स्वतःच्या लागवडीतील भाजीपाल्याच्या बियांची साठवण कशी करावी ?
३ डिसेंबर २०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखाच्या पूर्वार्धामध्ये आपण ‘बियांची साठवण का आवश्यक आहे ? तसेच टोमॅटो आणि वांगी या भाज्यांच्या बिया कशा साठवाव्यात ?’, यांविषयी पाहिले. या उत्तरार्धात ‘परसबागेत लावल्या जाणार्या अन्य भाज्यांच्या बिया कशा साठवाव्यात?’, याविषयी पाहू.
६ इ. मिरचीवर्गीय फळे : ‘मिरचीचा जो प्रकार आपण लावला असेल, त्यापैकीही प्रत्येकी १ – २ रोपे वेगवेगळी ठेवून देऊन त्यावरील न्यूनतम ५ – ६ फळे बियांसाठी राखून ठेवावीत. आपल्याला अधिक बिया हव्या असतील, तर जास्त फळे ठेवावीत. हिरव्या मिरच्या झाडावरच पिकून तांबड्या होतील. त्यांची वाढ पूर्ण होत आली की, त्या सुरकुततील. पूर्ण सुरकुतलेल्या मिरच्यांची साले जाड होतील. मिरच्या झाडावरच वाळल्या, तरी चालेल. अशा वाळलेल्या मिरच्या झाडावरून काढून घेऊन कागदावर त्यातील बिया काढून घ्याव्यात. हे करताना शक्यतो चमचा किंवा सुरी वापरावी. उपलब्ध असतील, तर हातमोजे वापरावेत; कारण मिरचीचा तिखटपणा हातांना लागतो आणि त्याचा त्रास होतो. बिया कागदावर किंवा प्लेटमध्ये काढून घेऊन त्या ३ – ४ दिवस पूर्ण वाळू द्याव्यात. अशा वाळलेल्या बिया पिशवीत किंवा डबीमध्ये ठेवून त्यावर लेबल लिहून वर सांगितल्याप्रमाणे सर्व विवरण लिहून थंड आणि कोरड्या ठिकाणी ठेवाव्यात.
६ ई. शेंगवर्गीय फळे : घेवडा, चवळी, मूग, वाटाणा इत्यादी ज्या शेंगवर्गीय भाज्या आहेत, त्यांच्या शेंगा जर तुम्ही कोवळ्या असतांना भाजीसाठी काढत असाल, तर काही शेंगा वेलींवर किंवा झुडूपांवरच पूर्ण पिकून वाळू द्याव्यात. शेंगा पूर्ण सिद्ध होत असतांना तुम्हाला त्या फुगीर दिसतील, म्हणजेच आतले दाणे सिद्ध होत असतील. शेंगा वाळत आल्यावर शेंगांचा वरचा भाग तपकिरी होईल. हाताला अशा शेंगा कडक लागल्यावरच काढून घ्याव्यात. तशाच राहिल्या, तर त्या फुटतील आणि बिया इतस्ततः पडतील. काढलेल्या शेंगा कुठल्याही खोलगट भांड्यात किंवा डब्यात वाळण्यासाठी ठेवाव्यात. वरच्या भागावर कापड बांधावे किंवा एखादे झाकण हलकेच ठेवावे जेणेकरून आत हवा, तर जाईल; पण वाळतांना शेंगा जर फुटल्याच, तर बिया बाहेर उडणार नाहीत. शेंगा पूर्ण वाळल्यावर त्या फोडून आतील सशक्त बियाच केवळ एखाद्या हवाबंद डब्यात किंवा पिशवीत ठेवून त्यावर पाटी (लेबल) लावून सारे विवरण लिहावे. काही बिया पोचट किंवा अशक्त दिसल्या, तर त्या फोडून कंपोस्टमध्ये टाकाव्यात. शेंगा न फोडता ठेवल्यास उत्तम. त्यामुळे हवेचा संपर्क न होता बिया सुरक्षित राहतील.
