‘लिव्ह इन रिलेशनशिप’च्या विघातक विचारांना नाकारणे हे राष्ट्रीय कर्तव्य !

  • गृहस्थाश्रम राष्ट्रीय जीवनाचा आधार !

  • ‘लिव्ह इन रिलेशनशिप’चे दुष्परिणाम जाणून ही विकृती हद्दपार करण्यासाठी हिंदूंनी संघटितपणे प्रयत्न करायला हवेत !

‘विवाह न करता स्त्री-पुरुष एकत्र राहू शकतात’, अशी एक संकल्पना समाजात रूढ होत आहे. याला इंग्रजीत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’, असे म्हणतात. ही संकल्पना आपल्या भूमीत शेतातील तणासारखी आहे. तण ज्याप्रमाणे पिकाची हानी करते, त्याप्रमाणे ही संकल्पना आपली विवाह संस्था उद्ध्वस्त करायला कारणीभूत ठरत आहे. आपली विवाह संस्था म्हणजेच गृहस्थाश्रम होय.

हिंदु समाजजीवनात ४ प्रकारचे आश्रम आहेत. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम या ४ आश्रमांपैकी केवळ गृहस्थाश्रमातच अर्थार्जन करता येते, म्हणजेच ब्रह्मचर्याश्रम, वानप्रस्थाश्रम अन् संन्यासाश्रम हे ३ आश्रम उदरनिर्वाहासाठी गृहस्थाश्रमावर अवलंबून असतात. ब्रह्मचर्याश्रमामध्ये म्हणजे आजच्या परिभाषेत सांगायचे झाल्यास विद्यार्थीवर्ग येतो. हा विद्यार्थीवर्ग अर्थार्जन करू शकत नाही. त्यासाठी त्याला कुटुंबावर अवलंबून रहावे लागते. आज अनेक सामाजिक संस्था काम करत आहेत. त्यांना काम करण्यासाठी लागणार्‍या धनाचे साहाय्य गृहस्थाश्रमी लोकांकडून म्हणजेच विवाह संस्थेतील लोकांकडून होते. आजही आपल्या समाजामध्ये अनेक संन्यासी आहेत. त्यांचा चरितार्थ चालवण्यासाठी गृहस्थाश्रमी लोकांचेच साहाय्य होते. या चारही आश्रमांचे मिळून राष्ट्र निर्माण होते; म्हणूनच ‘गृहस्थाश्रम हा राष्ट्रीय जीवनाचा आधार आहे’, असे म्हटले आहे.

१. विवाह संस्थेविषयी केला जाणारा कांगावा !

विवाह याचा अर्थ दोन कुटुंबांचे मिलन असा आहे. केवळ दोन व्यक्तींचे मिलन म्हणजे विवाह नाही. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. या आधुनिक काळात वेदांचा अभ्यास आपण केला नाही. त्यामुळे वेदांमध्ये याविषयी काय सांगितले आहे ? ते आपल्याला ठाऊक नाही. आपले आचार आणि विचार यांवर पाश्चात्त्य जगताचा प्रभाव आहे. त्यामुळे विवाह हा संस्कार न रहाता त्याचे रूपांतर समारंभात झाले आहे.

‘लिव्ह इन रिलेशनशिप’चा कैवार घेणार्‍या लोकांच्या मते विवाह संस्थेची आवश्यकता नाही. त्यांच्या लेखी लग्नव्यवस्था परिपूर्ण आणि आदर्श नाही. ‘विवाह संस्था स्त्रीचे शोषण करते; म्हणून ती वाईट आहे’, असे काही लोकांना वाटते. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मुळे भारतीय संस्कृतीचे अध:पतन होत नाही’, असा प्रचारही त्याचा पुरस्कार करणार्‍या लोकांकडून केला जातो. हिंदु संस्कृतीला सुरुंग लावणारे काही लोक आहेत. ते हिंदु धर्म आणि संस्कृती यांमधील वचनांना तथ्यहीन ठरवत आहेत.

