भोर (जिल्हा पुणे) येथे समस्त हिंदूंच्या वतीने ‘भव्य हिंदु धर्मरक्षक’ मोर्च्याचे आयोजन
भोर (जिल्हा पुणे), ४ डिसेंबर (वार्ता.) – येथे २ डिसेंबर या दिवशी देशातील लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या या घटनांच्या निषेधार्थ आणि त्यांच्या विरोधात सरकारने कडक कायदे करावेत, या मागणीसाठी येथील समस्त हिंदूंच्या वतीने ‘भव्य हिंदु धर्मरक्षक’ मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ४०० हून अधिक हिंदू उपस्थित होते. श्रीक्षेत्र चौपाटी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला हार घालून आणि ध्येयमंत्र म्हणून मोर्च्याला प्रारंभ करण्यात आला. नगरपालिका चौक, मंगळवार पेठ, बसस्थानक मार्गे राजवाडा येथील तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चा आल्यानंतर या ठिकाणी समस्त हिंदूंच्या वतीने उपस्थित माता-भगिनींनी नायब तहसीलदार मा. झागरे आणि पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांना निवेदन दिले.
या मोर्च्यामध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी, भाजप, प्रतापगड उत्सव समिती, रोहिडा प्रतिष्ठान, सकल मराठा समाज, विश्व हिंदु परिषद, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदु धर्माभिमानी सहभागी झाले होते.
वैशिष्ट्यपूर्ण
१. मोर्च्यामध्ये महिलांसह तरुणींचाही सहभाग होता.
२. मोर्च्यामध्ये ‘श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे !’ ‘लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या विरोधी कायदे करा !’, अशा घोषणा उत्स्फूर्तपणे देण्यात येत होत्या.