पुणे महापालिकेकडे असलेल्या १ सहस्र ८७ सदनिका विनावापर !

पुणे – आर्थिक दुर्बल घटक (ई.डब्ल्यू.एस्.) आणि आर् ७ तरतुदींच्या अंतर्गत पुणे महापालिकेकडे असलेल्या १ सहस्र ८७ सदनिका विनावापर पडून आहेत. महापालिकेच्या विकास आराखड्यात आर्थिक दुर्बल घटकांच्या घरांसाठी आरक्षण दिलेले असते, तसेच आर् ७ या नियमाअन्वये बांधकाम व्यावसायिक ठराविक सदनिका किंवा बांधकाम केलेले क्षेत्र महापालिकेला देतात. ई.डब्ल्यू.एस्. आणि आर् ७ यांच्या अंतर्गत महापालिकेकडे एकूण ३ सहस्र ९०८ सदनिका आहेत. त्यांपैकी १ सहस्र ९०४ सदनिकांचे वाटप झाले आहे. विविध प्रकल्पांसाठी राखीव १३५, क्षेत्रीय कार्यालयाकडे वर्ग केलेल्या ४४८ आणि महामेट्रोकडे ३३४ सदनिका अशा एकूण २ सहस्र ८२१ सदनिकांचा वापर होत आहे; मात्र १ सहस्र ८७ सदनिका पडून आहेत. त्यांच्या सुरक्षेकडे कुणाचेही लक्ष नसल्याने या सदनिकांची हानी होत आहे. महापालिकेच्या विनावापर असलेल्या सदनिकांचा आढावा घेऊन तेथे दुरुस्ती आणि सुरक्षा आवश्यक असल्याने आयुक्तांकडे या संदर्भात प्रस्ताव सादर केला जाईल. त्यांच्या अनुमतीनंतर सदनिकांची कामे केली जातील, असे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

सहस्रो सदनिका विनावापर पडून का आहेत ? एकीकडे आर्थिक दुर्बल घटकांना घरांची अडचण सोसावी लागणे आणि दुसरीकडे सदनिका विनावापर पडून असणे संतापजनक आहे !