मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींकडे लाखो रुपयांचे वीजदेयक थकित, तर शेतकर्यांवर महावितरणची कारवाई !
बीड – सध्या मराठवाड्यातील शेतकर्यांकडे मागील वीजदेयकाची थकबाकी असल्यास त्यांची वीजजोडणी तोडली जात आहे. मराठवाड्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे, भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री शिवाजीराव पंडित, माजी आमदार सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता सुरेश धस, माजी आमदार प्रकाश सोळंके यांच्या पत्नी मंगल प्रकाश सोळंके, भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांचे पती अक्षय मुंदडा, माजी आमदार भीमराव धोंडे, बीड नगरपरिषदेचे सदस्य योगेश क्षीरसागर या नेत्यांकडे १३ ते १४ लाख रुपयांची वीजदेयके थकित आहेत.
महावितरणकडून वीजदेयक न भरल्याने शेतकर्यांची वीजजोडणी तोडण्यात येत आहे. ही कारवाई टाळण्यासाठी शेतकर्यांनी किमान चालू थकित देयक भरणे अपेक्षित असल्याचे शासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींना वीजदेयकाच्या संदर्भात सवलत का दिली जाते ? त्यांच्यावर कोणतीही कारवाई का नाही ? असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण होत आहे. (लोकप्रतिनिधी आणि शेतकरी यांना वेगवेगळा न्याय का ? याचे उत्तर महावितरण विभाग देईल का ? अन्यथा महावितरण विभागावर लोकप्रतिनिधींचा दबाव आहे, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ? – संपादक)
थकित देयकाविषयी लोकप्रतिनिधींच्या प्रतिक्रिया !
याविषयी आमदार धनंजय मुंडे म्हणाले की, वर्ष २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी सदर थकबाकी भरून वीजजोडणी तोडण्याचा अर्ज दिला होता. खासदार प्रीतम मुंडे यांनी म्हटले आहे की, ‘थकित देयक महावितरणकडून पाठवण्यात आलेले नव्हते, देयकाविषयीची माहिती घेतली. देयक पूर्ण भरले आहे’, तर आमदार संदीप क्षीरसागर यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिल्याचे एका वृत्तवाहिनीने सांगितले.
संपादकीय भूमिकालोकप्रतिनिधींना वेगळा नियम लावल्यास कधीतरी वीजदेयकांची वसुली पूर्ण होईल का ? हे स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राचीच आवश्यकता आहे. |