हिंदूंना ‘झटका’ मांसाचा पर्याय न देणार्या मुंबईतील ‘मटण शॉप’ ला मनसेकडून ९० दिवसांची समयमर्यादा !
मुंबई – हिंदूंना झटका मांसाचा पर्याय न ठेवणार्या अंधेरी (पश्चिम) येथील टाटा ग्रुपच्या स्टार बाजार मॉलमधील ‘फ्रेश चॉईस’ या दुकानात ‘झटका’ मांस ठेवण्यासाठी मनसेकडून तंबी देण्यात आली. मनसेच्या व्यापारी सेनेचे उपाध्यक्ष श्री. सिद्धांत मोहिते यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या कार्यकर्त्यांनी ४ डिसेंबर या दिवशी वरील दुकानात जाऊन झटका मांस विक्रीला ठेवण्यासाठी ९० दिवसांची समयमर्यादा दिली आहे. या कालावधीत हिंदूंना झटका पद्धतीचे मांस उपलब्ध करून न दिल्यास मनसेच्या पद्धतीने उत्तर देऊ, अशी चेतावणी या वेळी मोहिते यांनी दिली.
फक्त ‘हलाल’ पद्धतीचं मांस उपलब्ध असल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने श्री सिद्धांत मोहिते यांनी महाराष्ट्र सैनिकांसोबत Star Bazaar या मॉल वर धडक दिली व व्यवस्थापकांना जाब विचारला!
महाराष्ट्र नवनिर्माण व्यापारी सेनेचे सल्लागार श्री अभय मुणगेकर यांनी एका पत्राद्वारे स्टार बाजारच्या व्यवस्थापकांना झटका मांस चा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी ९० दिवसांचा वेळ दिला आहे.
जर त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर मनसे स्टाईल ने पुढची पावलं घेऊ!
यावेळी सौ. अवंतिका राऊत, विजया मटकर, सुनीता जाधव, अर्चना माने, श्री. प्रवीण सप्ताळे उपस्थित होते.
जय श्री राम!
‘फ्रेश चॉईस’ या दुकानामध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आलेले मांस १०० टक्के हलाल पद्धतीचे असल्याची तक्रार एका ग्राहकाकडून मनसेकडे करण्यात आली. याविषयी मनसेच्या कार्यकर्त्यांनी दुकानात जाऊन विचारणा केली असता तेथे केवळ ‘हलाल’ मांसाचाच पर्याय असल्याचे आढळून आले. या वेळी मुसलमान ‘झटका’ पद्धतीचे मांस खातील का ? मग हिंदूंनी ‘हलाल’ मांस का खावे ? हिंदूंना झटका मांसाचा पर्याय का नाही ? राज्यघटनेने हिंदूंना त्यांच्या धर्मानुसार खाण्याचा अधिकार दिला असतांना त्यापासून हिंदूंना वंचित का ठेवण्यात येत आहे ? अशी विचारणा या वेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनकडून करण्यात आली.
… तर येथे हिंदूंसाठी ‘झटका’ मांस नाही, असा फलक लावा ! – सिद्धांत मोहिते, उपाध्यक्ष, व्यापारी सेना, मनसे
मुसलमानांनी काय खावे, हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांच्या धर्माचा आम्ही आदर करतो. हलाल मांस विक्रीला आमचा विरोध नाही; मात्र तुम्ही १०० टक्के हलाल मांसाची विक्री करत असाल, तर हिंदूंना झटका मांसाचा पर्याय का नाही ? कलमा पढत कापलेले हलाल मांस हिंदूंनी का खावे ? हा हिंदूंवरील धार्मिक अन्याय आहे. हिंदूंसाठी झटका मांस उपलब्ध करून देणार नसाल, तर ‘हिंदूंसाठी झटका मांस आम्ही विकत नाही’, असा फलक येथे लावा.