सनातन धर्माच्या अस्तित्वासाठी हिंदु राष्ट्राचे लक्ष्य पूर्ण करा ! – कपिल मिश्रा, संस्थापक, हिंदु इकोसिस्टम
हिंदु जनजागृती समिती आयोजित उत्तर भारत हिंदु राष्ट्र अधिवेशन पार पडले !
देहली – हिंदु राष्ट्राचे पहिले युद्ध वैचारिक आहे. आपली पिढी धर्मनिष्ठ बनली नाही, तर येणार्या काळात सामर्थ्य असतांनाही हिंदू पराजित होतील. आज आपला पैसा भारताच्या विरोधकांकडे जात आहे. त्या पैशाने ते हिंदु धर्माचे कार्य करणार्यांना लक्ष्य करत आहेत. त्यामुळेच आज संपूर्ण जगात सनातन धर्माच्या अस्तित्वासाठी हिंदु राष्ट्राचे लक्ष्य पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. या विश्वात एकतरी भूमी अशी असावी की, जिला ‘ही आपली भूमी आहे’, असे म्हणता येईल. त्यामुळे सर्वांनी हिंदु राष्ट्राच्या समर्थनासाठी उभे राहिले पाहिजे. जातीचा अहंकार त्यागून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी लोकशाही मार्गाने वैचारिक संघर्षासाठी सिद्ध झाले पाहिजे. त्यानंतर हिंदूंचे परम वैभव निश्चित आहे, असे प्रतिपादन ‘हिंदु इकोसिस्टम’चे संस्थापक श्री. कपिल मिश्रा यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देहलीमधील कालकाजीच्या श्री लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये (सनातन धर्म मंदिरामध्ये) दोन दिवसांचे ‘उत्तर भारत हिंदु राष्ट्र अधिवेशन’ आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत करत होते. या अधिवेशनामध्ये मध्यप्रदेश, राजस्थान, पश्चिम उत्तरप्रदेश, हरियाणा, पंजाब, चंडीगड, देहली, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू आदी १० राज्यांमधून ३७ हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, मंदिर विश्वस्त, अधिवक्ता आणि विचारवंत असे १७२ जण सहभागी झाले होते.
हिंदु राष्ट्राचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी आपल्या भागातील हिंदु शक्तींना संघटित करा ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती
हिंदु राष्ट्रासाठी समविचारी हिंदु शक्तींना जोडून आपल्या भागातील मंदिरे, गोमाता, हिंदू यांच्या रक्षणाचा संकल्प करावा लागेल. हिंदु राष्ट्राचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी समर्पित भावाने कार्य करा. कालप्रवाह हा हिंदु राष्ट्रासाठी अनुकूल आहे. आपल्याला प्रत्येक हिंदुपर्यंत केवळ हिंदु राष्ट्राचा विचार पोचवायचा आहे.
हिंदूंनी पुष्कळ गमावले, आता हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी धर्मतेज जागवा ! – स्वामी वेदतत्त्वानंद पुरी
एकेकाळी अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश ही राष्ट्रे हिंदूंची भूमी होती. तेथे हिंदू रहात होते; परंतु आज भारतातीलच ३५ ते ४० टक्के हिंदू स्वत:ला हिंदु समजत नाहीत. आतापर्यंत हिंदू केवळ गमावत आले आहेत. देश गमावला, राज्य गमावले आणि आता तर गल्लीही गमावत आहेत. त्यामुळे भारतासह प्रत्येक देश हिंदु राष्ट्र करण्याचा विचार केला पाहिजे. त्यासाठी आता हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी धर्मतेज जागवण्याची आवश्यकता आहे.
