पुणे येथे जिल्हाधिकार्यांच्या आवाहनानंतरही रिक्शा संघटना १२ डिसेंबरपासून बंद पुकारणार !
पुणे – राज्यात अवैधरित्या आणि विनाअनुमती चालणार्या ‘बाईक टॅक्सी ॲप’वर बंदी घालण्याविषयी जिल्हा प्रशासनाकडून गृह अन् परिवहन विभागाकडे पाठपुरावा करण्यात येत असून नागरिकांना होणारी असुविधा टाळण्यासाठी, तसेच जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती कायम राखण्यासाठी रिक्शाचालकांनी १२ डिसेंबरचे आंदोलन करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी केले होते. या आवाहनानंतर रिक्शा संघटनांनीही जिल्हाधिकार्यांना प्रती आवाहन केले आहे; पण एकूणच रिक्शा संघटनांचे प्रती आवाहन पहाता १२ डिसेंबरपासून पुन्हा शहरात रिक्शा संघटनांकडून बंद पुकारण्यात येणार आहे.
सर्व रिक्शाचालकांच्या कुटुंबियांना अवैध ‘बाईक टॅक्सी’ बंद होईपर्यंत शिधा पुरवण्यात यावा. जे जे रिक्शाचालक घराची भाडी भरू शकणार नाहीत, त्यांना रहाण्यासाठी प्रशासनाने निर्वासितांप्रमाणे छावण्या चालू कराव्यात. सर्व शाळांना तंबी द्यावी की, शुल्क भरण्यास, कपडे आणि पुस्तके खरेदी करण्यास रिक्शाचालकांच्या मुलांना ‘बाईक टॅक्सी’ बंद होइपर्यंत सवलत द्यावी, असे प्रती आवाहन या वेळी रिक्शा संघटनेकडून करण्यात आले आहे.