साधू-संतांचे विचार आचरणात आणल्यास देश पालटेल ! – दिगंबर कामत, माजी मुख्यमंत्री, गोवा.
‘श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट’च्या वतीने आयोजित पुणे येथील ‘गुरुमाहात्म्य’ पुरस्कार वितरण सोहळा !
पुणे – आज देशामध्ये काय चालले आहे, हे आपण पहात आहोत. आई-वडिलांची सेवा मुलांनी करायला हवी; परंतु समाजात वृद्धाश्रम वाढत चालले आहेत. वृद्धाश्रम स्थापन करणे ही समाजाची परंपरा नाही. तरीही ती संख्या वाढत आहे. अनेकजण साधू-संतांचे विचार ऐकण्यासाठी जातात; पण नंतर ते विसरले जातात. ते विचार आचारणात आणले, तर देश पालटायला वेळ लागणार नाही, असे मत गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी व्यक्त केले. बुधवार पेठेतील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या वतीने शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त १२५ वा दत्त जयंती सोहळा स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये ‘गुरुमाहात्म्य’ पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या वेळी ते बोलत होते.
या वेळी स्वामी गोविंददेव गिरी महाराज म्हणाले की, दत्तप्रभु माझ्या जीवनात निर्णायक ठरले आहेत. त्यांच्या नावाच्या ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा पुरस्कार मी गुरुप्रसाद म्हणून स्वीकारला आहे. हे शरीर यापुढे रामकार्यासाठी राहील. देशात परिवर्तन घडत आहे, ते पुढे चालत राहो. देशाचे सांस्कृतिक संरक्षण करायचे असेल, तर वेगवान पद्धतीने काम करायला हवे.
‘बीव्हीजी ग्रुप’चे प्रमुख हणमंतराव गायकवाड म्हणाले की, ‘बीव्हीजी’ अनेक मंदिरांचे काम करत आहे. आता अयोध्येतील श्रीराम मंदिराची सेवा करण्याचीही संधी मिळावी.
या वेळी उपस्थित माजी आमदार उल्हास पवार म्हणाले की, गुरूंचा महिमा आणि गुरूंचे स्थान महत्त्वाचे आहे. प्रत्येकाच्या जीवनात गुरूंना महत्त्वाचे स्थान आहे.
या वेळी धार्मिक कार्यासाठी स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांना पुरस्कार, तर सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार सार्वजनिक स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेल्या ‘बीव्हीजी ग्रुप’चे प्रमुख हणमंतराव गायकवाड यांना प्रदान करण्यात आला. लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट आणि श्री मुकुंद भवन ट्रस्ट, तसेच श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग यांच्या सहयोगाने श्री दत्त भक्ती कथा हा कार्यक्रम प्रतिदिन दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत होणार आहे. प्रतिदिन सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. ‘सर्व कार्यक्रमांना प्रवेश विनामूल्य असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने यात सहभागी व्हावे’, असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.