सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी असूनही सर्वांशी अतिशय प्रेमाने बोलून सामान्य माणसालाही आनंद देणार्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा ७.१२.२०२२ (मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशी) या दिवशी ५२ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांच्या समवेत सेवा करणारे साधक श्री. वाल्मिक भुकन यांना त्यांची जाणवलेली दैवी वैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. कर्तेपणा नसणे
१ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी असूनही श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी स्वतःची ओळख ‘आश्रमातील सेवेकरी’, अशी करून देणे : ‘श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या समवेत दैवी दौर्याच्या निमित्ताने सेवा करतांना या दीड वर्षात त्यांच्याकडून पुष्कळ गोष्टी शिकायला मिळाल्या. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना या दीड वर्षात ‘त्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी आहेत’, असे स्वतःहून समाजात सांगितलेले मी कधी पाहिले नाही. त्या ‘आम्ही आश्रमातील सेवेकरी आहोत. जी सेवा सांगतात, ती आम्ही करतो’, अशी सर्वांना त्यांची ओळख करून देतात. या सांगण्यामध्ये सहजता आणि गुरूंप्रती निर्मळ भाव असतो. ‘एक उत्तराधिकारी ‘मी सेवेकरी आहे’, हे सांगतो’, यातूनच श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे अवतारत्व सिद्ध होते. बाहेर समाजातील उत्तराधिकारी बघितले, तर त्यांची एक स्वतःची ओळख दाखवण्याची पद्धत असते. त्याप्रमाणे त्यांचे बोलणे आणि वागणे असते. समोरच्या व्यक्तीशी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकू मोकळेपणाने बोलतात. त्यामुळे ती व्यक्तीही त्यांच्याशी पुष्कळ जवळीक असल्याप्रमाणे बोलते.
१ आ. ‘गुरुच (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हेच) सर्व करतात’, असा भाव असणे : मार्च २०२२ मध्ये महर्षींच्या आज्ञेने आम्ही मणीपूर या राज्यात गेलो होतो. त्या वेळी तिथे देवस्थानला जाण्यासाठी स्थानिक गाडी केली होती. आम्ही त्या ठिकाणी बरीच देवस्थाने, तसेच भारतीय सैनिकांच्या ‘कँप’ला भेटी दिल्या. आमच्या समवेत गाडीचा चालकही असायचा. ३ दिवस झाल्यानंतर त्याने आम्हाला विचारले, ‘‘या माताजी कोण आहेत, हे खरे सांगा. मी ३ दिवसांपासून पहातो आहे, माताजी जिथे जातात, तिथे समोरचे लोक पुष्कळ आदराने त्यांचा सन्मान करतात. त्यावर त्या चालकाला श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकू म्हणाल्या, ‘‘आमच्या गुरूंची ती मोठी कृपा आहे. आम्ही देवाची सेवा करतो. त्यामुळे देवही त्याच्या भक्तांची सेवा अशा माध्यमातून करतो. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकू यांनी स्वतःकडे कर्तेपणा न घेता ‘गुरुच सर्व करतात’, हे यातून आम्हालाही शिकवले.’’
२. प्रीतीस्वरूप श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !
२ अ. कामगारांनाही प्रेम देऊन सहजतेने आपलेसे करणे : श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकू साधकांच्या घरी कामाला येणार्या कामगारांचीही चौकशी करतात. त्या पुष्कळ प्रेमाने त्यांची ‘जेवण झाले का ? घरचे सर्व कसे आहेत ?’, अशी विचारपूस करतात. त्यामुळे ते कामगार आम्ही निघतांना ‘परत कधी येणार ?’, असे विचारतात. ते म्हणतात, ‘‘लवकर या. आम्ही वाट पहातो. आम्हाला तुमची सेवा करायला आवडते आणि पुष्कळ छान वाटते.’’ हे ऐकल्यावर आमची भावजागृती होते. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ म्हणतात, ‘‘आयुष्यात असेच प्रेम मिळवायचे असते. त्या कामगारांचा आणि आपला काडीमात्र संबंध नाही, तरी आपण प्रेम दिले की, त्यांना किती आनंद होतो ना ! असाच आनंद आणि प्रेम देत गेलात की, समोरचा आपोआप ईश्वराशी जोडला जातो.’’
२ आ. गरीब लोकांकडून वस्तूंची खरेदी करून त्यांना आनंद देणे : प्रवासात जातांना वाटेत काही ठिकाणी गरीब लोक फळे, फुले आणि भाजीपाला घेऊन बसलेले असतात. तेव्हा त्यांना पाहून श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकू म्हणतात, ‘‘आपल्याला जे काही घ्यायचे, ते यांच्याकडूनच घेऊया. आपण खरेदी केल्यावर त्यांना पैसे मिळतील आणि त्यातून त्यांचे घर चालेल.’’ असा विचार आणि प्रेम देवच करू शकतो, बाकी कोणी नाही.
‘खरंच गुरुदेव, आम्ही भाग्यवंत आहोत. आपण (परात्पर गुरु डॉ. आठवले) नेहमी शिष्यभावात असता. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकू या किती शिष्यभावात असतात. ‘या कलियुगात असे गुरु-शिष्य आम्हाला गुरुरूपात मिळाले’, हे यावरून लक्षात येते. ‘आमच्याकडूनही अशीच सेवा करून घ्या’, ही तुमच्या कोमल चरणी प्रार्थना !’
– श्री. वाल्मिक भुकन, चेन्नई, तमिळनाडू. (१२.११.२०२२)