श्री दत्तगुरूंनी केलेल्या २४ गुणगुरूंचा भावार्थ !
१. पृथ्वी : पृथ्वीप्रमाणे सहनशील आणि द्वंद्वसहिष्णू असावे. मूल आईच्या मांडीवर असते, तिला लाथा मारते, अंगावर मल-मूत्र टाकते, तरी ती न चिडता, न रागावता मुलाला दूध पाजते. लोक भूमीवर मल-मूत्र टाकतात, तिला नांगरतात, जाळतात, तरी पेरलेल्या दाण्यांच्या कितीतरी पट दाणे ती देते. माणसाने परपीडा सहन करावी. कुणी अपमान केला, अपशब्द बोलले किंवा लुबाडले, तरी न रागावता सहन करून क्षमा करून साहाय्य करावे.
२. वायू : वारा सुगंधी फुलावरून वाहतांना सुगंधाने आसक्त होऊन तेथेच थांबत नाही, त्याचप्रमाणे द्रव्यासारख्या वस्तूवर मोहित होऊन आपण आपले व्यवहार थांबवू नयेत.
३. आकाश : आत्मा हा आकाशाप्रमाणे सर्व चराचर वस्तूंना व्यापून राहिला आहे, तरी निर्विकार, एक, सर्वांशी समत्व राखणारा, निःसंग, अभेद, निर्मळ, निर्वैर, अलिप्त आणि अचल आहे.
४. पाणी : मनुष्याने पाण्याप्रमाणे सर्वांसमवेत स्नेहभावाने वागावे.
५. अग्नी : मनुष्याने अग्नीप्रमाणे तप करून प्रकाशित व्हावे आणि जे मिळेल ते भक्षण करून आपले गुण योग्य ठिकाणी वापरावे.
६. चंद्र : चंद्राच्या १६ कलांत उणे-अधिकपणा असून त्याचा विकार चंद्रास बाधक होत नाही, तद्वत् आत्म्यास देहासंबंधीचे विकार बाधक होत नाहीत. चंद्र शीतल किरणांनी सर्वांना आनंदी करतो, त्याचप्रमाणे आपण मधुर वाणीने लोकांना आनंदी करावे.
७. सूर्य : सूर्य भविष्यकाळाचा विचार करून जलसंचय करतो आणि योग्य काळी परोपकारार्थ त्याचा भूमीवर वर्षाव करतो. मनुष्याने उपयुक्त वस्तूंचा संचय करून, देश, काल, वर्तमानस्थिती लक्षात आणून निष्पक्षपातीपणाने सर्वांना लाभ द्यावा.
८. कपोत : जसा बहिरी ससाणा कपोताला (कबुतराला) परिवारासह भक्षण करतो, तसे जो मनुष्य स्त्री-पुत्रादिकांचे ठायी आसक्त राहून संसार सुखमय मानून वागतो, त्याला काळ भक्षण करतो. यास्तव मुमुक्षूने या सर्वांपासून मनाने अलिप्त असावे.
९. अजगर : अजगर प्रारब्धावर विश्वास ठेवून एका ठिकाणी पडून रहातो. ज्या वेळी जे मिळेल, ते भक्षण करून संतोष पावतो, तद्वत् मुमुक्षूंनी प्रारब्धावर विश्वास ठेवून जे मिळेल, ते भक्षण करून, प्रसंगी काही मिळाले नाही, तरी स्वस्वरूपी लय लावून बसावे.
१०. समुद्र : जसा समुद्र वर्षाकालात अनेक नद्यांनी अपरिमित जल आणल्यास सुखी होत नाही किंवा न आणल्यास दुःखी होत नाही, त्याप्रमाणे प्रत्येक मनुष्याने सुखोपभोगांचा लाभ झाल्याने सुखी होऊ नये किंवा दुःखपरंपरा कोसळल्याने दुःखी होऊ नये.
११. पतंग : पेटत्या दिव्याचे मोहक तेज पाहून पतंग मोहित होऊन त्यावर झडप घालून जळून मरतो. त्याचप्रमाणे स्त्रीविलासासाठी मोहित होणार्या मनुष्य पतंगाप्रमाणे नाशनाश करून घेतो.
