येत्या ६ मासांमध्ये ठाणे खड्डे आणि कचरा मुक्त करणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या संकल्पनेचा शुभारंभ !
ठाणे – नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना मी एक जोरदार, तसेच धाडसी माणूस वाटलो. त्यामुळे त्यांनी मला मुख्यमंत्रीपदाची संधी दिली. ठाण्यात सुशोभिकरणाची कामे हाती घेण्यात आली असून येत्या ६ मासांमध्ये ठाणे खड्डे आणि कचरा मुक्त करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणेकरांना दिले. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या संकल्पनेचा शुभारंभ २ डिसेंबर या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.
मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या माध्यमातून मेट्रो, उड्डाणपूल, खाडीकिनारा मार्गासारख्या मोठ्या प्रकल्पांची कामे शहरात चालू असतांना ठाणे महानगरपालिका पुढील ६ मासांमध्ये शहरातील सर्वसामान्यांना भेडसावणार्या दैनंदिन प्रश्नांची उकल शोधण्यासाठी युद्धपातळीवर अभियान राबवेल. शहर आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे, असा आमचा प्रयत्न असेल, असेही ते म्हणाले.