हिंदु धर्मावरील आक्रमण टाळण्यासाठी सतर्क रहा ! – विनोद बंसल, राष्ट्रीय प्रवक्ते, विश्व हिंदु परिषद
देशद्रोह्यांना धडा शिकवण्यासाठी कठोर कायदा बनवणे आवश्यक आहे. जोपर्यंत यशप्राप्ती होणार नाही, तोपर्यंत सक्रीय रहाण्याचा संकल्प करावा लागेल. आज ‘चादर (धर्मांध) आणि फादर (ख्रिस्ती)’ यांच्याकडून हिंदु धर्मांवर लागोपाठ आक्रमण होत आहेत. त्यांच्याकडून परत देशाचे विभाजन होऊ नये, यासाठी समाजाने संकल्पित झाले पाहिजे. हिंदु धर्मावर कुणीही कोणत्याही प्रकारचे आक्रमण करू नये, यासाठी आपण सतर्क रहायला हवे.
राज्यघटनेतील ‘सेक्युलर’ (धर्मनिरपेक्ष) हा शब्द हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडचण ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था
कायदा चांगला असेल, तर राज्य चांगले राहील. कायदा निधर्मी असेल, तर राज्यही निधर्मी असेल. आजचे कायदे अल्पसंख्यांकांच्या हिताचे आहेत. राज्यघटनेत अवैध पद्धतीने ‘सेक्युलर’ शब्द अंतर्भूत करण्यात आला आहे. त्याची कुठेही व्याख्या करण्यात आलेली नाही. असा व्याख्याहीन शब्दच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेमध्ये अडचण आहे. त्यामुळे त्याला हटवण्यासाठी घटनात्मक प्रक्रियेच्या म्हणजेच आंदोलने, संसद आणि सर्वाेच्च न्यायालय यांच्या माध्यमातून लढा द्यावा लागेल.
जगातील प्रत्येक हिंदूचे रक्षण करणे आमचे उत्तरदायित्व ! – जय आहुजा, अध्यक्ष, ‘निमित्तेकम्’ संघटना
पाकिस्तानातील हिंदू आज नरकयातना सहन करत आहेत. ते भारताच्या हिंदु समाजाकडे साहाय्याची आशा लावून बसले आहेत. ‘सीएए’ (नागरिकत्व सुधारणा कायदा) त्वरित लागू करून त्यांना या नरकयातनांपासून मुक्त करणे आवश्यक आहे. जगातील प्रत्येक हिंदूला साहाय्य करणे आमचे उत्तरदायित्व आहे.
देशव्यापी धर्मांतरविरोधी कायदा बनणे आवश्यक ! – मुन्ना कुमार शर्मा, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारत हिंदु महासभा
हिंदु जनजागृती समिती सर्व हिंदुत्वनिष्ठ आणि संघटना यांना एका मंचावर आणण्याचा प्रयत्न करते. त्याविषयी धन्यवाद ! हिंदूंना भीती दाखवून ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून धर्मांतर करण्यात येत आहे. आम्ही ‘घर वापसी’चे कार्य करतो. प्रशासनाच्या मुख्य पदांवर हिंदुविरोधी मानसिकतेचे लोक विराजमान आहेत. त्यामुळे देशव्यापी धर्मांतरविरोधी कायदा बनणे आवश्यक आहे.
अन्य हिंदुत्वनिष्ठांचे विचार
१. श्री. भूषणलाल पाराशर, प्रमुख, सनातन धर्म मंदिर सभा – भारताला जर हिंदु राष्ट्र घोषित केले, तर देशाच्या अनेक समस्या अल्प होतील. मंदिर धर्मप्रसाराचे केंद्र बनले पाहिजे. सनातन धर्म संस्था पुरोहितांना प्रशिक्षित करते. स्वत:सह समाज आणि राष्ट्र यांच्या सुरक्षेसाठी आपल्याला कटिबद्ध झाले पाहिजे.
२. डॉ. ओमेंद्र रत्नू, ‘महाराणा’ पुस्तकाचे लेखक – हिंदु राजांच्या वीरतापूर्ण इतिहासाला सर्वांच्या समक्ष ठेवून धर्म रक्षणासाठी पुढे आले पाहिजे.
३. श्री. ललित अंबरदार, काश्मिरी पंडित आणि लेखक – बहुसंख्य असतांनाही हिंदू धोकादायक स्थितीत आहेत. आम्ही जागे झालो, तर सरकार जागे होईल. भारतातील हिंदू गाढ झोपेत आहेत. आम्ही काश्मीरचे मूळ निवासी असतांना आम्हाला अल्पसंख्यांक बनवले. काश्मीर भारतासाठी आव्हान आहे. निवडणुकीने जिहाद संपणार नाही, तो सैन्याच्या माध्यमातूनच संपवले पाहिजे.
