कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्रसंगी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश घोषित करू ! – जिल्हाधिकारी, बेळगाव
बेळगाव – सीमा प्रश्नावरून महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात सध्या तणावपूर्ण वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे समन्वयकमंत्री त्यांचा दौरा रहित करतील, अशी अपेक्षा आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रसंगी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश घोषित करू, अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली. कन्नड संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून ‘महाराष्ट्रातील मंत्र्यांना बंद करा’, अशी मागणी केली. त्या वेळी त्यांनी हे आश्वासन दिले.
‘महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई ६ डिसेंबरला बेळगाव येथे जाणार आहेत; मात्र या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जो निर्णय घेतील, त्याप्रमाणे आम्ही तिकडे जाण्याचे नियोजन करू’, असे शंभूराज देसाई यांनी सांगितले. या काळात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये; म्हणून कोगनोळी पथकर नाक्यावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.