पुणे येथे विरुद्ध बाजूने आलेल्या कंटेनरची अनेक वाहनांना धडक !
पुणे – चाकणमधील वाहतूक कोंडी टाळता यावी, यासाठी चाकण-शिक्रापूर मार्गावरील शिक्रापूर बाजूकडून चाकणकडे येणारी सर्व प्रकारची वाहने तळेगाव, मुंबईकडे जाण्यासाठी माणिक चौकातून जुन्या पुणे मार्गाने वळवण्यात येत आहेत. मुटकेवाडी ते चाकण यांमध्ये एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. असे असतांनाही ९ डिसेंबर या दिवशी सायंकाळी एक अवजड कंटेनर मुटकेवाडी बाजूकडून चाकण बाजूकडे, विरुद्ध बाजूने भरधाव वेगात आला. रस्त्यालगत उभ्या असलेल्या अनेक दुचाकी आणि एक बस यांना या कंटेनरने धडक दिली. यात अनेक दुचाकींची हानी झाली आहे. सुदैवाने यात कुणीही घायाळ झाले नाही; मात्र संतप्त नागरिकांनी वाहनचालकाला चोप देऊन या मार्गावरून अवजड वाहतूक वळवू नये, अशी मागणी केली आहे. चाकण पोलिसांनी कंटेनरसह चालकास कह्यात घेतले आहे. या रस्त्यावरील अवजड वाहतूक थांबवण्यासाठी निवेदने देण्यात येतील.