उरुळी देवाची आणि फुरसुंगी (जिल्हा पुणे) या २ गावांची स्वतंत्र नगर परिषद होणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
पुणे – पुणे महापालिकेतून उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही २ गावे वगळण्यात येतील, तसेच या दोन्ही गावांची मिळून स्वतंत्र नगर परिषद करावी, असा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. पुढील १५ दिवसांमध्ये या संदर्भातील आदेश निघणार आहेत. उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही गावे महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर महापालिकेने मिळकतकर आकारणी चालू केली. गावामध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असतांना कर घेतला जात असल्याने तेथील ग्रामस्थांनी आक्षेप घेतला होता. त्यावर माजी मंत्री विजय शिवतारे यांनी या २ गावांची स्वतंत्र नगर परिषद करावी, अशी मागणी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली होती.
या दोन्ही गावांमध्ये पालिकेच्या वतीने विकासकामे चालू आहेत. त्यामुळे ही गावे वगळू नयेत, अशी महापालिकेने भूमिका मांडली; परंतु माजी मंत्री शिवतारे यांनी आग्रही भूमिका मांडल्यानंतर संबंधित निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला.