( फल ) ज्योतिषशास्त्राकडे भारतीय दृष्टीकोनातून पहाण्याची आवश्यकता !

‘काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी नाशिक येथील एका मंदिराला भेट देऊन ज्योतिषांचा सल्ला घेतल्याची चर्चा माध्यमांमध्ये पसरली. तेव्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मुख्यमंत्र्यांवर ‘हे जर खरे असेल, तर ही अत्यंत बेजबाबदार कृती आहे’, अशी टीका केली. पुरोगाम्यांचा भारतीय शास्त्रांकडे पहाण्याच्या संकुचित दृष्टीकोनाविषयी या लेखात विवेचन केले आहे.


१. ज्योतिष हे काल-दिग्दर्शनाचे शास्त्र !

जीवनातील अनुकूल आणि प्रतिकूल काळाचा बोध (फल) ज्योतिषशास्त्राद्वारे होतो. त्यामुळे ज्योतिषांचा सल्ला घेणे, हा काळाचा बोध करून घेण्याचा प्रयत्न आहे. योग्य काळात योग्य प्रयत्न केल्यास कार्य यशस्वी होते. देशातील कित्येक राजकारणी त्यांची राजकीय कारकीर्द यशस्वी होण्याच्या दृष्टीने ज्योतिषांचा सल्ला घेतात.

२. भारतीय शास्त्रांकडे भारतीयदृष्टीकोनातून पहाण्याची आवश्यकता

श्री. राज कर्वे

पुरोगाम्यांच्या मते ज्योतिषशास्त्र ‘अवैज्ञानिक’ आहे. सध्याच्या काळात विज्ञानाचा अर्थ ‘भौतिक विज्ञान’ एवढाच गृहित धरला जातो. पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांना अनुभवास येईल तेवढ्याच गोष्टी सांप्रत विज्ञानास मान्य आहेत; परंतु भारतीय विचारधारा केवळ भौतिकवादावर कधीच अवलंबून राहिलेली नाही. भारतीय दृष्टीकोनातून विज्ञानाची आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक अशी ३ अंगे आहेत. भारतीय शास्त्रांमध्ये या तिन्ही अंगांचा अवलंब केलेला आहे. (फल)ज्योतिषशास्त्र हे प्राचीन भारतीय शास्त्र असल्यामुळे त्याकडे भारतीय दृष्टीने पहाण्याची आवश्यकता आहे. केवळ ज्योतिषशास्त्रच नव्हे, तर वास्तुशास्त्र, अंकशास्त्र, मंत्रशास्त्र, यज्ञविज्ञान, योगशास्त्र आदी हिंदु शास्त्रांकडे भारतीय दृष्टीकोनातून पाहिले, तरच त्यांच्यामागील विज्ञान कळते. भौतिक विज्ञानाच्या अपुर्‍या मापदंडांनी या शास्त्रांची परीक्षा होऊ शकत नाही.

३. भौतिकवादाच्या अतिरेकामुळे झालेल्या दुष्परिणामांकडे पुरोगाम्यांचे दुर्लक्ष

अंधश्रद्धा निर्मूलन समिती किंवा तत्सम पुरोगामी मंडळी भौतिकवादाच्या चौकटीत अडकलेले असल्याने भारतीय धर्म आणि संस्कृती यांचे मोल ते जाणत नाहीत. पाश्चात्त्यांच्या भौतिक आविष्कारांमुळे (शोधांमुळे) प्रभावित होऊन सृष्टीकडे पहाण्याची त्यांची दृष्टी सीमित झाली आहे; मात्र भौतिकवादाच्या अतिरेकामुळे झालेले दुष्परिणाम ते सोयीस्कररित्या विसरतात. भूमी, जल, वायू आदींचे वाढते प्रदूषण, प्रकृतीचा अभूतपूर्व र्‍हास, मानवाचे खालावलेले आरोग्य, वाढती अनैतिकता, त्यामुळे बळावलेले मनोविकार, स्वार्थलोलुपता, भ्रष्टाचार, महागाई, अनावश्यक युद्धे, असुरक्षितता आदींमुळे सामान्य मनुष्याचे जगणे कठीण झाले आहे. आधुनिकतावाद्यांनी यावर गंभीरतेने विचार करायला हवा.

४. ज्योतिषशास्त्राला न्यायालय आणि सरकार यांचा पाठिंबा

सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी ज्योतिष हे विज्ञान असल्याचे म्हटले आहे, तसेच ‘काही थोड्या लोकांनी ज्योतिषाला विरोध केला, म्हणजे विज्ञानयुगात ज्योतिष थोतांड ठरत नाही’, अशी टिपण्णीही न्यायालयाने केली होती. मुंबई उच्च न्यायालयामध्ये केंद्र सरकारने ‘ज्योतिषशास्त्र हे ४ सहस्र वर्षे जुने विज्ञान असून यावर बंदी आणली जाऊ शकत नाही’, असे म्हटले होते. ज्योतिषशास्त्र सहस्रो वर्षे टिकले आहे, याचा अर्थ त्यात तथ्य आहे आणि समाजाला या शास्त्राची आवश्यकता आहे.

५. अंनिसकडून केवळ हिंदूंच्या श्रद्धा, सण-उत्सव, परंपरा, शास्त्रे आदींना लक्ष्य

अंनिसने एखाद्याला आव्हान दिल्यानंतर ते आव्हान पूर्ण होतांना अंनिसवाले पलायन करतात, हा आजवरचा इतिहास आहे. अंनिसकडून केवळ हिंदूंच्या श्रद्धा, सण-उत्सव, परंपरा, शास्त्रे आदींना लक्ष्य करण्यात येते. ‘अमुक शास्त्र सिद्ध करा आणि अमुक लाख रुपये जिंका !’, अशा प्रकारची आव्हाने देऊन अंनिस प्राचीन शास्त्रांना पैशांत तोलू पहाते. ज्योतिषशास्त्राला विरोध करणारे अनेक जण वैयक्तिक जीवनात ज्योतिषांचा सल्ला घेतात, असा अनेक ज्योतिषांचा अनुभव आहे. त्यामुळे केवळ विरोधासाठी विरोध न करता भारतीय शास्त्रांमागील विज्ञान जाणून घेण्यासाठी प्रयत्न करणे, हा खरा बुद्धीवाद ठरेल.

– श्री. राज कर्वे, ज्योतिष विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२६.११.२०२२)