(म्हणे) ‘शेवटच्या काळात ते हिंदुत्वाच्या विषाला बळी गेले होते !’
हिंदुद्वेषी पत्रकार निखिल वागळे यांची ज्येष्ठ कलाकार दिवंगत विक्रम गोखले यांच्यावर अश्लाघ्य चिखलफेक !
मुंबई – सुप्रसिद्ध कलाकार विक्रम गोखले यांचे २६ नोव्हेंबर या दिवशी निधन झाले. त्यांच्या निधनावर सर्वत्र दु:ख व्यक्त केले जात असतांना पत्रकार निखिल वागळे यांनी मात्र त्यांच्यावर अश्लाघ्य चिखलफेक करण्यात धन्यता मानली.
वागळे यांनी गोखले यांच्या निधनावर फेसबुकद्वारे पोस्ट (लिखाण) प्रसारित करत, ‘आपल्या प्रगल्भ अभिनयाने आमचे आयुष्य समृद्ध करणारा एक कसलेला अभिनेता म्हणून विक्रम गोखले यांना आदरांजली !’ एवढ्यावर न थांबता वागळे यांनी म्हटले की,
१. शेवटच्या काळात ते हिंदुत्वाच्या विषाला बळी गेले होते. त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही; पण आजच्या दुःखाच्या दिवशी हे मतभेद मागे ठेवायला हरकत नाही.
२. मी ‘आय.बी.एन्.’मध्ये (वृत्तवाहिनीत) असतांना गोखलेंशी माझा बराच संबंध आला. मी त्यांची ‘ग्रेट भेट’ही (एका कार्यक्रमाचे नाव) केली. ते निश्चितच यास पात्र होते. (वागळे यांच्या कार्यक्रमाला उपस्थित रहाता येणे, यास पात्रतेचे प्रमाणपत्र म्हणणे, यापेक्षा दुसरा विनोद तो कोणता ? असे कुणी म्हटल्यास त्यात वावगे वाटण्यासारखे काही नाही ! – संपादक) आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही केल्या आज ती सापडत नाही. काळाच्या उदरात लपली आहे.
३. गोखले उत्तम नट होते, विजयाबाईंकडे (विजया मेहता यांच्याकडे) तयार झाले होते, पण त्यांचे वाचन आदी मर्यादित असावे, हे त्यांच्याशी बोलल्यावर कळायचे. विजयाबाईंचे बहुसंख्य शिष्य असे भोंगळ कसे निघाले, हा प्रश्नच आहे. विजयाबाईंचे समकालीन असलेले डॉ. (श्रीराम) लागू हे सज्जड अपवाद ! (स्वत:च्या विचारसरणीला साजेशी व्यक्ती वागळे यांच्यासारख्या हिंदु धर्मविरोधकांना ज्ञानीच वाटणार, यात काय आश्चर्य ? अर्थात् ‘देवाला रिटायर करा !’ अशी गरळओक करणार्या याच श्रीराम लागू यांचे विचार पुढे रेटणारे वागळे यांनाही आता पत्रकार जगताने ‘रिटायर’च केले आहे ! – संपादक)
४. हिंदु-मुसलमान प्रश्नावर ‘आजचा सवाल’ (कार्यक्रम) झाला की, रात्री उशिरा मला दूरभाष करून ‘मुसलमानांची लोकसंख्या का वाढत आहे ?’, असे प्रशांत दामले विचारायचा. विक्रम गोखले याचीच सुधारित आवृत्ती होते. हिंदुत्ववादाचा वारसा त्यांना वडिलांपासून लाभला होता. (कथित धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली राष्ट्रनिष्ठा गहाण ठेवलेले वागळे खरेतर वस्तूनिष्ठ पत्रकारितेला कलंक होत ! असे अनेक अनुभव अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रनिष्ठ यांनी घेतले आहेत. – संपादक)
५. वर्ष २०१४ मध्ये मोदी सत्तेवर आल्यानंतर गोखले यांनी आपले सगळे मुखवटे काढून फेकून दिले. हे त्यांचे भयंकर रूप त्यांच्या अभिनयाच्या चाहत्यांसाठी फारच क्लेशकारक होते. या असंख्य चाहत्यांत मीही होतो. (अंगाअंगात हिंदुद्वेष भिनलेल्या वागळे यांच्यासारख्या ‘चाहत्यां’ना गोखले हे क्लेशकारक वाटतात, यात काय आश्चर्य ! – संपादक)
६. गोखले गेले, तरी ही कटुता संपलेली नाही. त्यांनी या देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनाचा जाहीर अपमान केला होता; पण तरीही संघी (रा.स्व. संघ) आतंकवाद्यांनी गिरीश कर्नाड गेल्यावर जसे फटाके वाजवले, तसे मी अजिबात वाजवणार नाही. ती माझी संस्कृती नाही. ती भारतीय संस्कृती नाही. अलविदा गोखले. जिथे कुठे असाल तिथे निर्विष रहा…! (‘शत्रूच्या मृत्यूनंतर वैर संपते’, ही प्रभु श्रीरामचंद्रांची शिकवण आहे. हीच भारतीय संस्कृती आहे; परंतु त्यालाच तिलांजली देणारे निखिल वागळे स्वत:ची बौद्धिक दिवाळखोरी दर्शवतात, हे मात्र खरे ! – संपादक)
लोककल्याणकारी हिंदुत्वाला ‘विष’ संबोधणार्यांची हीच मानसिकता त्यांना इतिहासजमा करत आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे ! |