मुंबई महापालिकेच्या अभियंत्यावर गुन्हा नोंद !
शौचालयाच्या अनुमतीसाठी १ लाख रुपयांची लाच स्वीकारल्याचे प्रकरण
मुंबई – शौचालयाच्या अनुमतीसाठी १ लाख रुपयांची लाच स्वीकारतांना मुंबई महापालिकेच्या दुय्यम दर्जाच्या अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. भूषण लक्ष्मण भुसाणे असे या दुय्यम अभियंत्याचे नाव असून तो साहाय्यक आयुक्त कार्यालय, बृहन्मुंबई महापालिका, महात्मा ज्योतिबा फुले मंडई येथे कार्यरत आहे. आरोपीच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला.
१. तक्रारदार हे ‘कुंधडिया सेवा संघ’ या संस्थेचे खजिनदार आहेत. भुलेश्वर म्युनिसिपल मंडईतील शौचालयाच्या देखभालीचे दायित्व त्यांच्याकडे आहे; मात्र या शौचालयाची अनुमती रहित करण्यासाठी महापालिकेच्या कार्यालयाकडून नोटीस देण्यात आली होती. नोटिशीच्या विरोधात तक्रारदाराने न्यायालयात अपिल केले होते. न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी घेण्याचे आदेश महापालिकेला दिले होते.
२. तक्रारदार यांच्या संस्थेच्या नावे असलेला परवाना नुतनीकरण करण्यासाठी, तसेच तक्रारदार यांना कामाच्या आदेशाची प्रत (वर्कऑर्डरची कॉपी) देण्यासाठी भूषण भुसाणे यांनी ४ लाख रुपयांची मागणी केली होती. याविषयी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. तडजोडीअंती तक्रारदाराकडून ३ लाख रुपयांची लाच घेण्याचे निश्चित झाले होते. त्यातील १ लाख रुपयांची लाच स्वीकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आले.
संपादकीय भूमिकाभ्रष्टाचाराने पोखरलेला महाराष्ट्र ! सरकारी अधिकारीच भ्रष्ट असतील, तर राज्य कधीतरी भ्रष्टाचारमुक्त होईल का ? अशा अधिकार्यांना कठोर शिक्षा करायला हवी ! |