आध्यात्मिक एकता आणि शक्ती यांचा पाया भक्कम उभारल्यामुळे भारत टिकून असणे

आज, ५ डिसेंबर २०२२ या दिवशी महर्षि अरविंद यांचे पुण्यस्मरण (दिनांकानुसार) आहे. त्या निमित्ताने त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !

महायोगी अरविंद घोष अर्थात महर्षि अरविंद

योगी अरविंद यांचे भारतीय राजकारणाविषयीचे चिंतन, भारताची आध्यात्मिक शक्ती आणि ब्रिटीश अन् परकीय आक्रमक यांच्याविरोधात लढा चालू असतांना भारत जिवंत कसा राहिला, यांविषयीचे विचार येथे देत आहोत.

१. आध्यात्मिक शक्तीनेच भारत जिवंत असणे

‘भारतावर ग्रीक, पर्शियन, हूण, इस्लाम, ब्रिटीश अशा अनेकांनी आक्रमण केले. अनेक वर्षे या समाजावर राज्यही केले. ब्रिटीश सरकार तर सारे काही भुईसपाट करत गेले; परंतु या कशानेही वैदिक ऋषींनी जागृत केलेला भारताचा आत्मा नष्ट होऊ शकला नाही. आपल्यावरील प्रत्येक आक्रमण आणि आपत्ती यांच्या वेळी भारताने सक्रीय प्रतिकार केला. चांगले दिवस असतांना त्याच्या आध्यात्मिक शक्तीनेच भारत जिवंत राहिला. जे जे आपल्या प्रकृतीशी सुसंगत नव्हते, ते ते तो टाकून देत गेला आणि जे जे पचवून टाकण्यासारखे होते, ते ते पचवत गेला. विपरित काळात मात्र कुठे सक्रीय, तर कुठे अक्रीय विरोध करत राहिला. कधी त्याने राजपुतांना पुढे केले, कधी शिखांना, तर कधी मराठ्यांना. देशाशी मिळते न घेणारे प्रत्येक साम्राज्य भारताने धुळीस मिळवले. ‘आपल्या पुनरुज्जीवनाचा दिवस उजाडणारच’, या विश्वासाने भारत संघर्ष करत राहिला. आजही तशीच घटना घडते आहे. (श्री अरविंद यांनी हे लेखन केले, तेव्हा भारताचा ब्रिटिशांविरुद्ध लढा चालू होता. त्याला अनुलक्षून हे लिखाण आहे.)

२. भारताच्या राजकीय इतिहासात धर्मसंस्था आणि राज्य यांचा लढा मुळीच न आढळणे

ब्रिटिशांच्या नोकरशाही पद्धतीच्या निर्घृण, निर्जीव यंत्राचा रूळ वाफेच्या रुळाप्रमाणे आमच्या ग्रामीण स्वयंशासन पद्धतीवरून फिरला आणि ती नष्ट झाली. राज्यकारभारात सर्व वर्ण एकत्र येत होते. त्यामुळे भारतात एकाच वर्गाचे राज्य कधीच आले नाही. दुसर्‍या देशांच्या राजकीय इतिहासात वर्गराज्यांचा धुमाकूळ आढळतो. भारतात मात्र सरदार आणि सामान्यजन किंवा श्रेष्ठजन अन् सामान्यजन राज्य यांच्यात संघर्ष झालेला दिसत नाही. भारताच्या राजकीय इतिहासात धर्मसंस्था आणि राज्य यांचा लढा मुळीच नाही. ग्रीस आणि रोम येथे असे संघर्ष आढळतात अन् त्यामुळे तेथे निरंकुश राजसत्ता अस्तित्वात आली. मुसलमानी आक्रमणाने सगळ्यांच्या सहभागाची भारतीय राज्यसंस्था नष्ट होऊन त्या जागी त्यांची व्यक्तीसत्ता वा एकसत्ता ही परंपरा आली.

३. आध्यात्मिक एकता हीच भारताची शक्ती आणि वैशिष्ट्य असणे !

‘भारत कधीच एक नव्हता. त्यांच्यात देशभक्तीची उणीव होती, पाश्चात्त्य प्रभावामुळे आता देशात देशभक्ती निर्माण होत आहे’, ही टीका श्री अरविंद फेटाळून लावतात. प्राचीन ग्रीस आणि रोम यांची चर्चा करून श्री अरविंद म्हणतात, ‘आधी राजकीय ऐक्य निर्माण करून त्यात आध्यात्मिक एकता निर्माण करण्याचे त्यांचे प्रयत्न अपयशी झाले; मात्र आधी आध्यात्मिक एकतेचा पाया भक्कम उभारल्यामुळे भारतीय जनसमाज मात्र टिकून राहिला. ही आध्यात्मिक एकताच आमची शक्ती आणि आमचे वैशिष्ट्य आहे.’

– श्री. श्रीपाद कोठे (साभार : साप्ताहिक ‘विवेक’, ३१.१०.२०२२)