हिंदु राष्ट्राची स्थापना आणि साधकांचे रक्षण यांसाठी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ दैवी प्रवासात करत असलेले अपार परिश्रम !
गेल्या १ तपाहून (१ तप म्हणजे १२ वर्षे) अधिक काळ श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत, साधकांचे आपत्काळात रक्षण व्हावे आणि सर्वदूर पसरलेल्या महान हिंदु संस्कृतीच्या पाऊलखुणा छायाचित्रे अन् चित्रीकरण या माध्यमांतून जतन व्हाव्यात’, यासाठी अखंड प्रवास करत आहेत. आतापर्यंत त्यांनी लाखो किलोमीटर प्रवास केला आहे. प्रवासातील छान छान छायाचित्रे पाहून कुणाच्याही मनात साहजिकच विचार येतो की, किती छान आहे ! गाडीतून फिरायचे आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रतिदिन वेगवेगळी ठिकाणे पहायची. वरवर हे सगळेच छान आहे; पण हे सगळे घडून येण्यामागे किती परिश्रम असतात, हे सामान्यतः कुणाच्याही लक्षात येत नाही. ही श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची दैवी प्रवासाच्या माध्यमातून एक तपश्चर्याच पूर्ण झाली आहे. या निमित्ताने या सेवेच्या माध्यमातून श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ किती कठोर परिश्रम करत आहेत, हे उलगडण्याचा प्रयत्न करत आहे.
१. भिन्न नैसर्गिक स्थितींत पालटणार्या वातावरणाशी सातत्याने जुळवून घेणे
सप्तर्षी जीवनाडीपट्टीवाचनामध्ये अनेकदा तमिळनाडू राज्यातील किंवा दक्षिण भारतातील मंदिरांमध्ये जाण्यास सांगितले जाते. त्यामुळे आम्ही नेहमी चेन्नई येथे असतो. चेन्नई येथे समुद्रकिनारा असल्यामुळे वातावरण दमट आहे. कधी कधी सप्तर्षी हिमाचल प्रदेश किंवा अन्य थंड हवेच्या ठिकाणी असलेल्या तीर्थक्षेत्री जाऊन दर्शन घेण्यास सांगतात. श्रीचित्शक्ति काकूंना थंडी सहन होत नाही. तरीही सप्तर्षी जेव्हा देवतांचे दर्शन घेणे आणि पूजा करणे, यांसारखे उपाय सांगतात, तेव्हा त्या लगेच निघतात, हे आम्ही प्रत्यक्ष अनुभवले आहे.
कधी तीव्र उन्हात प्रवास करावा लागतो, तर कधी पावसातही जावे लागते. श्रीचित्शक्ति गाडगीळकाकू कधीच माघार घेत नाहीत. थंडी-वारा, ऊन-पाऊस अशा सातत्याने पालटणार्या नैसर्गिक स्थिती स्वीकारून श्रीचित्शक्ति काकू अखंड प्रवास करत असतात. स्वतःला अनेक त्रास होऊनही केवळ हिंदु राष्ट्र स्थापनेतील अडथळे दूर होण्यासाठी आणि साधकांचे रक्षण होण्यासाठी कोणत्याही भौगोलिक अन् नैसर्गिक परिस्थितीचा त्या सामना करतात.
१ अ. बद्रीनाथ येथे तीव्र उन्हात प्रवास करून सर्व प्राचीन ठिकाणांना भेट देणे आणि उन्हामुळे झालेल्या त्रासाकडे सकारात्मकतेने पहाणे : सप्टेंबर २०१७ मध्ये आम्ही बद्रीनाथ येथे गेलो होतो. या परिसरात ‘माणा’ हे गाव आहे. पांडवांनी अज्ञातवासात असतांना या गावात काही काळ वास्तव्य केले होते. आम्हाला या गावातून मार्गक्रमण करत पुढे वसुधारापर्यंत जायचे होते. ‘वसुधारा’ या ठिकाणी वसुदेवाने श्रीविष्णूला प्रसन्न करून घेण्यासाठी तपश्चर्या केली होती. हा सर्व प्रवास पर्वतीय क्षेत्रातील असून अतिशय अवघड आहे. हे अंतर ८ किलोमीटर आहे. पांडव याच मार्गाने स्वर्गाच्या द्वाराच्या दिशेने चालत गेले होते.