श्री. दुर्गेश परुळकर

२. स्त्री ही विवाह संस्थेचा कणा असणे

‘स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, हृदयी अमृत नयनी पाणी’, असे एक विधान असून भारतीय संस्कृतीने स्त्रीला उपभोगाची वस्तू मानलेले नाही. कुटुंबसंस्थेचा किंवा विवाह संस्थेचा स्त्री हा कणा आहे. अपार कष्ट करून ती आपल्या कुटुंबाची वात्सल्याने आणि ममतेने जोपासना करते. तिच्या अंत:करणात प्रेम, आत्मीयता आणि वात्सल्य यांचा अमृतमय झरा आहे. आपल्या कुटुंबाविषयी तिच्या मनात उत्कट भावना आहेत. कुटुंबातील कुणालाही कोणत्याही प्रकारची वेदना, दुःख झाले, तर तिच्या डोळ्यांत सहजतेने पाणी येते, असा या शब्दाचा अर्थ आहे. सद्भावना, आत्मीयता यांचे ती प्रतीक आहे.

३. ‘जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी रहा’, अशी शुभेच्छा अथवा ‘विवाह झाल्यानंतर मुलीने तिच्या सासरी आनंदाने रहावे, सुखाने संसार करावा’, असा आशीर्वाद या वचनाने नववधूला दिला आहे.

४. ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धारी’, या निसर्ग नियमाप्रमाणे स्त्रीच बाळाला जन्म देते. कोणत्याही संस्कृतीने किंवा पुरुष जातीने तिच्यावर हे दायित्व लादलेले नाही.

५. भारतीय संस्कृतीने स्त्रीला दिलेले महत्त्व

सभ्य समाजात शालीनता हा अलंकार मानला गेला आहे. जन्माला येणार्‍या बाळावर पहिला संस्कार मातेकडून होतो. आपल्या संस्कृतीने देव आणि पिता यांना नमस्कार करण्याआधी मातेला नमस्कार करायला सांगितले आहे. ‘मातृदेवो भव । पितृदेवो भव । आचार्यदेवो भव । ( तैत्तिरीयोपनिषद्, शिक्षा, अनुवाक ११, वाक्य २) कुलदेवताभ्यो नम: ।’, म्हणजे ‘आई, वडील आणि आचार्य यांना देवता मानणारा. कुलदेवतांना नमस्कार असो’, असे म्हटले असून माता हीच बाळाचा पहिला गुरु आहे; म्हणूनच स्त्री जगाचा उद्धार करणारी आहे, असे या वचनात म्हटले आहे.

६. स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता !

मानवी प्रजा वाढण्यासाठी स्त्री-पुरुष एकत्र यावे लागतात. ‘प्रजोत्पादनाच्या हेतूनेच त्यांनी एकत्र यावे’, अशी शिकवण हिंदु संस्कृती देते. ‘स्त्रीकडे वासनामय दृष्टीने पाहू नये. तिच्याकडे तसे पहाणे, हे पाप आहे’, अशी शिकवण देणारी हिंदु संस्कृती आहे. या दृष्टीनेच ‘स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता असते’, असे या वचनातून सांगण्यात आले आहे. याचा विकृत अर्थ काढून या वचनांना बाष्कळ ठरवणारे स्वतःला विद्वान म्हणून घेतात. ही मंडळी जाणीवपूर्वक हिंदु संस्कृती नष्ट करण्यासाठी अशा प्रकारचे कुविचार मांडून मोकळे होतात.

७. संस्कारांना महत्त्व न दिल्याने मानवी जीवनाचे अधःपतन होणे

‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये रहाणारे आफताब आणि श्रद्धा यांच्यात भांडणे होऊन ती विकोपाला गेली अन् त्यात श्रद्धाची हत्या झाली. माणसाने आपली विकृती दूर केली नाही, तर माणूस क्रूर होतो. माणसातील पशुत्व नष्ट करण्यासाठी संस्कार आवश्यक आहेत. संस्कारामुळेच माणूस सज्जनतेने आणि सभ्यतेने वागतो. संस्काराला महत्त्व न देता स्वैराचाराने वागल्यावर मानवी जीवनाचे अध:पतनच होते.

८. ऋग्वेद आणि अथर्ववेद यांत सांगितलेले गृहस्थाश्रमाचे महत्त्व अन् त्यांत केलेले मार्गदर्शन

हिंदु संस्कृती संस्कारांना महत्त्व देणारी आहे. हिंदु संस्कृतीत एकूण ४८ प्रकारचे संस्कार सांगण्यात आले आहेत. त्यांपैकी केवळ महत्त्वाचे १६ संस्कार करण्याचा आग्रह धरला आहे. या १६ संस्कारांमध्येच विवाह संस्कार येतो. ऋग्वेद आणि अथर्ववेद यांत गृहस्थाश्रमाचे महत्त्व सांगण्यात आले आहे. आपली संस्कृती आणि वेद यांनीसुद्धा स्त्रीला किंवा पुरुषाला कुणालाही न्यून लेखलेले नाही. विवाह करून पतीच्या घरी जाणार्‍या वधूला ऋग्वेद आणि अथर्ववेद सांगतात.

