आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना आयुर्वेदाचे सखोल ज्ञान व्हावे, यासाठी तळमळीने प्रयत्न करणारे नगर जिल्ह्यातील काही ज्येष्ठ वैद्य

१. वैद्य सतीश भट्टड

वैद्य सतीश भट्टड

‘गेल्या ३० वर्षांपासून श्रीरामपूर येथे आयुर्वेदाचे उपचार करतात. त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ‘आयुर्वेदाच्या उपचारांनी उशिरा गुण येतो’, असा अपसमज समाजामध्ये रूढ झाला आहे; परंतु वैद्य भट्टड ‘सद्यो वमन (तत्काळ उलटी करवणे)’, रक्तमोक्षण (शिरेवाटे रक्त काढणे), बस्ती (औषधी ‘एनिमा’ देणे) इत्यादी उपचारांनी शास्त्रशुद्ध उपचार करून रुग्णांना तत्काळ गुण मिळवून देतात. ‘प्रभा आयुर्वेद’ या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांना विनामूल्य ज्ञानदान केले आहे आणि करत आहेत. भारताच्या विविध भागांतील, तसेच नेपाळमधील वैद्यांनाही ते मार्गदर्शन करतात. सध्या ते ‘महाराष्ट्र आयुर्वेद संमेलन’चे अध्यक्ष आहेत.

वडाळा महादेव (नगर) येथील प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांनी त्यांना दीक्षा दिली आहे. आयुर्वेदातील पंचकर्माचा व्यापक स्तरावर प्रसार करणारे कै. वैद्य प्र.ता. जोशी यांचे ते शिष्य आहेत. सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाण्याचा त्यांचा स्वभाव आहे. ते शिस्तप्रिय असून त्यांच्यात उत्तम संघटन कौशल्य आहे.

२. वैद्य रामदास आव्हाड

वैद्य रामदास आव्हाड

हे कोपरगाव (नगर) येथे रहातात. पूर्वी इतरांचा शहरात जाण्याचा कल होता. त्या वेळी त्यांनी आपल्या गावी शुद्ध आयुर्वेद उपचार देण्यासाठी चिकित्सालय चालू केले. त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ते अनेक वर्षांपासून शिर्डी येथील साई संस्थान रुग्णालयामध्ये प्रत्येक गुरुवारी विनामूल्य सेवा देतात. ‘त्यांचा हातगुण चांगला आहे’, अशी त्यांची ख्याती आहे. ‘इतर वैद्यांनी एखादे औषध देऊन काही लाभ झाला नाही, तरी वैद्य आव्हाड यांनी तेच औषध रुग्णाला दिले, तर रुग्णाला लाभ होतो’, असे त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी अनुभवले आहे. ‘वंध्यत्व (मूलबाळ न होणे)’ या व्याधीवर त्यांचे विशेष कार्य आहे. त्यांनी अनेक निराश दांपत्यांना संतानप्राप्तीचा मार्ग उघडून दिला आहे. ते राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापिठाच्या अंतर्गत ‘राष्ट्रीय आयुर्वेद गुरु’ आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी घडले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये ते पुष्कळ लोकप्रिय आहेत. प्रत्येक मासाला त्यांच्याकडे विद्यार्थी शिकायला येत असतात. त्यांच्याकडे शिकायला येणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या एवढी आहे की, सध्या त्यांच्याकडे प्रवेश मिळण्यासाठी रांगेत अन्य विद्यार्थी असल्याने नवीन विद्यार्थ्यांना १ वर्ष प्रतीक्षा करावी लागते. ते ‘प्रभा आयुर्वेद फाऊंडेशन’ आणि ‘महाराष्ट्र आयुर्वेद संमेलन’ यांच्या प्रमुखपदी आहेत.

३. वैद्य महेंद्र शिंदे

वैद्य महेंद्र शिंदे

हे मूळचे नेवासा (जिल्हा नगर) येथील असून सध्या नगर शहरात येथे स्थायिक झाले आहेत. हे शास्त्रशुद्ध पद्धतीने आयुर्वेदाच्या औषधांची निर्मिती करण्यात निपुण आहेत. सांगली येथील कै. वैद्य आत्माराम दातारशास्त्री यांचे त्यांना सान्निध्य लाभले होते. वैद्य दातारगुरुजींच्या ‘पाचभौतिक पद्धती’नुसार ते उपचार करतात. ते नेहमी हसतमुख असतात. त्यांचा स्वभाव मनमिळावू असून अहं अल्प आहे. ते श्री श्री रविशंकरजी यांच्या ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ संप्रदायानुसार साधना करतात. त्यांनी आयुर्वेदाचे विद्यार्थी आणि वैद्य यांच्यासाठी आयुर्वेदाच्या औषधांच्या निर्मितीच्या अनेक कार्यशाळा आयोजित केल्या आहेत.’

– वैद्य अमित मकवाना, श्रीरामपूर, जिल्हा नगर (८.१२.२०२२)