१ अ १. पर्वतीय भागात ८ कि.मी. प्रवास पिठ्ठूत अत्यंत अवघडून बसून करणे : ज्यांना या मार्गावरून चालत जाणे शक्य नाही, त्यांच्यासाठी येथे ‘पिठ्ठू’ असतात. एका मोठ्या वेताच्या टोपलीला एका बाजूने कापून त्यामध्ये एक व्यक्ती बसू शकेल, अशी व्यवस्था केलेली असते. व्यक्ती त्यात बसल्यावर त्या टोपलीला बांधलेल्या दोर्यांच्या साहाय्याने वाहक टोपलीत बसलेल्या व्यक्तीला पाठीवर घेतो. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकूंसाठी अशा एका ‘पिठ्ठू’ची व्यवस्था करून आम्ही चालत निघालो. या पिठ्ठूत बसणार्या व्यक्तीचा तोंडवळा वरच्या दिशेने होत असल्यामुळे तिच्या तोंडवळ्यावर थेट सूर्यकिरण पडतात. श्रीचित्शक्ति काकूंना अशा स्थितीत बराच वेळ बसावे लागले. त्यामुळे त्यांच्या तोंडवळ्याची त्वचा काळी पडली. अशा प्रसंगात सूर्यकिरणांपासून त्वचेचे रक्षण करणारे मलम लावले जाते; परंतु असा अनुभवच नसल्यामुळे आमच्याकडून त्यासंदर्भात कोणतीच काळजी घेतली गेली नव्हती. ‘पिठ्ठू’त बसल्यामुळे चालण्याचे श्रम होत नसले, तरी बसण्यासाठी जागा अपुरी असल्याने व्यक्तीच्या दोन्ही पायांच्या मांड्यांना टोपलीची कड रूतून वेदना होतात. ‘पिठ्ठू’त बसल्यावर तोल सांभाळण्यासाठी एक दोरखंड बांधलेला असतो. हा दोरखंड घट्ट धरून ठेवल्याने व्यक्तीचे हात आणि बोटे दुखू लागतात.
१ अ २. पिठ्ठूतून उचलून नेणार्या व्यक्तीला विश्रांती मिळावी, यासाठी थोडा वेळ सर्वांसमवेत चालणे : श्रीचित्शक्ति गाडगीळकाकूंना देहाच्या मर्यादा असूनही अत्यंत दुर्धर ठिकाणी त्या प्रकृतीला झेपेल इतका प्रवास चालत करतात. बद्रीनाथ येथे पिठ्ठूतून उतरून त्या काही अंतर चालत गेल्या. त्या म्हणाल्या, ‘‘या मार्गावरून पांडवही चालत गेले आहेत. त्यांनी जेवढ्या यातना सहन केल्या, त्याच्या तुलनेत आपल्याला होणारा त्रास नगण्य आहे.’’ ‘चालण्याचा थोडासा अनुभव मिळावा आणि पिठ्ठूतून त्यांना उचलून नेणार्या व्यक्तीला विश्रांती मिळावी’, हा श्रीचित्शक्ति काकूंचा काही अंतर चालत जाण्यामागचा हेतू होता. तेथून परत येतांना पुन्हा ८ कि.मी. असाच प्रवास करावा लागला.
१ अ ३. उन्हामुळे तोंडवळा काळवंडला असला, तरी कोणतेही औषधोपचार न करता १ मासात तो पुन्हा सामान्य स्थितीत येणे : बद्रीनाथ हे ठिकाण समुद्रसपाटीपासून अत्यंत उंचीवर असल्यामुळे येथे सूर्याचे अतिनील किरण (UV Rays) पुष्कळ प्रखर असतात. त्यामुळे तेथे इतर ठिकाणांपेक्षा थेट अंगावर पडणार्या सूर्यकिरणांचा त्रास होतो. या प्रवासानंतर श्रीचित्शक्ति काकूंचा तोंडवळा १ मास काळवंडलेला (सनबर्न) होता. अनेक घंटे उन्हात राहिल्यामुळे त्यांचा चेहरा करपल्यासारखा झाला होता. या काळात त्यांच्या तोंडवळ्याचा दाह होत होता; मात्र प्रवासात त्यांनी त्यांना होणारा त्रास जाणवू दिला नाही. ‘माझा रंग पांडुरंगासारखा झाला आहे,’ असे सांगून त्यांनी वातावरण सकारात्मक केले.
१ आ. नेपाळच्या प्रचंड थंड हवामानात परिहार करण्यासह चित्रीकरण आणि छायाचित्रीकरण या सेवाही पूर्ण क्षमतेने करणे : नेपाळमध्ये मुक्तीनाथ या ठिकाणी -७ अंश सेल्सियस (-७0 C) इतके तापमान होते. त्या वेळी अंगावर पांघरूण म्हणून रजई नाही, तर गादीच घ्यावी लागते आणि केवळ कुस पालटली, तरी थंडीने गारठून जायला होते. अशा परिस्थितीतही श्रीचित्शक्ति काकूंनी त्या ठिकाणी आवश्यक ते सर्व परिहार केले. आमच्यासारख्या तरुणांनाही ही थंडी सहन होत नसतांना श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकू केवळ तेथे परिहारच करतात, असे नाही, तर तेथे आवश्यक असलेली छायाचित्रे आणि चित्रीकरण यांतही पूर्ण क्षमतेने सहभाग घेतात.
१ इ. शारीरिक त्रास होत असूनही तीव्र थंडी असलेले अमरनाथ आणि पाठोपाठ तमिळनाडू यांसारख्या उष्ण क्षेत्रांत प्रवास करणे : अमरनाथ यात्रा करतांना आजूबाजूला सगळीकडे बर्फच असतो. कितीही गरम कपडे घातले, तरी थंडी वाजतेच. जुलै २०१९ मध्ये आम्ही अमरनाथ यात्रेला गेलो होतो. तेथील हाडे गोठवणार्या थंडीत श्रीचित्शक्ति काकू यांनी एक रात्र कापडी तंबूत राहून काढली. त्याच वेळी त्यांच्या पायाच्या बोटाला ‘फ्रोझन बाईट’ नावाचा त्रास होत होता. ‘फ्रोझन बाईट’मध्ये शरिराच्या एखाद्या भागातील त्वचा आणि त्याच्या खालील पेशी थंडीने गोठतात. असे असूनही श्रीचित्शक्ति काकूंनी प्रवास चालूच ठेवला. विशेष म्हणजे अमरनाथचे दर्शन झाल्यानंतर लगेच सप्तर्षींनी तमिळनाडू येथील मंदिरांतील देवतांचे दर्शन घेण्यासाठी बोलावून घेतले.
