श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना भेटल्यावर ‘त्या देवीचेच एक रूप आहेत’, असा भाव निर्माण झालेले आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले अन् श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या प्रती भाव असलेले चेन्नईतील श्री. पलनिवेल !
‘मी गेल्या २० वर्षांपासून चेन्नईतील श्री. पलनिवेल यांना ओळखते. ते व्यवसायाने शिंपी असून आमच्या कुटुंबातील चार पिढ्यांना त्यांनी कपडे शिवून दिले आहेत. ते मंदिरातील देवतांसाठी कपडे शिवतात; पण त्यांचे पैसे घेत नाहीत. ते लहान मुलांचे कपडे शिवल्यावर, तसेच ‘सर्व वयस्कर लोक स्वतःच्या आईप्रमाणेच आहेत’, असा भाव असल्याने त्यांच्याकडूनही शिलाईचे पैसे घेत नाहीत.
सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यानंतर मी त्यांना साधना, परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सनातनचा आश्रम यांच्याविषयी माहिती सांगू लागले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या दुकानात सनातनच्या ग्रंथांचे प्रदर्शन लावले, तसेच यथाशक्ती अर्पण द्यायलाही आरंभ केला.
१. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या सान्निध्यात असतांना श्री. पलनिवेल यांना चैतन्य जाणवणे आणि ‘त्या देवीचे एक रूप आहेत’, अशी त्यांची श्रद्धा असणे
एकदा श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ चेन्नई येथे आल्या असतांना मी पलनिवेल यांना त्यांच्यासाठी कपडे शिवून देण्यास सुचवले. ते एक साधी आणि धार्मिक व्यक्ती आहेत. त्यांना अध्यात्मातील विशेष काही कळत नाही, तरी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना पाहिल्यावर ते त्यांना संपूर्ण शरण गेले. त्यांना श्रीचित्शक्ति गाडगीळ यांच्या सान्निध्यात चैतन्य जाणवले.
ज्या ज्या वेळी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ त्यांच्या दुकानात जातात, त्या त्या वेळी ते त्यांच्या दुकानासमोर फुलांची रांगोळी काढतात. त्यांच्या मनातील भाव अतिशय निर्मळ, निष्काम आणि शुद्ध आहे. ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ देवीचेच एक रूप आहेत’, अशी त्यांची श्रद्धा आहे.
२. रामनाथी आश्रमात येऊन शिवण सेवा करण्याची ओढ लागणे
आता परात्पर गुरु डॉक्टर, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि रामनाथी आश्रम, हेच आमच्या बोलण्याचे विषय असतात. पलनिवेल नेहमी म्हणतात, ‘मला रामनाथी आश्रमात एकदा यायचे आहे. तेथे काही दिवस राहून मला प.पू. गुरुदेवांसाठी, तसेच साधकांसाठी कपडे शिवण्याची सेवा करायची आहे.’
३. श्री. पलनिवेल यांच्या मनात सनातनच्या तिन्ही गुरूंप्रती भाव असणे आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यामध्ये त्यांनी परात्पर गुरु डॉक्टर अन् श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांचे अस्तित्व अनुभवणे
श्री. पलनिवेल यांनी प.पू. गुरुदेव आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना कधी पाहिलेले नाही; पण तरीही त्यांच्या मनात त्या दोघांप्रती पुष्कळ भाव आहे. एकदा ते श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्यासाठी कपडे शिवत होते. त्या वेळी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या प्रती त्यांच्या मनात जो भाव आहे, तोच भाव ते कपडे शिवतांना त्यांच्या मनात निर्माण झाला होता. भावामुळे त्यांना श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यामध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे अस्तित्व अन् चैतन्य अनुभवता येते.
‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ परात्पर गुरु डॉक्टर आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्याशी एवढ्या एकरूप झाल्या आहेत की, श्री. पलनिवेल यांना त्यांच्यातच तिघांचे अस्तित्व अनुभवायला मिळते.
४. श्री. पलनिवेल यांनी ‘एकदातरी श्रीचित्शक्ति गाडगीळ यांनी त्यांच्या नवीन घरी यावे’, अशी इच्छा व्यक्त करणे आणि त्या घरी येऊन गेल्यावर आनंदी होऊन ‘आता जीवन कृतार्थ झाले’, असे सांगणे
श्री. पलनिवेल यांनी अलीकडेच पुदूचेरी येथील त्यांच्या गावी स्वतःचे घर बांधले आहे. ‘एकदातरी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ घरी याव्यात आणि त्यांनी त्यांच्या चरणांच्या स्पर्शाने घर पावन करावे’, अशी पलनिवेल यांची इच्छा होती. एकदा रामेश्वरम्ला जातांना श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ वाटेत पलनिवेल यांच्या घरी गेल्या. तेव्हा पलनिवेल आणि त्यांचे कुटुंबीय यांनी भक्तीभावाने त्यांचे स्वागत करून त्यांच्यासाठी जेवण बनवले. ‘‘तुम्ही या बाजूला कधीही आलात, तर घरी रहायला या’’, असे त्यांनी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना नम्रपणे सांगितले.
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ येऊन गेल्यावर त्याच रात्री श्री. पलनिवेल यांनी मला भ्रमणभाष केला. त्या वेळी त्यांना झालेला आनंद आणि भावजागृती यांमुळे ते बोलू शकत नव्हते. ‘श्रीचित्शक्ति गाडगीळ घरी येऊन गेल्यामुळे माझे जीवन कृतार्थ झाले. मला आणखी काही नको’, असे ते म्हणाले. ‘त्यांच्या रूपाने साक्षात् कुलदेवीनेच येऊन मला आशीर्वाद दिला’, असा श्री. पलनिवेल यांचा भाव होता.
प्रार्थना
श्री. पलनिवेल यांच्यामध्ये साधकत्वाचे अनेक गुण आहेत. आई-वडिलांची प्रेमाने काळजी घेणे, इतरांचे ऐकणे, तत्परता, उत्सवात दायित्व घेऊन सेवा करणे, ईश्वरावर दृढ श्रद्धा, भक्तीभाव इत्यादी गुण त्यांच्यात आहेत. ‘ते शिष्याच्या पातळीला पोचले आहेत’, असे मला जाणवते. ‘त्यांची आध्यात्मिक उन्नती जलद गतीने होऊ दे’, हीच प.पू. गुरुदेवांच्या चरणकमली प्रार्थना आहे.
हे प.पू. गुरुदेवा, आपणच मला एवढी वर्षे या निस्वार्थ भक्ताचा सत्संग दिलात, याबद्दल तुमच्या चरणकमली कोटीशः नमन !’
– (पू.) सौ. उमा रवीचंद्रन्, चेन्नई, तमिळनाडू. (१९.७.२०२२)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |