महाराष्ट्र सरकार वेगाने काम करत आहे ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान
-
भाषणाचा प्रारंभ मराठीतून !
-
महामार्गामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याचे प्रतिपादन !
नागपूर – आज संकष्टी चतुर्थी आहे. कोणतेही शुभकाम करतांना आपण प्रथम गणेशपूजन करतो. आज नागपुरात असल्याने टेकडीच्या गणपतीबाप्पाला माझं वंदन ! स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या अमृत महोत्सवात ७५ सहस्र कोटींच्या या विकासकामांसाठी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या जनतेचे अभिनंदन ! आजच्या या विकासकामांमधून सरकार महाराष्ट्रात वेगाने काम करत असल्याचे दर्शवत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर या दिवशी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्ग, तसेच इतर विकासकामे यांचे उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी झालेल्या जाहीर कार्यक्रमात भाषण देतांना त्यांनी वरील उद्गार काढले. त्यांनी भाषणाचा प्रारंभ मराठीतून केल्याने उपस्थितांनी टाळ्या वाजवत त्यांचे ‘विकासकामांचे उद्घाटन करतांना मला आनंद होत आहे’, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
ते पुढे म्हणाले,…
१. समृद्धी महामार्गामुळे नागपूर आणि मुंबईतील अंतर न्यून होईलच; पण २४ जिल्ह्यांनाही हा मार्ग जोडत असल्याने शेतकरी, भाविक, तसेच उद्योग यांना पुष्कळ लाभ होईल. रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील.
२. पायाभूत सुविधांना मानवी स्पर्श देणारे सरकार सध्या देशात आहे. प्रत्येक गरिबाला ५ लाखांपर्यंत विनामूल्य उपचार देणारी ‘आयुषमान भारत योजना’ सामाजिक पायाभूत सुविधेचे उदाहरण आहे. उज्जैनपासून ते पंढरपूरर्यंत आपल्या प्रार्थनास्थळांचा विकास हे आपल्या सांस्कृतिक पायाभूत सुविधांचे उदाहरण आहे. ४५ कोटींपेक्षा अधिख गरिबांना बँकिंग प्रणालीशी जोडणारी जनधन योजना हेही आपल्या आर्थिक पायाभूत सुविधेचे उदाहरण आहे. पायाभूत सुविधांना फक्त निर्जीव रस्ते आणि फ्लायओव्हर यांच्यापुरते मर्यादित ठेवू शकत नाही. याचा विस्तार पुष्कळ मोठा आहे.
३. ३०-३५ वर्षांपूर्वी गोसेखुर्द धरणाचे भूमीपूजन करण्यात आले. त्या वेळी ४०० कोटींचा खर्च अपेक्षित होता; पण विलंबामुळे त्या प्रकल्पाचा अंदाजे खर्च ४०० कोटींहून १८ सहस्र कोटींवर गेला. वर्ष २०१७ मध्ये आपले सरकार आल्यानंतर या धरणाचे काम वेगाने चालू झाले. सर्व समस्या सोडवण्यात आल्या. या वर्षी हे धरण पूर्ण भरले, याचा आनंद आहे. यासाठी तीन दशकांहून अधिक काळ लागला.
४. आम्ही ‘सबका साथ, सबका विश्वास, सबका विकास, सबका प्रयास’ यावर भर देत आहोत. मी जेव्हा ‘सबका प्रयास’ म्हणतो, तेव्हा त्यात प्रत्येक नागरिक आणि राज्य सहभागी असते. सर्वांचे सामर्थ्य वाढल्यासच भारताचा विकास होईल. यामुळे वंचित राहिलेल्यांना, तसेच ज्यांना लहान समजण्यात आले, त्यांना आम्ही प्रोत्साहन देत आहोत.
विकासाचे ११ तारे !मोदी म्हणाले, ‘‘११ डिसेंबर हा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आज महाराष्ट्राच्या विकासासाठी ११ तारका (११ प्रकल्प) उदयाला येत आहेत. हे महानक्षत्र महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा आणि ऊर्जा देईल. आज संकष्टी चतुर्थीच्या दिवशीच महाराष्ट्राच्या नक्षत्रात ११ तारे जोडले गेले आहेत. समृद्धी महामार्ग हा पहिला तारा आहे. नागपूर एम्स रुग्णालय हा दुसरा तारा आहे. नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण तसेच, दुसर्या टप्प्याचे भूमीपूजन हा तिसरा तारा आहे. राष्ट्रीय वन हेल्थ संस्था (एन्आयओ), नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प, चंद्रपूर येथील केंद्रीय पेट्रोकेमिकल्स अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान (सीआयपीईटी) संस्था, चंद्रपूरमधील ‘हिमोग्लोबिनोपॅथी संशोधन, व्यवस्थापन आणि नियंत्रण केंद्र यांसह अन्य हे ११ तारे आहेत. या तार्यांमुळे महाराष्ट्राचा विकास लखलखणार आहे.’’ |