१ ई. प्रचंड पावसात बोटीने प्रवास करून सप्तर्षींनी सांगितलेल्या वेळेत दर्शन घेणे : १३.९.२०२२ या दिवशी आम्ही द्वारका येथील श्री द्वारकाधीश मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो. त्या वेळी तेथे प्रचंड पाऊस पडत होता. अक्षरशः समोरचे बंदरही दिसत नव्हते. अशा पावसात बोटीतून प्रवास करून मंदिरात जायचे होते. पाऊस आणि वादळी वारे यांमुळे बोटपण इतकी हालत होती की, आम्ही किनार्यावर पोचू कि नाही, असे आम्हाला वाटू लागले. अशा स्थितीतही सप्तर्षींनी सांगितलेल्या वेळेत परिहार पूर्ण होण्यासाठी श्रीचित्शक्ति काकू यांची धडपड होती. त्या बोटीवर एक छोटीशी खोलीसारखी व्यवस्था होती. बाहेर पुष्कळच पाऊस असल्यामुळे आम्ही सर्वजण त्या खोलीत कसेबसे बसलो. प्रत्यक्षात त्या खोलीच्या छतातूनही पावसाचे पाणी इतक्या ठिकाणाहून गळत होते की, खोलीत बसूनही श्रीचित्शक्ति काकूंसह आम्ही साधकही भिजलो. सामान्यतः समाजात जे गुरु किंवा धार्मिक क्षेत्रातील अधिकारी असतात, त्यांच्या समवेत त्यांचा पूर्ण लवाजमा असतो. उंची वस्त्रे, उंची व्यवस्था असे सर्व पहायला मिळते. श्रीचित्शक्ति काकू मात्र सामान्य साधकाप्रमाणे प्रवास करतात आणि ज्या ठिकाणी जशी व्यवस्था असेल, ती आनंदाने स्वीकारून विविध मंदिरांत दर्शन घेऊन हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आणि सनातनच्या साधकांच्या रक्षणासाठी विविध उपाय करण्याचे जे मुख्य ध्येय असते, ते भावपूर्णरित्या पार पाडतात.
ही केवळ काही उदाहरणे आहेत. सांगत राहिलो, तर ही सूची संपणारच नाही. गेली अनेक वर्षे श्रीचित्शक्ति काकू कुठेही वाच्यता न करता या सगळ्या परिस्थितीत अखंड प्रवास करत आहेत.
२. वेगवेगळ्या ठिकाणचे आहार, पाणी आदींशी जुळवून घेऊन प्रकृती सांभाळणे
श्रीचित्शक्ति गाडगीळकाकू मूळच्या महाराष्ट्रातील सांगली येथील आहेत. भारतभर आणि प्रसंगी विदेशातही प्रवास करत असतांना सर्वत्रच्या आहारांची पद्धत, चव, पदार्थ सगळेच वेगळे असते. अशा ठिकाणी उपलब्ध वेळेत आणि आपण ज्या परिसरात आहोत, त्या परिसरात जे त्यातल्या त्यात चांगले मिळते, ते स्वीकारावे लागते. बर्याचदा सप्तर्षी अत्यंत दुर्गम ठिकाणी दर्शनासाठी पाठवतात. तेथे अत्यल्प सुविधा उपलब्ध असतात. अलीकडे बहुतांश ठिकाणी शाकाहारी भोजन मिळणे, हेही दुरापास्त झाले आहे. सर्वत्रचे पाणी वेगळे असते. हे सगळे काही दिवसांसाठी नाही, तर वर्षभर करावे लागते. या स्थितीतपण मिळेल ते खाऊन-पिऊनही श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकू आणि त्यांच्या समवेत सेवा करणारे आम्ही सर्व साधक यांचे आरोग्य चांगले राहून सेवा सुरळीत चालू रहातात, हे बुद्धीअगम्य आहे.
कधी कधी सप्तर्षी एकाच दिवसात इतक्या मंदिरांत दर्शन घेण्यास सांगतात की, भूक लागलेली असतांनाही भोजनासाठी न थांबता मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेण्याचा उपाय पूर्ण करावा लागतो; कारण सनातनच्या सर्वत्रच्या साधकांच्या रक्षणासाठी ते आध्यात्मिक उपाय करणे महत्त्वाचे असते. मंदिरे उघडण्याच्या आणि बंद होण्याच्या ठराविक वेळा असतात. त्या पाळाव्याच लागतात. अशा वेळी स्वतःचे सगळे बाजूलाच ठेवावे लागते.
