पुणे येथे कोरोना चाचणीसाठी मिळालेल्या ‘रॅपिड अँटिजेन किट’ प्रकरणातील घोटाळा उघड !
पुणे – वारजे येथील महापालिकेच्या डॉ. अरविंद बारटक्के दवाखान्यातील ‘स्वॅब सेंटर’वर आलेल्या १८ सहस्र ५०० तपासणी किट पैकी ६० ते ८० टक्के किट रुग्णांसाठी न वापरता त्यांची परस्पर विक्री करून, त्या जागी बनावट रुग्णांच्या नोंदी करून आणि त्यांना मेसेज जाऊ नये; म्हणून रुग्णांऐवजी त्या सेंटरवरील डॉक्टर आणि कर्मचारी यांचे भ्रमणभाष नंबर नोंद केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घोटाळ्यातून अनुमाने ३४ लाख रुपये या केंद्रावरील डॉक्टर आणि कर्मचारी यांनी घेतल्याचे वारजे माळवाडी पोलिसांच्या प्राथमिक अन्वेषणात उघड झाले आहे.
बारटक्के दवाखान्यातील डॉ. सतीश कुळसुरे यांनी आरोग्ययंत्रणा, पोलीस यांच्यासह ३२ ठिकाणी तक्रार करून या प्रकरणाला वाचा फोडली आहे. हा प्रकार जानेवारी ते डिसेंबर २०२१ या कालावधीत घडला. तक्रारदार आणि वारजे पोलिसांच्या अन्वेषणाअन्वये या घोटाळ्याचा ठपका वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुणा तारडे, तत्कालीन कंत्राटी तत्त्वावरील ‘स्वॅब सेंटर’चे प्रमुख डॉ. हृषिकेश गारडी आणि महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. सुरेश भारती यांच्यावर ठेवण्यात आला आहे. वारजे पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सोनाली कथले यांनी या प्रकरणाचे अन्वेषण केले. हे प्रकरण गंभीर असून नक्की किती रकमेची फसवणूक झाली याची निश्चिती करून पोलीस ठाण्यात तक्रार करावी, असा अहवाल वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस्. हाके यांनी महापालिका आयुक्त विक्रमकुमार, आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांना २७ सप्टेंबरला पाठवला; मात्र २ मास उलटले तरीही आरोग्य विभागाकडून त्यावर काही कारवाई केली नाही.
संपादकीय भूमिकागरजू रुग्णांना वेठीस धरून ‘मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा’ प्रकार डॉक्टरांनी करणे, हे संतापजनक आणि गंभीर आहे. अशा डॉक्टर आणि कर्मचारी यांना कठोर शिक्षेसह त्यांच्याकडून सर्व रक्कम वसूल करण्याचीही शिक्षा द्यावी ! |