४. श्री. आर्.व्ही.एस् मणी, माजी अप्पर सचिव, गृहमंत्रालय – सनातन धर्माच्या महानतेच्या विश्वस्तरावर प्रसार केला पाहिजे. स्वधर्माचे पालन केले पाहिजे. आपल्या मुलांना सनातन संस्कृतीविषयी माहिती दिली पाहिजे आणि सनातन धर्माला पुनर्स्थापित केले पाहिजे.
५. श्री. जगदीश चौधरी, बालाजी ग्रुप ऑफ कॉलेज – कोणत्याही राष्ट्राला राष्ट्र म्हणण्यासाठी आधी स्वीकारण्याची आवश्यकता असते. शिक्षण स्वत:त उतरवणारे खरे शिक्षित असतात.
६. श्री. गजेंद्र भार्गव, अध्यक्ष, वानर सेना – मंदिरात आरती, कथा, भजन-कीर्तन यांसाठी, तर अनेक जण येतात; पण ते मंदिर किंवा धर्म यांच्या रक्षणाच्या वेळी पुढे येत नाहीत. त्यामुळे हिंदूंमध्ये जागृती होण्यासाठी सर्व मंदिरे धर्मशिक्षण आणि धर्मरक्षण यांचे केंद्र बनणे आवश्यक आहे.
७. श्री. देवेंद्र पांडेय, राष्ट्रीय महासचिव, अखिल भारत हिंदु महासभा – राजकारणाचे हिंदुकरण आणि सैनिकीकरण करणे, या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचाराला भारताने नाही, तर इस्रायलने स्वीकारले. आज भारताला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा विचार आचरणात आणण्याची आवश्यकता आहे.
८. श्री. अतुल जेसवानी, प्रदेशाध्यक्ष, हिंदु सेवा परिषद – आज कार्यकर्त्याला धर्मरक्षणासाठी अधिवक्ता बनणेही आवश्यक आहे. संघर्षाची वेळ समोर येऊन ठेपली आहे. अशा वेळी हिंदुहिताच्या रक्षणासाठी अधिवक्त्यांच्या माध्यमातून धर्मरक्षणाचे प्रभावी कार्य करता येऊ शकते.
९. श्री. विनोद यादव, संस्थापक, धर्मरक्षक संघटना – बहुतांश हिंदुत्वनिष्ठ भावनेच्या आधारावर कार्य करतात. ‘आपण आग लागल्यावर पाण्यासाठी विहीर खोदतो’, अशी हिंदूंची स्थिती झाली आहे. प्रतिदिन थोडे थोडे काम केल्याने कार्य होते. हिंदूंनी त्यांची चेतनाशक्ती वाढवली पाहिजे.
अधिवेशनातील काही महत्त्वपूर्ण क्षणचित्रे
१. हिंदु राष्ट्र संसद : या अधिवेशनात हिंदु राष्ट्र संसदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सभापती म्हणून ‘ज्ञानम् फाऊंडेशन’चे संस्थापक महंत दीपक गोस्वामी, तर उपसभापती म्हणून सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी या संसदेचे संचालन केले. विविध राज्यांमधून आलेल्या धर्मनिष्ठांनी या संसदेत त्यांचे प्रस्ताव मांडले. हे प्रस्ताव पुढे लोकप्रतिनिधींना पाठवण्यात येणार आहेत.
२. ‘हिंदु राष्ट्र आणि पत्रकारिता’, या विषयावर विशेष संवादाचे आयोजन करण्यात आले. यात हिंदुत्वनिष्ठ पत्रकार श्री. संदीप देव, ‘जम्बू टॉक्स यू ट्यूब चॅनेल’चे निर्देशक श्री. निधीश गोयल, ‘संगम टॉक्स यू ट्यूब चॅनेल’च्या संपादिका तान्या आणि एन्. गायत्री यांनी सहभाग घेतला. या सर्वांनी हिंदुहिताची पत्रकारिता करतांना येणार्या अडचणी आणि केलेले प्रयत्न यांविषयी उपस्थितांना सांगितले. या विशेष संवादाचे संचालन श्री. चेतन राजहंस यांनी केले.
