बदलापूर येथील रासायनिक सांडपाणी वाहिनी फुटल्याने नागरिक संतप्त !
ठाणे – बदलापूर येथील औद्योगिक वसाहतीतून आस्थापनांचे रासायनिक सांडपाणी अंबरनाथला वाहून नेणारी जलवाहिनी ३ डिसेंबरला सकाळी फुटली. त्यामुळे बदलापूर-कर्जत रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर रासायनिक सांडपाणी पसरले होते. यापूर्वीसुद्धा ही सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी फुटल्याने रस्त्यावर आणि नागरी वस्तीत पाणी शिरले होते. नैसर्गिक नाल्यांच्या माध्यमातून हेच पाणी थेट उल्हास नदीला जाऊन मिळते. त्यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ हेच या प्रदूषणाला उत्तरदायी असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
सौजन्य : ABP MAJHA
१. अंबरनाथ येथील मोरिवली भागात असलेल्या प्रक्रिया केंद्रात जलवाहिनीद्वारे बदलापूर औद्योगिक वसाहतील रासायनिक सांडपाणी नेले जाते.
२. बदलापूर-कर्जत राज्यमार्गाच्या कडेने ही सांडपाणी वाहिनी टाकण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी ही वाहिनी पालटण्याचे काम महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाने (एम्.आय.डी.सी.) पूर्ण केले; मात्र काही वर्षांतच ही सांडपाणी वाहिनी फुटण्याचे प्रकार अनेकदा समोर आले आहेत.
३. अनेकदा जलवाहिनीतील दाब वाढल्यानंतर ही सांडपाणी वाहिनी फुटते. त्यामुळे बदलापूर पूर्वेतील काही परिसरांत सांडपाणी पसरते. तेथील नागरी वस्तीतील रस्ते दूषित पाण्याने व्यापले जातात. त्यामुळे नागरिकांना पुष्कळ अडचणींना सामोरे जावे लागते.
४. बदलापूर येथून नैसर्गिक नाला वहातो. यात हे सांडपाणी जाते. हा नाला पुढे उल्हास नदीला जाऊन मिळतो.
५. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या निष्काळजीपणामुळे उल्हास नदी प्रदूषित होत असल्याचे वारंवार दिसून आले आहे.
६. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या सर्व प्रकाराकडे कानाडोळा करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
७. या सर्व यंत्रणा उल्हास नदीच्या प्रदूषणाला प्रत्यक्ष उत्तरदायी असून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंद करण्याची मागणी माजी स्थानिक नगरसेवक संभाजी शिंदे यांनी केली आहे.
८. येत्या काळात या जलवाहिनीचा प्रश्न न सोडवल्यास तीव्र आंदोलन छेडण्याची चेतावणीही स्थानिक नागरिकांनी दिली आहे.
संपादकीय भूमिका
|