सोलापूर येथील प्राचार्य डॉ. विजय आठवले यांना ‘राष्ट्रीय कृषीभूषण’ पुरस्कार प्रदान !
सोलापूर – शेतकरी आणि शेतीपूरक व्यवसाय वृद्धींगत होण्यासाठी मौलिक योगदान देणारे डब्लू.आय.टी.चे (‘वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजी’चे) प्राचार्य डॉ. विजय आठवले यांना ‘राष्ट्रीय कृषीभूषण’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. भोपाळ येथे पार पडलेल्या ‘कृषी मंथन’ या कार्यक्रमात एस्.आय.ए.इ.टी.चे (‘स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रिकल्चरल एक्स्टेंशन अँड ट्रेनिंग’चे) संचालक डॉ. द्वारिका सिंह यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. विजय आठवले हे रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमात ग्रंथ लिखाणाची सेवा करणारे पू. अनंत आठवले (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे ज्येष्ठ बंधू) यांचे पुत्र आहेत.
शेतीपूरक व्यवसाय वृद्धींगत होण्यासाठी कृषक ‘ॲप’ची निर्मिती !
डॉ. विजय आठवले यांनी शेतकरी आणि शेतीपूरक व्यवसाय वृद्धींगत होण्याच्या दृष्टीने कृषक ‘भ्रमणभाष ॲप’ सिद्ध केले आहे. या ‘ॲप’द्वारे शेतकर्यांना बी-बियाणांपासून, हवामानाचा अंदाज, भूमीचा पोत, खरेदी-विक्री यांची संपूर्ण माहिती एका ‘क्लिक’वर मिळणार आहे. डॉ. विजय आठवले यांचे शेतीसंबंधी विविधांगी प्रयोग सातत्याने चालू असतात. त्यांची नोंद घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
संशोधनातून प्राणीमात्रांना लाभ होण्यासाठी मी प्रयत्नरत असतो ! – प्राचार्य डॉ. विजय आठवले
आपण जे संशोधन करतो, त्याचा जर लोकसेवेसाठी उपयोग होत नसेल आणि त्याची कार्यवाही होऊ शकत नसेल, तर त्याचा काही उपयोग नाही. त्यामुळे माझे प्रयत्न हे नेहमीच असे असतात की, आपण जे संशोधन करतो त्याचा लाभ शेतकरी, मनुष्य, तसेच प्राणीमात्र यांनाही झाला पाहिजे. त्यांचे आयुष्य सुखकर-सोपे झाले पाहिजे.