महाशिवरात्रीच्या अगोदर विशाळगडावरील सर्व अतिक्रमण काढण्याचे कोल्हापूर जिल्हाधिकार्यांचे आश्वासन !
विशाळगड येथील अतिक्रमणाच्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक
कोल्हापूर – विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणांना पावसाळ्याच्या अगोदर नोटिसा दिलेल्या आहेत. या नोटिसांचा कालावधी पूर्ण झालेला आहे. येथील अतिक्रमणांच्या संदर्भात सर्व कायदेशीर भाग पूर्ण करून महाशिवरात्रीच्या अगोदर विशाळगडावरील सर्व अतिक्रमण काढण्यात येईल, अशी माहिती कोल्हापूर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत विशाळगडावरील अतिक्रमणाच्या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अंती त्यांनी ही माहिती दिली. या बैठकीत गडावर कोंबड्या कापणे यांसारखे घडणारे अनुचित प्रकारही बंद करून गडावर पशूहत्या बंदी लागू करावी, अशी मागणी करण्यात आली. या बैठकीत विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीच्या वतीने श्री. बाबासाहेब भोपळे, श्री. किशोर घाटगे, श्री. शिवानंद स्वामी यांनीही त्यांचे मत मांडले, तसेच या बैठकीसाठी कृती समितीचे सदस्य श्री. प्रमोद सामंत उपस्थित होते.
विशाळगडाच्या संदर्भात झालेल्या अतिक्रमणाच्या संदर्भात विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीच्या वतीने गेल्या २ वर्षांपासून आंदोलन करण्यात येत आहे. या संदर्भात अतिक्रमणाचे सर्व पुरावे समितीने जिल्हाधिकारी यांना दिले होते. समितीच्या पाठपुराव्यामुळेच अतिक्रमणधारकांना नोटिसा काढल्या होत्या. समितीने दिलेल्या लढ्याचेच हे अंतिम फलित म्हणजे ही बैठक होती.
विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणाच्या संदर्भात सर्वांच्याच भावना या संतप्त होत्या. या बैठकीसाठी विशाळगडसाठी कार्य करणार्या विविध संघटना, कार्यकर्ते, पुणे येथील पुरातत्व विभागाचे साहाय्यक संचालक डॉ. विलास वाहणे, शिवदुर्ग आंदोलनाचे हर्षल सुर्वे, पत्रकार सुखदेव गिरी, इतिहास संशोधक श्री. इंद्रजित सावंत, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, विविध शासकीय अधिकारी, हिंदु एकता आंदोलनाचे दिलीप भिवटे, सेवाव्रत प्रतिष्ठानचे संभाजी साळुंखे यांसह अन्य अनेकजण उपस्थित होते.
विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणास पुरातत्व विभागही तितकाच उत्तरदायी ! – छत्रपती संभाजीराजेया संदर्भात छत्रपती संभाजीराजे म्हणाले, ‘‘आज घेतलेली बैठक ही पहिली आणि शेवटची बैठक असेल. आजच्या बैठकीनंतर प्रशासनाने ठोस कृतीच करणे अपेक्षित आहे. विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणास आणि सध्या तेथे जे निकृष्ट दर्जाचे संवर्धन झाले आहे त्याला पुरातत्व विभागही तितकाच उत्तरदायी आहे. ५ कोटी रुपये व्यय करून अतिशय खराब असे काम तिथे झालेले आहे. इतके वर्षे विशाळगडावर अतिक्रमण होत असतांना पुरातत्व विभाग काय करत होता ? हे अतिक्रमण पुरातत्व विभागाने का थांबवले नाही.’’ |
…तर शिवभक्तच हे काम सांविधानिक मार्गाने हाती घेतील ! – सुनील घनवट, प्रवक्ते, विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती
जिल्हाधिकार्यांसमवेत विशाळगड अतिक्रमणविरोधी कृती समितीची बैठक झाली. अतिक्रमण झालेले आहे, अधिकृत पुरावेही आहेत, तसेच जिल्हाधिकारी, पुरातत्व विभाग, तहसीलदार, ग्रामपंचायत या सर्वांनीही ते मान्य केलेले आहे, असे असूनही ते अद्यापर्यंत काढले का जात नाही ? त्यात दिरंगाई का होत आहे ? प्रशासनाकडून पावसाळ्याचे कारण सांगून अतिक्रमण हटवण्यात आले नाही; परंतु पावसाळा संपूनही २ मास झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाने शिवभक्त, गडप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांच्या भावनांचा अंत होण्याची वाट पाहू नये. प्रशासन आणि पोलीस यांना अतिक्रमण हटवणे जमत नसल्यास तसे त्यांनी घोषित करावे. शिवभक्त हे काम सांविधानिक मार्गाने हातात घेतील.