१२. मधमाशी : मधमाशी उंच वृक्षावर पोळे बनवून त्यात मध साठवते. शेवटी मध जमा करणारे मधुहा अचानक येऊन पोळ्यासह मध घेऊन जातात. त्याप्रमाणे जो कृपण द्रव्यार्जन करून त्याचा संग्रह करतो, तो ते द्रव्य अग्नी, चोर किंवा राजा यांनी एकाएकी हरण करून नेल्यामुळे शेवटी दुःख पावतो.
१३. गजेंद्र (हत्ती) : हत्तीला वश करण्यासाठी माणसे भूमीत खड्डा खणून त्यावर काष्ठाची हत्तीण उभी करतात. तिला पाहून हत्ती विषयसुखलालसेने शीघ्र गतीने येऊन खड्ड्यात पडतो. त्याप्रमाणे जो पुरुष स्त्रीसुखास भुलतो, तो बंधनात येऊन पडतो.
१४. भ्रमर : सूर्यविकासी कमळे सूर्य मावळताच मिटतात. त्यावर आरूढ असणारा भ्रमर कमळाच्या पोटात बंधन पावतो. ‘विषयासक्तीने बंधन प्राप्त होते’, हे जाणून विषयासक्त नसावे.
१५. मृग : कस्तुरीमृग मधुर गायनाला लुब्ध होऊन आपला प्राण परस्वाधीन करतो. हे लक्षात ठेवून कोणत्याही मोहात अडकू नये.
१६. मत्स्य : मांस पाहून भुलल्यामुळे मत्स्य गळ गिळतात, तो तोंडात अडकल्यामुळे प्राणास मुकतात. त्याप्रमाणे मनुष्य जिव्हेच्या स्वादात बद्ध झाल्याने जन्म-मरणरूपी भोवर्यात गोते खात रहातो.
१७. पिंगला वेश्या : एकदा कुणीही न आल्याने पिंगला वेश्येला अचानक वैराग्य आले. जोपर्यंत मनुष्याच्या अंगी आशा प्रबल असते, तोपर्यंत त्याला सुखनिद्रा लागत नाही. आशेचा त्याग करणार्या पुरुषाला संसारात एकही दुःख बाधत नाही.
१८. टिटवी : एकदा चोचीत मासा धरून चाललेल्या टिटवीच्या मागे कावळे आणि घारी लागल्या. टिटवीने मासा टाकून दिल्यावर घारीने तो पकडला. कावळे आणि घारी त्या घारीच्या मागे लागले. टिटवी निश्चिंत होऊन झाडाच्या फांदीवर जाऊन शांतपणे बसली. संसारात उपाधी झुगारून देण्यात शांती आहे, नाहीतर घोर विपत्ती.
१९. बालक : मानापमानाचा विचार न करता जगतास प्रारब्धाधीन समजून सर्व चिंतेचा परिहार करून बालकाप्रमाणे आनंदी रहावे.
२०. कंकण : २ कंकणांचा आवाज होतो. त्याप्रमाणे पुष्कळ माणसे एकत्र असल्यास कलह होतो. यासाठी ध्यानयोगादी करणार्याने निर्जन प्रदेश शोधून त्या ठिकाणी एकटे राहावे.
२१. शरकर्ता (कारागीर) : कामात गर्क असणार्या कारागिराचे राजाच्या स्वारीकडे लक्ष गेले नाही. कारागिराप्रमाणे मुमुक्षूने सर्व इंद्रिये ईश्वराच्या ठिकाणी लीन करून ध्यान धरावे.
२२. सर्प : दोन सर्प कधीही एकत्र रहात नाहीत किंवा समागमे फिरत नाहीत. त्याप्रमाणे दोन बुद्धीमंतांनी कधी एकत्र फिरू नये, कोणाशी भांडण-तंटा करू नये, विचाराने वागावे.
२३. कोळी (कांतीण) : कोळी पुन्हापुन्हा तंतू काढून घर करू शकतो. ईश्वरही चराचर जग उत्पन्न करून त्याचा लय करून पूर्ववत् ते निर्माण करतो. त्यामुळे जगातील घटनांना महत्त्व देऊ नये.
२४. पेशकार (कुंभारीणमाशी) : कुंभारीणमाशी किड्याला फुंकर मारते. त्यामुळे किड्याला माशीचे ध्यान लागून तो कुंभारीणमाशी बनतो. त्याप्रमाणे मुमुक्षूने गुरुपदिष्ट मार्गाने ईश्वराचे ध्यान धरावे, म्हणजे तो ईश्वरस्वरूप होतो.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘दत्त’)