ईश्वराने सनातनला दिलेले एक अनमोल वरदान श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ !
१. सर्वच सेवा आदर्श करणार्या श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ !
‘ईश्वराने सनातनला दिलेले एक अनमोल वरदान म्हणजे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ ! श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत ज्या ज्या माध्यमातून त्यांनी साधना केली, त्या त्या सेवांमध्ये त्यांनी आदर्श प्रस्थापित केला.
अ. साधनेच्या आरंभी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली त्या संगीतसाधना करू लागल्या. तेव्हा त्या त्या रागातून त्याच्याशी संबंधित तत्त्वाची अनुभूती त्यांना येत असे.
आ. नंतर ईश्वराकडून दिव्य ज्ञान ग्रहण करण्याची सेवाही त्यांनी अनेक वर्षे केली. ज्ञानयोगाची सेवा करता करता त्यांनी त्याला भक्तीयोगाचीही सुंदर जोड दिली.
इ. भावी पिढ्यांसाठी महान हिंदु संस्कृतीचा अनमोल ठेवा जतन करण्याची सेवा त्या करू लागल्या. ही सेवा करतांना श्रीचित्शक्ति गाडगीळकाकूंमधील चैतन्यशक्तीची प्रचीती येऊ लागली. अनेक प्राचीन मंदिरे, धार्मिक स्थळे या ठिकाणचे पुजारी, पदाधिकारी त्यांना सहजतेने साहाय्य करू लागले. त्यांच्या वाणीत मुळातच चैतन्य असल्यामुळे त्या ज्यांना ज्यांना भेटतात, त्यांना कायमचे आपलेसे करतात.
२. सप्तर्षी ज्यांना ‘माझी कार्तिकपुत्री’ असे संबोधतात, अशा श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ !
‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत आणि साधकांचे रक्षण व्हावे’, यासाठी सप्तर्षींच्या आज्ञेने काही वर्षांपासून त्या भारतभरातील तीर्थक्षेत्री जात आहेत. तेथे देवतांचे दर्शन घेणे, पूजाविधी करणे आदी सेवा त्या करत आहेत. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकू यांनी सप्तर्षींच्या आज्ञेचे पालन अत्यंत भावपूर्ण अन् परिपूर्णतेने करून त्यांची कृपा संपादन केली आहे. केवळ देवदर्शन करून न थांबता साधकांना त्याचा आध्यात्मिक स्तरावर अधिकाधिक लाभ व्हावा, यासाठी त्या प्रयत्नरत असतात. सप्तर्षींची आणि देवतांची कृपा संपादन करण्याचा त्यांना ध्यासच लागलेला असतो. त्यामुळेच सप्तर्षींनी केलेल्या आज्ञेची त्या इतकी सुंदर आणि परिपूर्ण पूर्तता करतात की, महर्षि कौतुकाने त्यांना ‘माझी कार्तिकपुत्री’ असे म्हणतात. (अर्थ : श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा जन्म कृत्तिका नक्षत्रात आणि तमिळ पंचांगानुसार कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी झालेला असल्यामुळे सप्तर्षी त्यांना ‘कार्तिकपुत्री’ असे म्हणतात.) अनेक नाडीपट्टी वाचनांमध्ये सप्तर्षींनी त्यांच्याविषयी गौरवोद्गार काढले आहेत.
३.‘देवा पहाया गेलो । तेथे देवची होऊनी ठेलो ।।’, ही संत तुकाराम महाराज यांची उक्ती सार्थ ठरवणार्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ !
‘देवा पहाया गेलो । तेथे देवची होऊनी ठेलो ।।’, ही संत तुकाराम महाराज यांची उक्ती श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या संदर्भात तंतोतंत लागू होते. देवतांचे दर्शन घेता घेता सप्तर्षी आणि सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव यांच्या कृपेने श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यातील देवीतत्त्व प्रकट होऊ लागले आहे. समाजातील अनेक जण त्यांच्याकडे आकर्षित होतात. त्यांचा ‘तेजस्वी चेहरा’ हीच आता त्यांची ओळख झाली आहे.
दैवी प्रवास करून यज्ञ किंवा आध्यात्मिक सोहळे यांसाठी त्या रामनाथी आश्रमात येतात. तेव्हा आश्रमातील वातावरणच पालटते. सर्व साधक त्यांना भेटण्यास आणि त्यांचे प्रेम अनुभवण्यास उत्सुक असतात. सातत्याने दैवी दौर्यावर असल्यामुळे त्यांचा साधकांशी प्रत्यक्ष संपर्क अल्प असूनही त्यांना सर्व साधक आपले वाटतात आणि सर्वत्रच्या साधकांना त्या आपल्या वाटतात. हीच त्यांच्या समष्टीवरील अपार प्रीतीची पावती आहे !
४. देवता आणि सप्तर्षी यांची सनातन परिवारावर कृपा व्हावी, यासाठी चंदनाप्रमाणे देह झिजवणार्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ !
सप्तर्षी आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने अध्यात्मप्रसाराच्या कार्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. आज सनातनचे सहस्रो साधक व्यक्तीगत जीवनात, तसेच व्यष्टी आणि समष्टी साधनेत भगवंताने साहाय्य केल्याची अनुभूती घेत आहेत. देवता आणि सप्तर्षी यांची सनातन परिवारावर कृपा व्हावी, यासाठी गुरुदेवांच्या कृपेने श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ चंदनाप्रमाणे देह झिजवत आहेत. सर्व साधकांच्या साधनाप्रवासात श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या या कार्याचा वाटा मोलाचा आहे. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ हे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव यांनी अखिल मानवजातीला दिलेले अनमोल वरदान आहे.
‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, ‘आपल्या कठोर परिश्रमांमुळेच आज साधकांच्या प्रयत्नांना आध्यात्मिक बळ लाभत आहे. आपल्या ५२ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व साधकांच्या वतीने आपल्या सुकोमल चरणी कोटीशः कृतज्ञता ! ‘आपल्या भक्तीचा, तळमळीचा आणि प्रीतीचा अंश सर्वत्रच्या साधकांमध्ये यावा’, अशी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना !’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ (६.१२.२०२२)