‘भगवद्गीता’च विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक !
सातारा जिल्ह्यातील ‘शिक्षण मंडळ, कराड आणि लोकमान्य टिळक हायस्कूल’ या दोन्ही शिक्षण संस्थांच्या संस्कृत विभागाने ५ मिनिटांत श्रीमद्भगवद्गीता लिहिण्याचा उपक्रम ३ डिसेंबरला गीता जयंतीच्या दिवशी आखला होता. या उपक्रमात ७४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रत्येक विद्यार्थ्याने प्रत्येकी एक याप्रमाणे गीतेतील १८ अध्यायांतील ७४० श्लोक केवळ ५ मिनिटांत वळणदार अक्षरात लिहिले. या विक्रमाची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये झाली. असे उपक्रम झाले, तर विद्यार्थ्यांना गीता समजण्यासाठी साहाय्य होईल. इतक्या अल्प कालावधीत विद्यार्थ्यांनी संस्कृत श्लोक लिहिले, हे असामान्य आहे. याविषयी त्यांचे आणि शिक्षकांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.
गीतेचे श्लोक पठण करण्याच्या स्पर्धांचेही आयोजन होत असते. यात काही प्रसंगी अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांनीही प्रथम क्रमांक पटकवलेला आहे. ‘याचा अभ्यास आम्ही का करावा ?’, असा प्रश्न येथे आड आला नाही. त्यासाठी त्यांचे पालकही अनुकूल होते, हे विशेष ! या सूत्राचा केवळ अभ्यास म्हणून विचार केला, तरी एका नवीन सूत्राचा अभ्यास विद्यार्थ्यांकडून होतो. विद्यार्थ्यांनी कायम नवीन नवीन सूत्रांचा अभ्यास करून त्यातील ज्ञान काय सांगते ? असा विचार केला पाहिजे. विद्यार्थी ज्ञानाने समृद्ध असेल, तर तो अज्ञानावर मात करू शकतो. परिणामी खोट्या सूत्रांचा प्रसार करून समाजाची दिशाभूल करणार्यांना अटकाव करता येऊ शकतो. भ्रमणभाष, गेम्स, सामाजिक माध्यमे यांत गुरफटलेल्या मुलांना वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी त्यांच्यासमोर पुस्तकी वाचनाचा हुकमी पर्याय ठेवून त्यांना पुढे जाऊन होणार्या घातक विकारांपासून वाचवले पाहिजे.
‘स्मार्ट फोन, टॅब नव्हते, तर बरे होते’, असे आता लोकांना वाटू लागले आहे; कारण एकतर या दोन्ही इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे आरोग्यावर जसे दुष्परिणाम होतात, तसे त्यांच्यावर चुकीच्या गोष्टी पाहिल्याने त्या विचारांना प्रोत्साहन मिळून त्यांची दिशाभूलही होते. उदा. अश्लीलता, मारामारी, आक्षेपार्ह संवाद असणारे चित्रपट पहाणे आदींमुळे विद्यार्थ्यांतील नीतीमत्ता वेगाने ढासळत आहे. त्यांच्यात भोगवादी वृत्ती वाढून ते या विकृतीलाच आयुष्य समजू लागले आहेत. आताच्या शिक्षणव्यवस्थेत या भीषण समस्येवर मात करण्यासाठी काहीच तोडगा नसणे, हे मोठे अपयश आहे. मनातील कचरा साफ करून माणूस म्हणून जगण्यासाठी श्रीमद्भगवद्गीताच विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक आहे.
– श्री. जयेश राणे, भांडुप, मुंबई.