वडूज (जिल्हा सातारा) येथे नगरसेवकांचे उपोषण !
सातारा, ९ डिसेंबर (वार्ता.) – वडूज (जिल्हा सातारा) येथील नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेच्या ‘प्रोसिडिंग’ची प्रत आणि ध्वनिचित्रमुद्रणाची चक्ती (सीडी) मिळावी, यासाठी ‘वडूज विकास आघाडी’चे नगरसेवक नगरपंचायत कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत.
वडूज नगरपंचायतीची ३० सप्टेंबर २०२२, ३ ऑक्टोबर २०२२ आणि ७ नोव्हेंबर २०२२ या दिवशी सर्वसाधारण सभा झाल्या आहेत. या सर्वसाधारण सभांचे ‘प्रोसिडिंग’ आणि ध्वनिचित्रमुद्रणाची चक्ती मिळावी, यासाठी मुख्याधिकारी यांच्याकडे १४ नोव्हेंबर या दिवशी ‘वडूज विकास आघाडी’ने अर्ज केला; मात्र मुख्याधिकारी यांनी ‘हा विषय माझ्या अखत्यारीतील नाही. याविषयी नगराध्यक्षांकडे माहिती मागावी’, असे नगरसेवकांना सांगितले. पुढे नगरसेवकांनी २९ नोव्हेंबर या दिवशी नगराध्यक्षांकडे अर्ज केला; मात्र मागितलेली माहिती देण्याऐवजी सतत उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत, अशी माहिती उपोषणाला बसलेल्या नगरसेवकांनी दिली. (कायदेशीरपणे माहिती मागणार्या लोकप्रतिनिधींना नगरपंचायत प्रशासन माहिती देण्यास टाळाटाळ करत असेल, तर माहिती मागण्यासाठी गेलेल्या सामान्य नागरिकांची काय अवस्था होत असेल ? याची कल्पनाच न केलेली बरी ! उडवाउडवीची उत्तरे देणार्यांना कठोर शिक्षा होण्यासाठीही प्रयत्न करायला हवा ! – संपादक)
संपादकीय भूमिकानगरसेवकांनाच उपोषण करायला लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद नव्हे का ? |