मराठी भाषिक आणि साैंदत्ती यात्रेस गेलेल्या भाविकांना संरक्षण द्या ! – सीमाप्रश्नी सर्वपक्षीय समितीचे निवेदन
कोल्हापूर, ६ डिसेंबर (वार्ता.) – कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी पथकर नाक्यावर महाराष्ट्राच्या १० वाहनांची मोडतोड केली. कर्नाटक सरकारच्या बोटचेप्या धोरणामुळे महाराष्ट्राला आव्हान देण्याचे काम होत आहे. अशावेळी सर्व पक्षांनी पक्षभेद विसरून एकत्रितपणे सीमावासीय बांधवांच्या पाठीशी राहून त्यांना बळ देण्याची आवश्यकता आहे. तरी मराठी भाषिक आणि सौंदत्ती यात्रेस गेलेल्या भाविकांना संरक्षण द्यावे, असे मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन सीमाप्रश्नी सर्वपक्षीय समितीच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवीतके यांना देण्यात आले.
या प्रसंगी वसंतराव मुळीक, गुलाबराव घोरपडे, संभाजी जगदाळे, बबनराव रानगे, प्रसाद पाटील, उत्तम पाटील, संजय पोवार, बाबूराव बोडके, अवधूत पाटील, प्रकाश पाटील यांसह अन्य उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यासाठी आवश्यक ती कार्यवाही न झाल्यास महाराष्ट्रात एकही कर्नाटकाची गाडी येऊ न देण्याचा निर्धार सर्वपक्षीय समितीने केला आहे. कोल्हापूरकरांनी यापूर्वी वेळोवेळी कर्नाटकास धसका बसेल अशी आंदोलने केली आहेत. त्यामुळे यापुढे कधीही सीमाप्रश्नी विस्फोट होऊ शकतो, याची नोंद घ्यावी.