महाभारत युद्धाला प्रारंभ !
आज, मार्गशीर्ष शुक्ल द्वादशी (४ डिसेंबर २०२२) या तिथीला महाभारत युद्धास प्रारंभ झाला. त्या निमित्ताने…
‘पांडवांचा वनवास आणि अज्ञातवास संपल्यानंतर न्यायाने त्यांच्या राज्याचा वाटा त्यांना मिळणे अवश्य होते; परंतु मदमत्त झालेल्या दुर्योधनाकडून ते घडले नाही. तेव्हा युद्धाचा प्रसंग उद्भवला. तत्पूर्वी स्वतः श्रीकृष्णाने कौरवांकडे जाऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला, ‘‘हे पांडवही तुमचेच आहेत. कौरव-पांडवांची संधी घडवून आणा. जोपर्यंत अर्जुन आणि श्रीकृष्ण कंबर बांधून युद्धास सज्ज झाले नाहीत, जोपर्यंत भीम आपली गदा घेऊन सैन्याच्या शिरोभागी उभा रहात नाही, तोपर्यंतच हा प्रश्न मिटवावा.’’ श्रीकृष्णाचा हा सल्ला ऐकून दुर्योधन संतापाने लाल झाला आणि मूर्तीमंत पाशवी सत्ता त्याच्या मुखातून बोलली, ‘‘सुईच्या अग्रावर (टोकावर) राहील एवढी मातीसुद्धा पांडवांना मिळणार नाही.’’
शेवटी श्रीकृष्णाची शिष्टाई फुकट जाऊन युद्धाचा प्रसंग येऊन ठेपला आणि बरोबर आजच्या तिथीला न्याय अन् अन्याय यांचा फार मोठा लढा चालू झाला. दोन्ही सैन्यांचे मिळून १८ अक्षौहिणी सैन्य कुरुक्षेत्रावर युद्धासाठी सज्ज झाले. पायदळांच्या पायांचा आणि शस्त्रांचा, घोड्यांच्या टापांचा आणि खिंकाळ्यांचा, हत्तींच्या चित्कारांचा, रथाच्या गडगडाटांचा, विरांच्या सिंहनादाचा आणि शस्त्रांचा गगनभेदी भयंकर आवाज होऊ लागला. द्रुपद, विराट, सात्यकी, धृष्टद्युम्न, शिखंडी, भीम आदी वीर एका बाजूला आणि शल्य, शकुनी, जयद्रथ, कृतवर्मा, भीष्म, द्रोण आदी झुंजार दुसर्या बाजूला होते. मार्गशीर्ष शुक्ल द्वादशीला कौरव-पांडव यांमधील महाभारत युद्ध चालू झाले. भीष्मार्जुन, भीम-दुर्योधन, सात्यकी- कृतकर्मा, युधिष्ठिर-शल्य यांची द्वंद्वयुद्धे चालू झाली. संग्रामांत पहिल्याच दिवशी सहस्रो हत्ती, घोडे आणि पायदळे मरून रणमैदान रक्तामांसाने माखून गेले.’
(साभार : ‘दिनविशेष’ (भारतीय इतिहासाचे तिथीवार दर्शन), लेखक – प्रल्हाद नरहर जोशी)