‘हे स्त्री तू सासरा, सासू, नणंद, दीर इत्यादी सर्वांसह सासरी सम्राज्ञी होऊन रहा. राणी ज्याप्रमाणे राजमहालात आनंदात रहाते, त्याप्रमाणे तू राणीसारखा अधिकार चालवत तेथे सुखाने रहा. तू दासी भावनेने हीन अवस्थेत राहू नकोस’, असे नववधूला वेद सांगतात. याचा अर्थ ‘सासरच्या लोकांनी नववधूला समानतेची वागणूक द्यावी’, असा होतो. ‘दुसर्‍या घरातून आपल्या घरात आलेल्या नवविवाहित स्त्रीचा सन्मान केला गेला पाहिजे’, असे मार्गदर्शन वेदांनी गृहस्थाश्रमींना केले आहे.

९. गृहस्थाश्रम ‘संस्कार केंद्र’ असल्याने त्याद्वारेच कुटुंब, समाज आणि राष्ट्र यांचा विकास होणे

स्त्री-पुरुषांना मार्गदर्शन करतांना वेद सांगतात, ‘स्त्री-पुरुषांचे विचार शुद्ध असावेत, भाषा शिष्टसंमत असावी. प्रत्येकाने आपले आचरण पवित्र ठेवावे. माणूस हा पवित्र भाषण, सदाचार यांमुळेच पूजनीय आणि वंदनीय होतो.’ थोडक्यात ‘प्रत्येकाचे विचार, आचार आणि उच्चार तिन्ही शुद्ध, पवित्र अन् उच्च असावेत’, असे मार्गदर्शन करण्यात आले आहे. गृहस्थाश्रमात अशा प्रकारचे संस्कार करण्यात येतात; म्हणूनच गृहस्थाश्रम हे संस्कार केंद्र आहे. असे संस्कार झाल्यावर सज्ज होणारे नागरिक समाजात आचार, विचार शुद्ध ठेवून वावरतील. त्यामुळे कुटुंब, समाज आणि राष्ट्र यांचा विकासच होणार आहे.

१०. वेदांनी गृहस्थाश्रमाविषयी केलेले विश्लेषण

ब्रह्मचर्येण कन्या युवानं विन्दते पतिम् ।

– अथर्ववेद, काण्ड ११, सूक्त ५, खण्ड १८

अर्थ : मुलीने ब्रह्मचारी राहून (उत्तम शिक्षण प्राप्त करून) युवती झाल्यावर (यौवनात आल्यावर) पती प्राप्त करावा (विवाह करावा.)

मुलांप्रमाणे मुलीसुद्धा गुरुकुलात रहात होत्या. गुरुकुलातून आलेला मुलगा आणि मुलगी दोघेही विद्वान होते. अशा दोन विद्वान मुलामुलींचा विवाह केला जात होता. त्यामुळे विवाहामध्ये म्हटल्या जाणार्‍या मंत्रांचा त्यांना सहज अर्थ कळत होता. धनहीन माणसाला आपला प्रपंच चालवता येत नाही. त्यामुळे त्याला गृहस्थाश्रमाचे पालन उत्तम प्रकारे करता येत नाही. वेदांनी प्रत्येकाला स्वतंत्र विचार करण्याची पूर्ण मुभा दिली आहे; पण स्वतंत्र विचारांच्या आहारी जाऊन परिवारात असंतोष निर्माण करणे, हे शहाणपणाचे लक्षण नाही.

११. राष्ट्राचा उत्कर्ष होण्यासाठी पुरुषांएवढेच स्त्रियांचेही योगदान असणे

सुवाना पुत्रान्महिषी भवाति गत्वा पतिं सुभगा वि राजतु ।

– अथर्ववेद, काण्ड २, सूक्त ३६, खण्ड ३

अर्थ : सौभाग्यवती स्त्रीने पती प्राप्त करून त्याला साजेसे राहून पुत्रांना जन्म देऊन राणीप्रमाणे रहावे.