३. एकाच दिवसात अनेक किलोमीटर पायी चालावे लागणे
आपल्याला ठाऊक आहे की, एखाद्या मंदिरात जाणार तर वाहन लावण्याची सोय असते, तेथून त्या देवतेचे मंदिर बरेच दूर असते. दक्षिण भारतातील मंदिरांचा परिसरच अनेक किलोमीटरचा असतो. वाहनातून उतरल्यानंतर मंदिरापर्यंत पोचण्यासाठीच १-२ किलोमीटर चालावे लागते. एखाद्या प्रसंगात महर्षि एकाच दिवशी ७-८ मंदिरांत जाऊन तेथील देवतेचे आशीर्वाद घ्यायला सांगतात. अशा वेळी प्रत्येक मंदिरात जाऊन दर्शन घेणे, पुढच्या पिढ्यांना अशा वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांची माहिती कळावी, यासाठी तेथे आवश्यक ते चित्रीकरण करणे, छायाचित्रे काढणे, अशा सेवा ७-८ ठिकाणी कराव्या लागतात. बहुतांश मंदिरांत पुष्कळ गर्दी असते. त्याही परिस्थितीत हे सगळे करणे, आपली वेळ गाठणे आणि हे सर्व इतक्या भावपूर्ण करायचे की, ती देवता सनातनवर प्रसन्नच होते. हे अत्यंत कठीण असते.
साधकांचे कठीण काळात रक्षण व्हावे आणि कार्यातील अडथळे दूर व्हावेत, यासाठी सप्तर्षींनी त्या त्या देवतांचे आशीर्वाद घ्यायला सांगितलेले असतात. तिथे कोणतीच सवलत घेता येत नाही. सामान्य व्यक्ती एखादा दिवस अशा ठिकाणी गेली, तर तिला दगदग होते आणि नंतर विश्रांती घ्यावी लागते. श्रीचित्शक्ति गाडगीळकाकू तर एक महिला आहेत. त्या वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही हे कसे बरे करत असतील ?
४. सामान्य साधनांमध्ये अवघडून बसून प्रवास करणे
अनेक देवस्थानांच्या ठिकाणी जाण्याचा रस्ता दुर्गम असतो. अशा वेळी खेचर (घोड्यासारखा प्राणी), डोली यांतून प्रवास करावा लागतो. सर्व देवस्थानांच्या ठिकाणी वेगवेगळ्या सुविधा असतात. या सुविधांमुळे व्यक्तीला चालत जावे लागत नाही, इतकाच त्याचा लाभ होतो. अशा साधनांमध्ये अतिशय अवघडून बसावे लागते. बेटद्वारका येथे गेल्यावर तर आपल्याकडे फळेविक्रेत्यांकडे जसे गाडे असतात, तसे गाडे एका देवस्थानच्या मार्गावर उपलब्ध होते. त्याच्यावर बसूनही श्रीचित्शक्ति काकूंनी प्रवास केलेला आहे. काही ठिकाणी काहीच मिळाले नाही, तर शेकडो पायर्या चढूनही जावे लागते. कित्येक किलोमीटर चालत जावे लागते. दुर्गम भागांत रस्तेही खराब असतात. अशा रस्त्यांवर अनेक किलोमीटरपर्यंत धडधड सहन करत प्रवास करणे, हे गेली १२ वर्षांहून अधिक काळ श्रीचित्शक्ति काकू साधना म्हणून करत आहेत.
५. स्वतःच्या स्थितीचा विचार न करता अखंड कार्यरत रहाणे
आश्रमात असतांना आपल्याला बरे नसेल, तर आपण सांगू तरी शकतो की, आज प्रकृती ठीक नाही. मला सेवेसाठी येता येणार नाही. दैवी प्रवासांतर्गत साधकांच्या रक्षणासाठी एक एक मिनिट महत्त्वाचे असतांना कुणाला अडचण सांगायची ? अनेकदा असे झाले आहे की, श्रीचित्शक्ति काकूंचे प्रकृतीस्वास्थ्य ठीक नसतांनाही त्यांनी एका दिवसांत वेगवेगळ्या ८-९ ठिकाणच्या मंदिरांना भेट देऊन उपाय केले आहेत. एकेकदा या कार्याची गतीच इतकी असते की, ‘आपल्याला बरे वाटत आहे ना !’ याचा विचारही करता येत नाही. त्यातही ‘साधकांच्या रक्षणासाठी सांगितलेले परिहार करतांना श्रीचित्शक्ति काकू स्वतःचा विचार करतील’, हे तर शक्यच नाही !