६ उ. पालेभाज्या : पालक, मेथी, शेपू, कोथिंबीर, माठ, ‘लेट्युस (एक विदेशी भाजी)’ इत्यादींचीही काही सशक्त आणि निरोगी रोपे तशीच ठेवावीत. वेळ पूर्ण होत असतांनाच त्यांच्यावर तुरे येतील, फुलतील आणि नंतर त्यांच्यातच बिया सिद्ध होतील. फुले येऊन ती वाढू लागल्यावर अशा रोपांवरील पाने जून होऊ लागतील. भाजीसाठी काढलेल्या कोवळ्या पानांपेक्षा यांची चव काहीशी कडवट असेल; म्हणून पाने काढू नयेत. तसेही बियांचे पोषण होण्यासाठी रोपांवर पाने असणे आवश्यक असते. फुलांमध्येच बिया असतील. फुलांचा रंग पालटेल. ती वाळू लागतील. रोपही मान टाकू लागेल. बियांचे वजन त्यांच्या दांड्याला पेलवेनासे झाल्यावर ते बाजूला कलंडू लागेल. ज्या रोपांवर, उदा. पालक इत्यादींवर अनेक फुलांचा तुरा येतो, त्या तुर्यातल्या खालच्या भागातल्या बिया लवकर पक्व होऊन वाळू लागतात. त्यामुळे खालच्या भागातल्या बिया किंवा फुले तपकिरी रंगाची होऊ लागताच ती काढून घेऊन घरात कागदावर सावलीत; पण उजेड पडेल, अशा ठिकाणी ठेवावीत. इतर भाज्यांच्या संदर्भात फुले पुष्कळ वाळल्यावर ती हलक्या हाताने काढून घेऊन घरात आणून एखाद्या कागदाच्या पाकिटात ठेवून द्यावीत. ५ – ६ दिवसांत ती पूर्ण वाळतील. मग ती फुले हाताने हलकेच चुरगळून त्यांतील बिया काढून घ्याव्यात. इतर कचरा, बीवरची वाळलेली साले आणि पाकळ्यांचे तुकडे दूर करावेत. वेगळ्या केलेल्या बिया काढून डबीमध्ये किंवा कागदाच्या पाकिटात ठेवून वर पट्टी (लेबल) लावून बियांची माहिती लिहावी.
६ ऊ. वेलवर्गीय भाज्या : दुधी, तांबडा भोपळा, काकडी, शिराळी, घोसाळी, कारली, पडवळ इत्यादींच्याही संदर्भात न्यून-अधिक भेदाने असेच असते. वेलींवर काही फळे ठेवून देऊन ती पूर्ण सिद्ध होऊ द्यावीत. ज्या फळांमध्ये पाण्याचा अंश जास्त असतो, उदा. काकडी, कारली, पडवळ ती फळे जून झाल्यावर त्यांना बाहेरून हलक्या हाताने छेद द्यावा आणि आतला गर काढून घेऊन तो एखाद्या भांड्यात घेऊन आतल्या बियांपासून गर वेगळा करून घ्यावा. भांड्यात राहिलेल्या बिया १ – २ वेळा धुऊन घेऊन वर तरंगणार्या बिया काढून टाकाव्यात. खाली राहिलेल्या बिया कागदावर वाळत ठेवाव्यात. वाळल्यावर त्या कागदाच्या पाकिटात ठेवून वर नोंद करून ठेवावी.
दुधी, शिराळी, घोसाळी इत्यादींची जून फळे वेलींवरून तोडून घेऊन वाळवावीत. काही दिवसांतच यातला गरही वाळून जातो आणि आतमध्ये वाढ होत असतांना सिद्ध झालेल्या शिरा उरतात. अशी वाळलेली फळे हालवून पाहिल्यास आतल्या बियांचा आवाजही येतो. अशी वाळलेली फळे तशीच ठेवून दिल्यास बिया खराब होत नाहीत. पुढील लागवड करतांना ही वाळलेली फळे फोडून आतल्या बिया घ्याव्यात. तसे करायचे नसेल, तर बिया काढून घेऊन त्या कागदाच्या पाकिटातही ठेवून देऊ शकतो.
६ ए. इतर भाज्या आणि कंदमुळे : या प्रकारातल्या भाज्यांच्या बिया घेण्यासाठीही ती वेगळी ठेवून पूर्ण सिद्ध होऊ द्यावीत. अशा रोपांची पाने किंवा मुळे खाण्यासाठी घेऊ नयेत. यथावकाश यांच्यावर फुले येऊन परागीकरण होऊन शेंगा किंवा फुलांचे गुच्छ सिद्ध होतात. ते वाळू लागताच काढून घेऊन पूर्ण वाळू देऊन सावकाश बिया काढून घ्याव्यात. आपण साठवलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या बिया या एकत्र करू नयेत. मोठ्या फळांच्या बिया मोजक्याच असतील, तरीही त्यासाठी वेगळी पिशवी किंवा डबी वापरावी.
६ ऐ. भेंडी, गवार यांसारख्या भाज्या : अशा भाज्यांची काही फळे रोपांवर तशीच जून होऊन वाळू द्यावीत. भेंडीच्या टोकाकडची बाजू विलग होऊ लागताच अशा भेंड्या काढून घेऊन दोरा बांधून किंवा रबरबँड लावून वाळत ठेवाव्यात. गवारीच्या शेंगाही काढून वाळत ठेवाव्यात. वाळल्यावर जेव्हा हव्या तेव्हा आतील बिया काढून पेराव्यात.
कोबी, फ्लॉवर, ‘ब्रोकोली (एक विदेशी भाजी)’ यांच्या बिया साठवणे पुष्कळ कठीण काम असते आणि ते एका ऋतूमध्ये होत नाही; म्हणूनच त्यावर लिहिले नाही. आशा आहे की, वर दिलेली माहिती आपणांस उपयोगी ठरेल. (समाप्त)
– श्री. राजन लोहगांवकर, टिटवाळा, जिल्हा ठाणे (साभार : https://vaanaspatya.blogspot.com)