पंढरपूर विकास आराखड्याच्या विरोधात वारकरी संप्रदायाची दिंडी !
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – ‘येथील विकास आराखडा सिद्ध करतांना संपूर्ण वारकरी संप्रदायाला विश्वासात घेऊन करावा’, या मागणीसाठी मंदिर परिसरात सर्व वारकर्यांनी दिंडी आंदोलन करत या विकास आराखड्याचा निषेध केला. या वेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात आली. या वेळी ‘विकास आराखड्यात वारकर्यांना विश्वासात न घेता आराखडा सिद्ध करण्यात आला आहे’, असा आरोप महाराज मंडळींनी केला आहे. या दिंडीमध्ये संत तुकाराम, संत नामदेव महाराज यांच्या वंशजांसह वारकरी फडकरी दिंडी संघटना, वारकरी संप्रदाय पाईक संघ, विश्व वारकरी संघ, अखिल भाविक वारकरी संघटना आदी संघटना सहभागी झाल्या होत्या.
‘वारकरी संप्रदाय विकासाला कधीही विरोध करणार नाही; मात्र विकास आराखड्यासाठी शासनाने आमच्याशी चर्चा करावी, आम्हाला विश्वासात घ्यावे. शासनाची विकास आराखड्याविषयीची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम आहे’, असे मत काही महाराज मंडळींनी या वेळी मांडले.