३. या अधिवेशनामध्ये ‘हिमाचल प्रदेश हिंदु जागरण मंचा’चे श्री.कमल गौतम, ‘करणी सेने’चे राजस्थान प्रांतप्रमुख श्री. मनोहरलाल घोडीवाला, सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता भगवान स्वरूप शुक्ल, अधिवक्ता बिपिन बिहारी सिंह, ‘द लीगल हिंदु संघटने’चे संस्थापक श्री. समीर चाकू उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले.
अधिवेशनासाठी केलेले सहकार्य
या अधिवेशनाच्या आयोजनाशी संबंधित विविध व्यवस्थांसाठी श्री लक्ष्मीनारायण मंदिराचे प्रमुख श्री. अतुल खोसला, मंदिर समितीचे सदस्य सर्वश्री. रामनिवास शर्मा, सौगात बॅनर्जी, नरेंद्र मखीजा, राजीव गुलाटी, संजय सेठी आणि नीलम सेठी यांचे सहकार्य मिळाले.
अधिवेशनाविषयी हिंदुत्वनिष्ठांचे अभिप्राय
१. लता ठाकूर, चंडी वाहिनी, जबलपूर – अधिवेशनाला उपस्थित राहिल्यावर समजले, ‘आम्ही काहीच करत नाही. आमच्याकडून केवळ ५० टक्के कार्य होत आहे. आम्ही अजून किती केले पाहिजे, हे येथे येऊन समजले.’
२. श्री. गजेंद्र भार्गव, कोटा – समितीच्या कार्यकर्त्यांची वागणूक, नम्रता आणि व्यवस्था पाहून पुष्कळ चांगले वाटले.
३. श्री. भंवरसिंह, अजमेर – अधिवेशनाचे अतिशय चांगले नियोजन झाले. हृदय प्रसन्न झाले. आता आमच्या गावात कशा प्रकारे कार्य करू शकतो, याचे नियोजन करू.
४. श्री. वीरेश त्यागी, अखिल भारत हिंदु महासभा, देहली – आपले आयोजन अतिशय यशस्वी झाले. तुम्ही सर्वजण किती कष्ट घेत आहात ! आपल्याला अनेक शुभेच्छा !
५. सुनीता दुर्रानी, कश्मीरी हिंदू, नोएडा, उत्तरप्रदेश – समितीच्या कार्यकर्त्यांची वागणूक, नियोजन व्यवस्था उत्तम होती. सर्व वक्ते अतिशय चांगले वाटले. अशा प्रकारचे अधिवेशन प्रत्येक ठिकाणी व्हावे.
६. सर्वश्री गौरव दुबे आणि कपिल दुआ, पानिपत, हरियाणा – सर्व संघटनांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न अतिशय चांगला आहे. यातून परस्पर परिचय होतो आणि नवीन गोेष्टी शिकायला मिळतात.
७. श्री. निधीश गोयल, निर्देशक, जम्बू टॉक्स यू ट्यूब चॅनेल – आम्ही अनेक वर्षांपासून ‘वन्दे मातरम्’ नेहमी सावधान स्थितीत गात होतो. आज प्रथमच सर्वजण हात जोडून नमस्काराच्या मुद्रेत वन्दे मातरम् सर्वांना म्हणतांना पाहून मीही हात जोडून ते म्हटले. तेव्हा मनात वेगळेच सात्त्विक भाव निर्माण झाले. खरोखरच भारतमातेला वंदन करत आहे, असे वाटले.
८. पंडित साधुराम मिश्रा, श्री लक्ष्मीनारायण मंदिर – आजपर्यंत एवढा सुनियोजित कार्यक्रम पाहिला नाही. अधिवेशनाचे आयोजन अतिशय सुंदर होते. तुमच्या सर्व कार्यकर्त्यांचे आचरणही अतिशय चांगले आहे.