नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या साधूग्रामसाठी ३५४ एकर भूमीची आवश्यकता !
भूसंपादनासाठी हवे ४ सहस्र १२७ कोटी !
नाशिक – सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणारे लाखो साधू-महंत यांच्यासाठी तपोवनात उभारण्यात येणार्या साधूग्राम, तसेच अन्य सुविधांसाठी यापूर्वी कह्यात घेतलेली ७० एकर जागा वगळता जवळपास ३५४ एकर जागा संपादित करावी लागणार आहे. त्यासाठी अंदाजे ४ सहस्र १२७ कोटी रुपये लागणार आहेत, असा प्राथमिक अहवाल महापालिकेने केंद्र आणि राज्य शासनाला पाठवण्याची सिद्धता अंतिम केली आहे.
१. वर्ष २०२६-२७ मधील आगामी कुंभमेळ्याच्या नियोजनाची सिद्धता प्रशासकीय पातळीवर चालू झाली आहे. आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकास्तरीय सिंहस्थ समन्वय समितीची स्थापना झाली आहे.
२. यापूर्वी झालेल्या बैठकीत साधूग्राम आणि अन्य सुविधा यांसाठी आवश्यक भूसंपादनाचा आढावा घेतला गेला. तपोवनातील तब्बल २६४ एकर भूमीवर साधूग्रामचे आरक्षण असून १७ एकर जागा वाहनतळ आणि अग्नीशमन दलासाठी आरक्षित आहे.
३. यांपैकी सद्य:स्थितीत ५४ एकर जागा महापालिकेने गत सिंहस्थकाळात प्रत्यक्ष वाटाघाटीद्वारे, तसेच ‘टी.डी.आर्.’च्या माध्यमातून संपादित केली होती, तर अनुमाने साडेतेरा एकर भूमीच्या संपादनाची प्रक्रिया सद्य:स्थितीत चालू आहे.
४. किती जागा संपादित करावी लागेल, याचा अभ्यास करण्यात आला. अभ्यासांती ४ सहस्र १२७ कोटी रुपयांची आवश्यकता लागणार आहे. एवढी मोठी आर्थिक तरतूद करणे महापालिकेला शक्य नसल्याने केंद्र आणि राज्य शासनाकडून मार्गदर्शन मागवले जाणार आहे.
५. मध्यप्रदेशमधील उज्जैनसह ज्या प्रमुख भागात सिंहस्थ कुंभमेळा भरवला जातो, तेथे साधूग्रामसाठी कशा पद्धतीने जागा आरक्षित केली गेली ?, त्यासाठी रोखीत भूसंपादन झाले कि ‘टी.डी.आर्.’चा पर्याय वापरण्यात आला, अशा सर्व गोष्टींचा अभ्यास करण्याचा निर्णय महापालिकेच्या नगररचना विभागाने घेतला आहे. याविषयी तेथे प्रत्यक्ष जाऊन अभ्यास केला जाणार आहे.