गोरक्षकांवरील आक्रमणाच्या निषेधार्थ जुन्नर (जिल्हा पुणे) येथे निषेध मोर्चा
जुन्नर (जिल्हा पुणे) – येथे भरवस्तीत जमावाने गोरक्षकांवर केलेल्या आक्रमणाच्या निषेधार्थ ८ डिसेंबर या दिवशी निषेध मोर्चा काढण्यात आला, तसेच शहरात सकाळपासून कडकडीत बंद पाळण्यात आला. अत्यावश्यक वैद्यकीय सेवा, सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक संस्था, बँका वगळता व्यापारी, तसेच दैनंदिन भाजी विक्रेते यांनीही स्वत:चा व्यवसाय पूर्ण बंद ठेवत पाठिंबा दिला. श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार येथे शहर आणि परिसरातील गोरक्षक, शिवभक्त जमा झाले. येथून निषेध मोर्च्याचा प्रारंभ होऊन तहसील कार्यालयाच्या आवारात सांगता झाली. या वेळी ‘अखिल भारत कृषी गो सेवा संघ’ पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे, मानद पशूकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी, शिवराज संगनाळे, मयूर दिवेकर आदी मान्यवरांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना सहभागी झाल्या होत्या. आक्रमणातील आरोपींना पोलीस प्रशासनाने त्वरित अटक करावी; अन्यथा मोठे आंदोलन छेडण्यात येईल, अशी चेतावणी मिलिंद एकबोटे यांनी दिली.
जुन्नर शहरात गोवंश हत्याबंदी कायद्याची कार्यवाही व्हावी, लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करावा, धर्मांतरबंदी कायदा व्हावा, संवेदनशील शहर म्हणून अधिकची पोलीस चौकी उभारावी या मागण्यांचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, तहसीलदार रवींद्र सबनीस यांना देण्यात आले. २५ नोव्हेंबर या दिवशी गोरक्षकांवर झालेल्या आक्रमणाच्या विरोधात गोरक्षक शिवराज संगनाळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी २७ जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला होता. या प्रकरणी आतापर्यंत एकूण २२ आरोपी लक्षात आले असून पोलिसांनी मुख्य आरोपी माजिद कुरेशी याच्यासह ६ आरोपींना अटक केली आहे.