कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी तोंडावर आवर घालून सीमावादाचा प्रश्‍न चिघळू देऊ नये !

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्माई यांना चेतावणी

मुंबई – कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता जरा तोंडावर आवर घालावा आणि सीमावादाचा प्रश्‍न चिघळू देऊ नये. महाराष्ट्रातील गाड्यांची तोडफोड आणि तेथील मराठी माणसांना त्रास देण्याचे चालू असलेले प्रकार तात्काळ थांबवावे, अशी चेतावणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्माई यांना दिली.

ठाकरे यांनी सामाजिक संकतेस्थळावर पोस्ट केलेल्या पत्रात म्हटले आहे की,

१. कर्नाटकातील निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर त्यांना कलह हवा असून यात महाराष्ट्राला जाणूनबुजून लक्ष्य केले जात आहे. महाराष्ट्राने संघर्ष करून मिळवले आहे. आम्ही संघर्षाला नेहमीच सिद्ध असतो; पण ‘तो होऊ नये’, असे वाटत असेल, तर आता केंद्राने लक्ष घालावे.

२. सीमावादाचा प्रश्‍न चर्चेने आणि सामोपचारानेच सुटायला हवा; पण जर समोरून संघर्षाची कृती केली जाणार असेल, तर मनसे काय करू शकते, याची चुणूक माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी दाखवली आहे. त्यामुळे आवश्यकता भासल्यास आमचेही उत्तर तितकेच तीव्र असेल, हे विसरू नका.

३. अचानकच राज्याच्या सीमांवर दावा सांगितला जात आहे, हे प्रकरण साधे नाही. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी महाराष्ट्राच्या भूमीकडे येणारी बोटे पिरगळली जातील, हे पहावे. आपण कुठल्या पक्षाचे आहोत, हे विसरून आपण महाराष्ट्राचे आहोत’, हे स्मरून कृती व्हावी, अशी अपेक्षा.