६. गुरुचरणी सर्वस्व अर्पण केलेल्या साधकांविषयी भाव दर्शवणारे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे उद्गार !
६ अ. साधकांसाठी होईल, ते सर्व करायचे आहे ! : अनेक टप्प्यांवर प्रतिकूलता असूनही मी आतापर्यंत श्रीचित्शक्ति काकूंकडून कधीच ऐकले नाही, ‘‘आता पुष्कळ होत आहे. मला जमत नाही. मंदिरात नको जायला.’’ श्रीचित्शक्ति काकू यांच्या मनात नेहमी केवळ एकच विचार असतो. तोच त्यांच्या मुखातून वारंवार ऐकायला मिळतो. त्या म्हणतात, ‘‘साधकांना गुरुदेव सोडून कोण आहे ? अशा साधकांसाठी आपल्याला हे सर्व करायचे आहे. बाकी जे होईल ते होईल.’’
६ आ. साधकांच्या रक्षणासाठी सप्तर्षी सांगतील तितक्या मंदिरांमध्ये जाऊया ! : अनेक वेळा आम्ही साधक तरुण आणि पुरुष असूनही कधी कधी आम्हाला दमायला होते. तेव्हा ‘राहिलेले उद्या करूया का ?’, असे विचारले असता श्रीचित्शक्ति काकू सांगतात, ‘‘हे आपल्यासाठी असते, तर आपण नक्कीच थांबलो असतो; पण हे सर्व आपल्या साधकांसाठी आहे. साधक गुरुचरणी सर्वस्वाचा त्याग करून साधना करत आहेत. त्यामुळे त्यांच्या रक्षणासाठी सप्तर्षी सांगतील तितक्या मंदिरांमध्ये जाऊया; पण थांबायला नको.’’
६ इ. साधकांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहू ! : ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांसाठी दिवस-रात्र एक केले आहे’, तोच दृष्टीकोन सतत श्रीचित्शक्ति काकू यांच्याकडूनही सतत ऐकण्यास मिळतो. ‘‘गुरुदेवांनी उभी केलेली सनातन संस्था आणि साधकांसाठी घेतलेले कष्ट आम्ही (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी) विसरून कसे चालेल ? त्यामुळे आम्हाला हे करणे भागच आहे. सनातनचे सर्व साधक आमचीच मुले आहेत. त्यांच्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत जे करावे लागेल, ते आम्ही आनंदाने करू.’’ श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ ज्या ज्या वेळी दौर्यावर आल्या आहेत, त्या त्या वेळी त्यांचाही प्रत्येक विचार आणि कृती अशीच असते. तेव्हा ‘या दोघी एकच आहेत’ याचे प्रत्यक्ष दर्शन घडते.’
हे सगळे पाहिल्यावर लक्षात येते की, गुरुदेवांनी किती थोर उत्तराधिकारी निवडले आहेत ! त्या सद्गुरु असल्या, तरी त्यापण एक स्त्री आहेत. एक महिला असूनही एवढे कठोर परिश्रम घेतांना त्यांना किती त्रास होत असेल ! केवळ साधकांसाठी त्या कधीच कोणताही विचार न करता सप्तर्षी सांगतील, तसे करतात ! बाहेर असे कोण आहे, जे स्वतःचा विचार न करता साधकांसाठी स्वतःची लेकरे असल्यासारखा प्रवास आणि इतके श्रम घेतील !
साधकांसाठी परिश्रम घेण्याच्या सर्व मर्यादा पार करणारे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव आणि त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चरणी अखंड साधनारत रहाणे, हीच त्यांच्या चरणी खरी कृतज्ञता आहे ! त्यांच्या कोमल चरणी कोटी कोटी वंदन !
– श्री. स्नेहल मनोहर राऊत (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), फोंडा, गोवा. (१६.११.२०२२)