‘कल्पवृक्ष हौसिंग वसाहत’ येथील अवैध बांधकाम तात्काळ न हटवल्यास आंदोलन ! – विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांचे महापालिकेत निवेदन
इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – येथील शहापूर हद्दीतील ‘कल्पवृक्ष हौसिंग वसाहत’ येथे चालू असलेल्या अवैध बांधकामाची तक्रार २८ जानेवारी २०२२ ला विश्व हिंदु परिषदेकडून तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीनंतर बांधकाम मिळकतधारक इनायत शिरोळे आणि इम्रान खान यांच्यावर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या संदर्भात यापुढे तेथे कोणतेही काम करण्यास प्रशासनाने मनाई केली असतांना शिरोळे आणि खान यांनी अवैध बांधकाम पुढे रेटत खिडक्या बसवणे, शौचालयाचे बांधकाम, तसेच अन्य कामे चालू केली आहेत. तरी हे बांधकाम तात्काळ न हटवल्यास विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्याकडून आंदोलन केले जाईल, या मागणीचे निवेदन विश्व हिंदु परिषदेचे अनिल सातपुते आणि अन्य कार्यकर्ते यांनी महापालिकेचे उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांना दिले आहे. (एकदा तक्रार करूनही संबंधित अवैध बांधकाम चालू ठेवतात, यामुळे पोलिसांचा धाक संपला आहे, असे लक्षात येते. पोलीस गुन्हेगारांमध्ये स्वत:चा धाक केव्हा निर्माण करणार ? – संपादक)
या प्रसंगी सर्वश्री प्रवीण सामंत, मुकुंदराज उरुणकर, अमित कुंभार, सुजित कांबळे, सर्जेराव कुंभार, वैभव फडणीस, मुकेश चोथे, महेश पाटील यांसह ‘कल्पवृक्ष सोसायटी’मधील महिला आणि नागरिक उपस्थित होते.