हुतात्मा बाबू गेनू जलाशयात ३ वर्षांपासून मत्स्यबीज सोडले नाही !

मंचर – डिंभे धरणाजवळील हुतात्मा बाबू गेनू जलाशयात ३ वर्षांपासून महाराष्ट्र मत्स्य विकास महामंडळ मुंबई यांनी मासेमारी करण्यासाठी अजून कुणालाही दायित्व दिले नाही, तसेच मत्स्यबीजही सोडले नाही. त्यामुळे धरण परिसरातील फुलवडे, बोरघर, माळीण आदी १९ गावे आणि वाड्या वस्त्यांवरील ठकार, महादेव, कोळी अन् कातकरी कुटुंब रोजगारापासून वंचित राहिली आहेत, तसेच ३१७ हून अधिक आदिवासी कुटुंबावर उपासमारीचे संकट ओढवण्याची भीती व्यक्त होत आहे.

वर्ष २००८ मध्ये ज्येष्ठ समाजसेविका, शाश्वत संस्थेच्या संस्थापिका (स्व) कुसुम कर्णिक आणि अभियंता (स्व) आनंद कपूर यांनी पुढाकार घेऊन मत्स्यपालन व्यवसायातून रोजगार निर्मितीसाठी भरीव कामगिरी केली होती. डिंभे जलाशय श्रमिक आदिवासी मच्छीमार सहकारी संस्थेची स्थापना केली; मात्र वर्ष २०१९ आणि २०२० मध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मासेमारीचा व्यवसाय बंद पडला. त्यामुळे या २ वर्षांचे १४ लाख रुपये माफ करावे, अशी मागणी महाराष्ट्र मत्स्य विकास महामंडळ यांच्याकडे केली आहे, तसेच मासेमारी व्यवसायाला चालना मिळण्यासाठी मत्स्यबीज सोडण्याची आवश्यकता आहे, असे डिंभे जलाशय आदिवासी मच्छीमार संस्थेचे प्रवर्तक बुधाजी डामसे यांनी सांगितले.