तिथीचे महत्त्व आणि व्यक्तीची जन्मतिथी निश्चित करण्याची पद्धत
‘भारतीय कालमापन पद्धतीत ‘तिथी’ला महत्त्व आहे; परंतु सध्याच्या ‘ग्रेगोरीयन’ (युरोपीय) कालगणनेमुळे भारतात तिथीचा उपयोग व्यवहारात न होता केवळ धार्मिक कार्यांसाठी होतो. प्रस्तुत लेखाद्वारे तिथीचे महत्त्व आणि व्यक्तीची जन्मतिथी निश्चित करण्याची पद्धत समजून घेऊया.
लेखांक ६
१. तिथी म्हणजे काय ?
अमावास्येला सूर्य आणि चंद्र एकत्र असतात. त्यानंतर चंद्र त्याच्या जलद गतीमुळे पूर्व दिशेने सूर्याच्या पुढे जाऊ लागतो. अशा प्रकारे सूर्य आणि चंद्र यांच्यात १२ अंशांचे अंतर झाल्यावर १ तिथी पूर्ण होते अन् २४ अंशांचे अंतर झाल्यावर २ तिथी पूर्ण होतात. अशा प्रकारे उत्तरोत्तर होऊन पुढील अमावास्येपर्यंत एकूण ३० तिथी होतात.
२. हिंदु धर्मात तिथीला महत्त्व असण्यामागील कारण
भारतीय कालमापन पद्धतीत मास (महिना) चंद्रावरून मोजला जातो. अमावास्यांत मास (अमावास्येला संपणारा) किंवा पौर्णिमांत मास (पौर्णिमेला संपणारा) अशी मासगणना केली जाते. आपले बहुतेक सण, उत्सव, देवतांच्या जयंती इत्यादी चांद्रमासानुसार म्हणजे तिथीनुसार साजरे केले जातात. याचे कारण म्हणजे सूर्याचा परिणाम अधिकतर स्थूल सृष्टीवर आणि स्थूल देहावर होतो, तर चंद्राचा परिणाम सूक्ष्म सृष्टीवरअन् सूक्ष्म देहावर (मनावर) होतो. स्थूल ऊर्जेपेक्षा सूक्ष्म ऊर्जा अधिक प्रभावी असते. शारीरिक बळापेक्षा मानसिक बळ अधिकमहत्त्वाचे असते. पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना सूर्य आणि चंद्र यांचा संयुक्त परिणाम पृथ्वीवर होतो. अतः हिंदु धर्मात दिनांकाऐवजी चंद्राच्या तिथीला महत्त्व दिले गेले आहे.
३. जन्मतिथीचे महत्त्व
व्यक्तीच्या जन्माच्या वेळी असलेल्या तिथीला ‘जन्मतिथी’ म्हणतात. विशिष्ट मास, तिथी आणि नक्षत्र हे नेहमी एकत्र असतात. उदा. मार्गशीर्ष पौर्णिमेला चंद्र मृग नक्षत्रात किंवा मृग नक्षत्राच्या जवळपासच्या नक्षत्रात असतो. जन्माच्या वेळी असलेली तिथी आणि नक्षत्र यांचा परिणाम व्यक्तीच्या मनावर होऊन तिचे व्यक्तीमत्त्व बनते.
हिंदु धर्मात सांगितल्यानुसार वाढदिवस जन्मतिथीवर साजरा केल्यास औक्षण, स्तोत्रपठण, ज्येष्ठांचे आशीर्वाद घेणे आदी कृतींमुळे व्यक्तीच्या सूक्ष्म देहाची (मनाची) सात्त्विकता वाढते, याउलट वाढदिवस जन्मदिनांकावर साजरा केल्यास केवळ स्थूल देहाला थोडाफार लाभ होतो. वाढदिवस पाश्चात्त्य पद्धतीने मेणबत्ती विझवून आणि केक कापून केल्यास कोणताही आध्यात्मिक लाभ होत नाही.
४. जन्माच्या क्षणी जी तिथी असेल, ती तिथी व्यक्तीची ‘’ असणे
आपण प्रतिदिन वापरतो त्या स्थानिक दिनदर्शिकेत दिनांकाजवळ तिथी लिहिलेली असते. ती तिथी त्या दिवशी सूर्याेदयाला स्पर्श करणारी तिथी असते. सूर्याेदयाच्या वेळी असणारी तिथी त्या दिवशी दिवसभर असेल, असे नाही. त्यामुळे जन्मतिथी ठरवतांना ‘बाळाच्या जन्माच्या क्षणी जी तिथी असेल’, ती तिथी जन्मतिथी म्हणून घ्यावी. उदाहरण ‘नवमी’ ही तिथी एखाद्या दिवशी दुपारी १ पर्यंत असेल आणि बाळाचा जन्म त्या दिवशी दुपारी १ नंतर झाल्यास त्याची जन्मतिथी ‘दशमी’ असेल. तिथींच्या समाप्तीच्या वेळा त्या त्या वर्षीच्या पंचांगांत किंवा स्थानिक दिनदर्शिकेच्या मागील पानांवर दिलेल्या असतात.
तिथीच्या संदर्भात साशंकता असल्यास ज्योतिषींकडून आपली जन्मतिथी योग्य असल्याची खात्री करावी.’
– श्री. राज धनंजय कर्वे, ज्योतिष विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२६.११.२०२२)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |