकारने नावे निश्‍चित करणे आवश्यक आहे. देवतांविषयी नावांचा स्पष्ट उल्लेख नसला, तरी राष्ट्रपुरुष, महनीय व्यक्ती, गड-दुर्ग यांच्या नावांचा उल्लेख असूनही अशी नावे असलेली मद्यालये आणि बार यांच्यावरील कारवाईचा अहवालही अद्याप सरकारकडे आलेला नाही.

कारवाईचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही ! – उत्पादन शुल्क विभाग

याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त बोडके यांची भेट घेतली असता त्यांनी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकार्‍यांना याविषयी कळवण्यात आले आहे, तसेच याविषयीचा अहवालही त्यांच्याकडे मागवण्यात आला आहे; परंतु अद्याप अहवाल प्राप्त झालेला नाही.


हिंदु जनजागृती समितीने केली होती मागणी !

मद्यालयांना देवता आणि राष्ट्रपुरुष यांची नावे देण्यात येऊ नयेत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आमदार डॉ. मनीषा कायंदे यांची भेट घेऊन त्यांना करण्यात आली होती. यानंतर डॉ. मनीषा कायंदे यांनी हा प्रश्‍न विधान परिषदेत उपस्थित केला होता.

मद्यालये आणि बार यांना देवता, राष्ट्रपुरुष अन् गड-दुर्ग यांची नावे न देण्याचा शासनाचा निर्णय !


कार्यवाही न करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करावी ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

श्री. सुनील घनवट

सरकारला हिंदूंच्या देवतांची नावे माहिती नाहीत का ? राज्यात श्रीराम, श्रीगणेश या देवतांच्या, तसेच अहिल्यादेवी आदी श्रद्धेय व्यक्तींच्या नावाने बिअर शॉपी, मद्यालये आदी आहेत. देवतांच्या नावांची मद्यालये, मटणशॉप असणे, हे अवमानकारक आहे. यासाठी कुणी तक्रार केल्यानंतर कारवाई करण्याऐवजी सरकारने स्वत:हून कारवाई करणे अपेक्षित आहे. शासन आदेशात राष्ट्रपुरुष आणि गड-दुर्ग यांची नावेही स्पष्ट दिलेली आहेत. त्यांवरही प्रशासनाकडून अद्याप कारवाई का करण्यात आली नाही ? सरकारच्या आदेशानंतरही कार्यवाही का झाली नाही ? याविषयी चौकशी करून दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करावी.