अफझलखानाच्या थडग्याभोवती अतिक्रमण झाले होते. खर्या लँड जिहादला तेथूनच प्रारंभ झाला होता. ते अतिक्रमण वेळीच हटवले असते, तर अन्य गड-दुर्ग यांवर अतिक्रमण झालेच नसते. प्रशासनाने ते काढले हे योग्यच आहे; आता अन्य गड-दुर्गांवरील अतिक्रमणही त्वरित हटवावे. त्यासाठी शिवभक्तांना पाठपुरावा करावा लागू नये. ज्या अधिकार्यांच्या कालावधीत हे अतिक्रमण झाले आहे, ते सेवानिवृत्त झाले असले तरी त्यांच्या वैयक्तिक मालमत्तेतून हानीभरपाई वसूल करावी.
गडावर उद्यापासून मद्यबंदी, तसेच अवैध गोष्टी थांबवणार ! – शैलेश बलकवडे, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर
विशाळडावर होणार्या अवैध गोष्टी थांबवण्यास पोलीस प्रशासन तात्काळ कृती चालू करत आहे. यात उद्यापासूनच मद्यबंदी होण्यासाठी प्रयत्न केले जातील. मद्य अथवा अन्य कोणत्याही गोष्टी गडावर जाऊ नय, यांसाठी तेथील युवकांची एक समिती आम्ही करत आहोत. अशाच प्रकारची समिती जिल्ह्यातील ११ गडांच्या संदर्भात आम्ही तेथील युवकांना घेऊन करणार आहोत.
विशाळगडावर अमृतेश्वराच्या मंदिराच्या वरच पशूवधगृह असून तेथील मांसमिश्रीत पाणी मंदिर परिसरात येते ! – सुखदेव गिरी, पत्रकार
गेल्या २ वर्षांपासून विशाळगडावर एक ३ मजली टोलेजंग इमारत उभी राहिली आहे. याला पाणी, वीज, तसेच अन्य सुविधाही दिल्या गेल्या आहेत. हा गड राज्य पुरातत्व विभागाच्या अंतर्गत संरक्षित असतांनाही गडावर वाळू, सिमेंट, तसेच अन्य गोष्टी कशा नेण्यात येतात ? या अतिक्रमणाच्या संदर्भात संबंधित व्यक्ती कुणालाही जुमानत नाही. याचे सखोल अन्वेषण झाले पाहिजे. विशाळगडावर अमृतेश्वराच्या मंदिराच्या वरच पशूवधगृह असून तेथील मांसमिश्रीत पाणी मंदिर परिसरात येते, हे अत्यंत गंभीर आहे. जसा इतरांना त्यांच्या धर्माचा अभिमान आहे, तसा आम्हालाही आमच्या धर्माचा अभिमान आहे. त्यामुळे या गोष्टी तात्काळ थांबल्या पाहिजेत.
दर्गा ट्रस्टचा जिर्णोद्धार करण्याच्या नावाखाली तेथे झालेल्या ३ दर्ग्यांचे अन्वेषण व्हावे ! – फत्तेसिंह सावंत, रायगड प्राधिकरण सदस्य
आम्हाला रायगडाच्या संदर्भात काम करतांना पुरातत्व विभागामुळे अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते. असे असतांना विशाळगडावर दर्गा ट्रस्टचा जिर्णोद्धार करण्याच्या नावाखाली आता तेथे ३ दर्गे झाले आहेत, याचे अन्वेषण झाले पाहिजे. हे अन्वेषण कुणाच्या अधिकारात झाले याचे अन्वेषण झाले पाहिजे. विशाळगड हा आमचे शौर्यस्थान असून त्याचे पावित्र्य जपलेच गेले पाहिजे.
अतिक्रमणाच्या संदर्भात कालमर्यादा ठरवून कारवाई व्हावी ! – बाबासाहेब भोपळे
विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीने सातत्याने विशाळगड येथील अतिक्रमणाचा विषय लावून धरला आहे. तेथील अतिक्रमणाच्या संदर्भात जिल्हा प्रशासन आणि पुरातत्व विभाग यांच्या समवेत बैठक होऊनही, तसेच अतिक्रमणधारकांना नोटिसा काढूनही अद्याप यावर पुढे कोणतीच कृती झालेली नाही. विशाळगड येथे मद्याच्या बाटल्या पकडून देणार्यांवरच गुन्हे नोंद केले जात आहेत. त्यामुळे आता अतिक्रमणाच्या संदर्भात कालमर्यादा ठरवून कारवायी व्हावी, अशी मागणी कृती समितीचे श्री. बाबासाहेब भोपळे यांनी केली.