मानवी प्रजा वाढवण्याचे दायित्व निसर्गाने स्त्रीवर सोपवले आहे; म्हणून स्त्रिया संतती निर्माण करतात. त्यामुळे देशातील प्रजा वाढते म्हणजे राष्ट्र वाढते. ‘प्रजेची अभिवृद्धी करण्याचे महान कार्य स्त्री करते म्हणून वेदांनी स्त्रियांना महाराणीप्रमाणे मान द्यावा’, असे म्हटले आहे. केवळ पुरुषांच्या योगदानामुळे राष्ट्राचा उत्कर्ष होत नाही, तर राष्ट्राचा उत्कर्ष होण्यासाठी पुरुषांएवढेच स्त्रियांचेही योगदान असणे नितांत आवश्यक आहे. म्हणून स्त्रियांना राणीप्रमाणे वागवावे, असे वेद सांगतात.

१२. राष्ट्राचा उत्कर्ष करण्यात संस्काराचे महत्त्व

‘संपूर्ण कुटुंबाने परस्परांना सहकार्य करावे. परस्परांना अनुकूल असे वर्तन कुटुंबातील प्रत्येक सदस्याने केले पाहिजे’, असा अलिखित नियम गृहस्थाश्रमाचा आहे. अथर्ववेदाने अमृत आणि आनंद प्राप्त करण्यासाठी गृहस्थाश्रम असल्याचे सांगितले आहे. अमृत याचा अर्थ दीर्घजीवन (दीर्घायुष्य) आणि आनंद याचा अर्थ मनाला शांतीपूर्ण सुख प्राप्त व्हावे. असे वर्तन परिवारातील प्रत्येक सदस्याचे असले पाहिजे. कुटुंबातील प्रत्येकाचे परस्परांवर आदरयुक्त प्रेम असले पाहिजे. आदरयुक्त प्रेमामुळेच मन आनंदी आणि प्रसन्न रहाते. परिणामी कोणताही ताणतणाव रहात नाही. जीवनात उत्साह टिकून रहातो. मानसिक मरगळता येत नाही. एकटेपणाची भावना रहात नाही. मन, बुद्धी, चित्त सुदृढ आणि निरोगी रहाते. हे सर्व आदरयुक्त प्रेमामुळे घडून येते; म्हणून घरातील कोणत्याही व्यक्तीने कुणीशीही कपटाने वागू नये. परस्परांना प्रेम द्यावे. प्रत्येकाच्या मनात स्नेहभाव असावा. हात स्नेहभाव समाजाला संघटित करतो. असा संघटित समाज राष्ट्राचा उत्कर्ष करण्यास समर्थ असतो. कुटुंबसंस्थेत केले जाणारे हे संस्कार राष्ट्राला सबळ करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

१३. वेदांच्या शिकवणीकडे दुर्लक्ष करून ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ स्वीकारल्यास कुटुंबसंस्था उद्ध्वस्त होण्याची शक्यता असणे

‘स्त्रियांवर अत्याचार होत असतील, तर तो राष्ट्राचा घात आहे. ज्या राष्ट्रात स्त्रियांवर अत्याचार, बलात्कार होतात, ते राष्ट्र लयास जाते; म्हणूनच राष्ट्राचा नाश होऊ नये, यासाठी राष्ट्रानेच स्त्रियांच्या शीलाचे रक्षण आणि संवर्धन करावे’, असे मार्गदर्शन अथर्ववेदात केले आहे.

हिंदु राष्ट्राची हानी करण्यासाठीच कुटुंबसंस्थेवर आघात करण्याचा घाट घातला जात आहे. त्यासाठीच ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ ही संकल्पना आपल्या भूमीत रुजवण्याचा प्रयत्न चालू आहे. वेदांच्या शिकवणीकडे दुर्लक्ष करून या संकल्पनेचा स्वीकार केल्यास आपली कुटुंबसंस्था उद्ध्वस्त होईल. त्याचा परिणाम राष्ट्र उद्ध्वस्त होण्यात होईल. म्हणून विवाह किंवा कुटुंब संस्था आपण सुरक्षित राखली पाहिजे आणि हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्यासाठीच आपण ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ सारख्या विघातक विचारांना नाकारले पाहिजे.

(संदर्भ-अथर्ववेद-गृहस्थाश्रम-भाग ३, लेखक – म.म. ब्रह्मर्षि पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर)

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली (१.१२.२०२२)