गीतापठणातील ध्वनीलहरींच्या सकारात्मकतेचा वैज्ञानिक स्तरावर होणार अभ्यास !
नागपूर येथे ४ सहस्र महिलांचे एकाच वेळी गीतापठण !
नागपूर – संस्कृत सखी सभा, नागपूरच्या वतीने ४ डिसेंबर या दिवशी ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालय, क्रीडा चौक, हनुमाननगर येथे आयोजित खासदार सांस्कृतिक महोत्सवात विक्रमी अशा ‘संपूर्ण (१८ अध्यायी) श्रीमद्भगवद्गीता पठण महावाग्यज्ञा’त अनुमाने ४ सहस्र महिलांनी एकाच वेळी गीतापठण केले. ‘यज्ञाच्या वेळी उच्चारण्यात येणार्या मंत्रांच्या ध्वनीलहरींमुळे वातावरणात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो’, असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे गीतापठणाच्या वेळी निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध करण्यासाठी या वेळी सामूहिकरित्या उच्चारल्या जाणार्या श्लोकांमुळे निर्माण होणार्या ध्वनीलहरींचे मापन केले जाणार आहे. जळगावचे ध्वनीलहरी अभ्यासक आणि संशोधक अविनाश अन् आकांक्षा कुळकर्णी हे दांपत्य कार्यक्रमाच्या वेळी उत्पन्न होणार्या ध्वनीलहरींचा वैज्ञानिक दृष्टीने अभ्यास करणार आहेत.
या सामूहिक गीतापठण महायज्ञातील उपक्रमासाठी महाराष्ट्रासह भाग्यनगर, बेंगळूरू, मंगळूरू, इंदूर आणि रायपूर येथील महिलांनी नोंदणी केली होती. विविध भागांतून अनुमाने ४ सहस्र महिला या गीतापठण उपक्रमात सहभागी झाल्या होत्या. अनेक शाळा आणि महाविद्यालये यांचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. या उपक्रमाच्या स्वागताध्यक्ष कांचन गडकरी होत्या. संयोजिका डॉ. विजया जोशी आणि समन्वयिका सोनाली अडावदकर आहेत.